दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"एडनच्या आखातात 'एमव्ही गोल्डन आर्सेनल'वर चाच्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय युद्धनौका 'आयएनएस त्रिकंद' हाणून पाडला

प्रविष्टि तिथि: 02 JUL 2026 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जुलै 2026

 

एडनच्या आखातात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या 'आयएनएस त्रिकंद' या युद्धनौकेने एका मालवाहू जहाजावरील समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला. 'सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडीन्स'चा ध्वज असलेल्या 'एमव्ही गोल्डन आर्सेनल' या मालवाहू जहाजावर 1 जुलै 2026 रोजी हा हल्ला झाला होता, ज्याला भारतीय नौदलाने तत्परतेने प्रतिसाद दिला.

येमेनमधील एडन येथून प्रवास करत असताना, जिबूतीपासून साधारण 300 सागरी मैल पूर्व-ईशान्य दिशेला या जहाजावर चाच्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 'इन्फर्मेशन फ्युजन सेंटर - इंडियन ओशन रिजन' (IFC-IOR) च्या समन्वयातून या घटनेची माहिती मिळताच, परिसरात तैनात असलेल्या 'आयएनएस त्रिकंद'ला तात्काळ त्या व्यापारी जहाजाच्या दिशेने जाण्याचे आदेश देण्यात आले.

या मालवाहू जहाजावर एका भारतीय नागरिकासह एकूण 21 कर्मचारी होते. चाच्यांच्या हल्ल्यात जहाजाचा मुख्य नियंत्रण कक्ष (ब्रिज सुपरस्ट्रक्चर) आणि लगतच्या भागांचे  नुकसान झाले. मात्र, जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी  सुरक्षित खोलीत आश्रय घेतल्यामुळे ते सर्व सुरक्षित राहिले.

2 जुलै 2026 च्या सकाळी 'आयएनएस त्रिकंद'च्या एका सुरक्षा पथकाने 'एमव्ही गोल्डन आर्सेनल'वर प्रवेश केला. संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केल्यानंतर तिथे कोणताही संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्ती आढळला नाही. यानंतर जहाजावरील कर्मचारी सुरक्षितपणे बंकर मधून बाहेर आले आणि त्यांनी भारतीय नौदलाच्या सैनिकांसह जहाजाच्या नुकसानीची पाहणी सुरू केली.

या मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी भारतीय नौदलाच्या 'P-8I' या सागरी गस्ती विमानाचीही मदत घेण्यात आली. या विमानाने परिसरात आकाशातून पाळत ठेवून सागरी क्षेत्रावर बारीक लक्ष ठेवले आणि चाचेगिरीविरोधी या मोहिमेला महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

जहाज पूर्णपणे सुरक्षित झाल्याचे आणि तात्कालिक धोका टळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 'आयएनएस त्रिकंद'ची ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. 'एमव्ही गोल्डन आर्सेनल' हे जहाज आता आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहे.

हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी कटिबद्ध राहत, व्यापारी जहाजांचे रक्षण करणे, समुद्री चाचेगिरीचा बिमोड करणे आणि कोणत्याही देशाचे असले तरी सर्व खलाशांच्या सुरक्षेची खात्री बाळगणे, यासाठी भारतीय नौदल सदैव तत्पर आहे.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280513) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil