युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भारतीय सायकलिंग महासंघासह भारताची सायकलिंग परिसंस्था बळकट करण्यासाठीच्या आराखड्याचा आढावा घेतला
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2026
मुलभूत स्तरावरील अधिक सहभाग, खेळाडूंचा विकास आणि वाढीव आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता यांच्या माध्यमातून भारताची सायकलिंग परिसंस्था बळकट करण्यासाठीच्या आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज भारतीय सायकलिंग महासंघाचे (सीएफआय) महासचिव मणिंदर पाल सिंग आणि महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह व्यापक आढावा बैठक घेतली.
यावेळी झालेली चर्चा मुलभूत स्तरावरील प्रतिभांचा शोध घेणे आणि समाजाच्या सहभागापासून ते उच्च-क्षमता प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, प्रशिक्षणातील उत्कृष्टता तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत सायकलपटूंसाठी संरचित मार्ग आखण्यावर केंद्रित होती. सदर बैठकीमध्ये युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल (युसीआय) या संघटनेसोबत भारताचा वाढता सहभाग आणि स्पर्धात्मक सायकलिंग क्षेत्रात उभरते जागतिक केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्याच्या दिशेने झालेली प्रगती यांचा देखील आढावा घेण्यात आला.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग वेळापत्रकात भारताचे स्थान उंचावणाऱ्या पुणे ग्रँड टूर या शर्यतीचे आगामी पर्व हा या चर्चेचा मुख्य विषय होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त स्पर्धा भारतीय सायकलपटूंना जागतिक कीर्तीच्या खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याचा मौल्यवान अनुभव मिळवून देण्यासोबतच जागतिक स्तरावरील क्रीडास्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याची भारताची वाढती क्षमता देखील दाखवून देतात असे निरीक्षण केंद्रीय मंत्र्यांनी नोंदवले.
या बैठकीदरम्यान मणिंदर पाल सिंग यांनी सांगितले की युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल (युसीआय)संस्थेच्या वार्षिक अहवाल 2026 मध्ये जागतिक सायकलिंग क्षेत्रात वाढत्या योगदानाबद्दल भारताचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालात समाविष्ट असलेल्या संदेशात युसीआयच्या महासंचालक अमिना लनाया यांनी पुणे ग्रँड टूर 2025 या शर्यतीचे यश अधोरेखित केले आणि भारताची वाढती खिलाडूवृत्ती तसेच भारतीय सायकलिंग महासंघाचे प्रयत्न यांची प्रशंसा केली.

महासंघाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भारतीय सायकलिंग क्षेत्रामध्ये पार केलेल्या आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची माहिती दिली. प्रतिष्ठीत युसीआय जागतिक सायकलिंग केंद्राच्या (डब्ल्यूसीसी) विशेष प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट होणारी पहिली सायकलपटू म्हणून हर्षिता जाखर यांची निवड झाल्यानंतर, रोनाल्डो सिंग, एसो अल्बान, रोजित सिंग, डेव्हिड बेकहॅम एल्काटोचोंगो तसेच जेम्स सिंग या पाच प्रख्यात भारतीय स्प्रिंटर्ससह सहाय्यक कर्मचाऱ्यांपैकी चार सदस्यांचा स्वित्झर्लंडमधील एगल येथे होणाऱ्या युसीआय जागतिक सायकलिंग केंद्राच्या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे अशी माहिती दिली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या महत्वपूर्ण घडामोडीचे स्वागत केले आणि अशा संधी भारतीय सायकलपटूंना तसेच प्रशिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा विज्ञानविषयक पाठबळ तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव मिळवून देतात आणि भारताच्या या दीर्घकालीन उच्च-क्षमता परिसंस्थेला मजबूत करतात असे नमूद केले.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280592)
आगंतुक पटल : 6