संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी सदर्न कमांडचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2026 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2026
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी आज 'सदर्न कमांड'चे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) म्हणून पदभार स्वीकारला आहे. उपलष्करप्रमुख पदावर नियुक्त झालेल्या लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एव्हीएसएम, एसएम यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर डिसेंबर 1988 मध्ये 74 आर्मर्ड रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले. जनरल श्रेणीचे अधिकारी असलेल्या पुष्कर यांची चार दशकांपेक्षा जास्त काळाची कारकीर्द अत्यंत गौरवशाली आणि उल्लेखनीय राहिली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी विविध भौगोलिक आणि धोरणात्मक वातावरणात अनेक प्रकारच्या कमांड, स्टाफ आणि प्रशिक्षण संस्थांमधील महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान 2 कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम करताना लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी निर्णायक नेतृत्व आणि धोरणात्मक दूरदृष्टीचे दर्शन घडवले होते.
जनरल ऑफिसर यांनी एका परिचालनात्मक क्षेत्रात आर्मर्ड रेजिमेंटचे, एका महत्त्वाच्या स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेडचे, एका इन्फंट्री डिव्हिजनचे आणि पश्चिम क्षेत्रातील एका प्रमुख स्ट्राईक कोअरचे यशस्वी नेतृत्व केले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या कर्मचारी नियुक्तींमध्ये त्यांनी एका स्ट्राईक कोअरमध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी, पश्चिम क्षेत्रातील एका आर्मर्ड डिव्हिजनमध्ये कर्नल जनरल स्टाफ, एका स्ट्राईक कोअरमध्ये ब्रिगेडियर क्वार्टरमास्टर जनरल, एका ऑपरेशनल कमांडचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ, आर्मर्ड कोअरचे अतिरिक्त महासंचालक आणि टेरिटोरियल आर्मीचे महासंचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याशिवाय, त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे एक प्रशिक्षक म्हणूनही सेवा दिली आहे.

जीओसी-इन-सी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन प्रकारच्या कार्याचा अनुभव आहे; ज्यामध्ये भूतानमधील 'भारतीय लष्करी प्रशिक्षण पथका'चा भाग म्हणून आणि मॉस्को येथील भारतीय दूतावासात 'संरक्षण आणि लष्करी दूत' (Defence and Military Attache) म्हणून केलेल्या सेवेचा समावेश आहे, जिथे त्यांच्याकडे आर्मेनिया आणि बेलारूस या देशांचीही अतिरिक्त जबाबदारी होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे पदवीधर असून, त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट आणि भारतातील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स कॉलेज मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या नागरी शैक्षणिक अर्हतेमध्ये संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास या विषयात मास्टर ऑफ आर्ट्स (एम.ए.), मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मास्टर पदवी (एम.एम.एस.) आणि संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) यांचा समावेश आहे. त्यांना अति विशिष्ट सेवा पदक (AVSM), विशिष्ट सेवा पदक (VSM), लष्करप्रमुखांचे प्रशंसा पदक (Chief of Army Staff Commendation) आणि तीन वेळा आर्मी कमांडरचे प्रशंसा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पदभार स्वीकारताना, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी सदर्न कमांड युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना आदरांजली वाहिली आणि दक्षिण कमांडच्या मुख्यालयात त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. आपल्या विविध जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये सर्वोच्च पातळीवरील परिचालनात्मक युद्ध सज्जता टिकवून ठेवण्याच्या दक्षिण कमांडच्या अढळ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच, वाढीव संयुक्त प्रयत्न, स्वदेशी क्षमता विकास आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जलद अंतर्भाव याद्वारे अधिक चांगला समन्वय साधण्यावर त्यांनी भर दिला. सर्व स्तरावरील सैनिक भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरांचे पालन करत राहतील आणि देशाच्या सेवेत धोरणात्मक उत्कृष्टतेचे सर्वोच्च निकष कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280335)
आगंतुक पटल : 8