संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमा रस्ते संघटनेच्या ब्रह्मांक (Project BRAHMANK) या प्रकल्पाचा 16 वा वर्धापन दिन साजरा

Posted On: 29 JUN 2026 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) वतीने राबवल्या जात असलेल्या ब्रह्मांक (Project BRAHMANK) या प्रकल्पाचा 16 वा वर्धापन दिन दि. 29 जून 2026 रोजी अरुणाचल प्रदेशातील राणाघाट इथे साजरा झाला. यानिमित्ताने या प्रदेशातील धोरणात्मक पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्थेच्या विकासासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या पंधरा वर्षांच्या समर्पित सेवेचा गौरव केला गेला. अरुणाचल प्रदेशातील सियांग, पूर्व सियांग, पश्चिम सियांग, अप्पर सियांग आणि शी-योमी जिल्ह्यांसह आसाममधील धेमाजी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये धोरणात्मक रस्ते पायाभूत सुविधांचा विकास आणि देखभाल करण्याची जबाबदारी या प्रकल्पाअंतर्गत पार पाडली जाते. 

या प्रकल्पाअंतर्गत 811 किमी लांबीचे रस्ते तसेच लहान पुलांपासून ते मोठ्या पोलादी आणि कमानी पुलांपर्यंतच्या सुमारे 86 पुलांच्या देखभाल आणि विकासाचे काम केले जाते. अलोंग-यिंगकियोंग मार्गावरील सियाम नाल्यावरच्या 100 मीटरचा पोलादी कमानीचा पूल आणि सिमांग नाल्यावरील 165 मीटरचा पीएससी (PSC) पूल हे या प्रकल्पाअंतर्गत उभारले गेलेले काही प्रमुख अभियांत्रिकी यश आहे.

2025-26 या आर्थिक वर्षादरम्यान, प्रकल्प ब्रह्मांकअंतर्गत सियांग आणि सियाम खोऱ्यात एकूण 390 मीटर लांबीच्या 13 पुलांचे उद्घाटन आणि राष्ट्रीय दुहेरी मार्गिका महामार्गाअंतर्गतच्या (NHDL) 61 किमी रस्त्यांचे डांबरीकरण असे महत्त्वाचे टप्पे पूर्ण केले गेले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत या प्रदेशातील दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच धोरणात्मक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी हेलिपॅड देखील विकसित केले गेले आहेत.

या 16 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा भाग म्हणून प्रकल्पाचे मुख्यालय आणि कृती दलांच्या ठिकाणी विविध सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगाचे औचित्य साधून जवानांमधील बंधुभाव वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने सैनिक संमेलन, सैनिकांशी संवाद आणि बडा खाना/मेस कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व सियांग जिल्ह्यातील राणाघाट इथे 29 जून 2011 रोजी या प्रकल्पाची स्थापना केली गेली होती. त्यानंतर 03 डिसेंबर 2011 रोजी हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला होता. आव्हानात्मक भूप्रदेश, सातत्याने होणारा पाऊस, खराब दळणवळणीय व्यवस्था आणि मर्यादित पायाभूत सुविधा अशा आव्हानांवर मात करत सशस्त्र दलांना धोरणात्मक आणि सुलभ दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात या प्रकल्पाने महत्वाची भूमिका बजावली आहे, तसेच दुर्गम गावांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2279183) अभ्यागत कक्ष : 70