युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी 'माय भारत' च्या वतीने देशभरात 'वंदे मातरम शिबिरांचे' आयोजन
युवकांना भारताच्या घटनात्मक आणि लोकशाही परंपरांविषयीच्या जाणिवा अधिक समृध्द करून देण्यासाठी निवासी शिबिरांचे आयोजन
कोलकाता येथे 24 ते 30 जून 2026 दरम्यान पहिल्या शिबिराचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाद्वारे, 'माय भारत' (मेरा युवा भारत) च्या माध्यमातून देशभरामध्ये 'वंदे मातरम शिबिरांचे' आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गतचे पहिले शिबीर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 24 ते 30 जून, 2026 या कालावधीत आयोजित केले जात आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये राष्ट्रीय एकात्मता, घटनात्मक मूल्ये आणि युवा नेतृत्व बळकट करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी केली आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्याने युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये सात दिवसांचे निवासी शिबीर आयोजित केले आहे. हा उपक्रम तरुणांना भारताच्या घटनात्मक आणि लोकशाही परंपरांची समज अधिक दृढ करण्याची संधी देणारा आहे. तसेच सांस्कृतिक आत्मविश्वास आणि नागरिकत्वाची जबाबदारी यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणारा आहे. ही शिबिरे 'विकसित भारत @2047' च्या संकल्पनेशी सुसंगत असून, त्याद्वारे सुजाण, जबाबदार आणि राष्ट्र-केंद्रित युवा नेतृत्वाची पिढी घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
'वंदे मातरम' या भावनेतून प्रेरणा घेवून 'वंदे मातरम शिबिरां’चे आयोजन केले आहे. यामध्ये मातृभूमीबद्दलचा आदर आणि प्रादेशिक, भाषिक तसेच सामाजिक सीमांच्या पलीकडे जाणारी भावनिक एकात्मता दर्शवली जाणार आहे. या कार्यक्रमातून नागरिकांचा सहभाग, नेतृत्व विकास, डिजिटल साक्षरता, सामाजिक जबाबदारी आणि समुदायांचा सहभाग यांना प्रोत्साहन देऊन तरुणांच्या समकालीन समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत निवडक जिल्ह्यांमध्ये एकूण 20 शिबिरे आयोजित केली जातील. प्रत्येक शिबिरात 15 ते 29 वयोगटातील 150 तरुण सहभागी होतील. यामध्ये प्रत्येक शिबिरात सहा राज्यांतील तरुणांचा सहभाग असेल. ईशान्येकडील राज्यांचे अनिवार्य प्रतिनिधित्व आणि किमान 50% महिला आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांमधील तरुणांचा सहभाग असेल. या शिबिरांचा लाभ सुमारे 3,000 तरुणांना मिळेल. यामध्ये घटनात्मक मूल्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ते नेतृत्व विकास, प्रमुख सरकारी योजनांपर्यंतच्या विविध विषयांचा समावेश असेल.
आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरांमध्ये 'वंदे मातरम'चे ऐतिहासिक महत्त्व आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका, राज्यघटना आणि नागरिकांची कर्तव्ये, भाषा-खाद्यसंस्कृती-क्रीडा यांच्या माध्यमातून होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी, 'राष्ट्र प्रथम' या विषयावरील संवाद आणि वक्तृत्व सत्रे होणार आहेत. नेतृत्व आणि लोकसहभाग वाढवण्याबाबतची कार्यशाळा, तसेच सरकारच्या प्रमुख उपक्रमांवरील चर्चा यांचाही समावेश असेल.
एकता, घटनात्मक मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी भारतातील तरुणांची ऊर्जा, आदर्शवाद आणि सर्जनशीलता यांचा उपयोग करण्याबाबतच्या मंत्रालयाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चारही 'वंदे मातरम' शिबिरांच्या आयोजनातून होत आहे.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277206)
आगंतुक पटल : 12