युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'एव्हीसी पुरुष व्हॉलीबॉल करंडक 'स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा गांधीनगर येथे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते सत्कार

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

'एव्हीसी पुरुष व्हॉलीबॉल करंडक 2026' स्पर्धेत देशासाठी पहिले वहिले पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाचा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. मांडविया म्हणाले, "हे पदक ऐतिहासिक आहे, परंतु ही केवळ सुरुवात असायला हवी. प्रत्येक यशासोबतच अधिक मोठी जबाबदारी आणि उंचावलेल्या अपेक्षाही येतात. सरकारच्या  प्रत्येक धोरण, प्रत्येक गुंतवणूक आणि प्रत्येक प्रयत्नाचा उद्देश खेळाडूंना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करणे हाच  आहे."

IMG_5477.JPEG

भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करताना केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले की, मायदेशात ऐतिहासिक पदक मिळवणे हे देशातील व्हॉलीबॉलच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे निदर्शक आहे आणि  मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची देशाची क्षमताही यातून अधोरेखित होते.

'एव्हीसी पुरुष व्हॉलीबॉल करंडक' ही आशियातील पुरुषांची प्रमुख वार्षिक व्हॉलीबॉल स्पर्धा आहे. भारताने प्रथमच 2026 ची ही स्पर्धा  आयोजित केली  होती, ज्यामुळे देशाच्या क्रीडा दिनदर्शिकेत आणखी एका महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला.

जेरोम विनिथ चार्ल्स याच्या नेतृत्वाखालील 14 निवडक खेळाडूंचा भारतीय राष्ट्रीय संघ आणि सर्बियाचे प्रशिक्षक ड्रॅगन मिहाइलोविच यांनी  आज गांधीनगर येथे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली.

IMG_5474.JPG.jpeg

खेळाडूंना संबोधित करताना डॉ. मांडविया म्हणाले की, मोदी सरकार दीर्घकालीन नियोजन, अकादमींचा विकास, गुणवान खेळाडूंचा शोध, क्रीडा विज्ञानाचा अधिक वापर, खेळाडूंचे कल्याण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम  संधी यांद्वारे क्रीडा क्षेत्रासाठी एक भक्कम परिसंस्था उभारत आहे.

सर्व क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी घडवून आणणे आणि देशाला क्रीडा क्षेत्रातील आघाडीचे राष्ट्र म्हणून उदयाला आणणे हेच भारताच्या क्रीडाविषयक दूरदृष्टीचे प्राधान्य आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

व्हॉलीबॉल प्रकारात भारताच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास व्यक्त करताना डॉ मांडवीय म्हणाले की भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा देईल आणि सर्व स्तरांवर या खेळाच्या विकासाला नवी चालना मिळेल.

या संपूर्ण  स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत चमकदार कामगिरी करत साखळी फेरीत अपराजित राहून आशियातील काही अतिशय बलाढ्य संघांपुढे सातत्य आणि चिकाटीचे प्रदर्शन केले. 

IMG_5478.JPEG

भारतीय संघाने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बहारिनच्या संघाचा 3-1 असा पराभव करत कांस्य पदक पटवले. या विजयासह भारताने एव्हीसी पुरुष व्हॉलीबॉल चषक  स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकण्याचा मान मिळवला आणि या स्पर्धेतील आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली.

IMG_5479.JPEG

आपल्या संघाच्या वतीने भावना व्यक्त करताना कॅप्टन जेरोम विनिथ चार्ल्स याने केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हे ऐतिहासिक पदक भारतीय जनतेला अर्पण केले. 

केंद्र सरकारने दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षणाचे वातावरण, पुनर्वसन व्यवस्था आणि एकंदर सहाय्य यामुळे आम्ही संपूर्ण एकाग्रतेने आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करु शकलो, असे त्याने सांगितले. 

हे ऐतिहासिक पदक केवळ आमचे नाही तर त्या प्रत्येक भारतीयांचे आहे ज्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून संपूर्ण स्पर्धेदरम्यान आम्हाला प्रोत्साहित केले. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे आम्हाला प्रत्येक गुणासाठी लढण्याचे बळ मिळाले, असे तो म्हणाला. 

WhatsApp Image 2026-06-29 at 2.50.30 PM.jpeg

या कांस्यपदकामुळे भारताला एफआयव्हीबी  जागतिक क्रमवारीसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळाले. परिणामी, भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने जागतिक क्रमवारीत तब्बल 18 स्थानांची झेप घेत 60 व्या स्थानावरून 42 व्या स्थानावर मजल मारली. त्यामुळे जागतिक व्हॉलीबॉल क्षेत्रात भारताचे स्थान आणि प्रतिष्ठा आणखी बळकट झाली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279147) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu