गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आयोजित धन्यवाद सभेला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले


स्वतंत्र भारताच्या इतिहासात देशाचे सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाची नोंद, विकास, सांस्कृतिक पुनर्जागरण, सुरक्षित भारत आणि उंचावलेल्या जागतिक प्रतिष्ठेचे  युग म्हणून घेतली जाईल

₹1,500 कोटींच्या खर्चातून विकसित होत असलेल्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या शुभारंभाने महाराष्ट्रात श्रद्धा आणि संस्कृतीवर आधारित सुशासनाच्या नव्या पर्वाची सुरुवात

"हा देश काही धर्मशाळा नाही; घुसखोरांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी केली  जाईल" — कोल्हापुरातून केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्पष्ट संदेश

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2026 5:09PM by PIB Mumbai


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आयोजित 'धन्यवाद सभेत' प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-06-20 at 16.20.07.jpeg

केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशक्य मानली जाणारी अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण केली असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले. प्रभू श्रीरामांच्या कृपेने 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि आज अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर  दिमाखात उभे आहे. यासोबतच काशी विश्वनाथ कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली असून केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामचा जीर्णोद्धार करण्यात आला. सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा सुवर्णाने मढवले जात आहे. माता कामाख्या देवीचा कॉरिडॉर तयार होत असून, आता अंबाबाई मंदिराचा कॉरिडॉर उभारण्याच्या कामालाही सुरुवात झाली असल्याचे शाह यांनी सांगितले. विकास भी, विरासत भी या मंत्राचा अवलंब करत आज देशभरात सांस्कृतिक पुनरुत्थानाचा एक नवा काळ साकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासाची कामे सुरू आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे शहा म्हणाले.

गेल्या 12 वर्षांत अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि कॉरिडॉर बांधकामाच्या कामाला सुरुवात होणे, ही  देखील अनेक महत्त्वपूर्ण कामगिरींपैकी एक आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाषांचे संवर्धन, संस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि देशाच्या सीमांचे संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये केवळ काम सुरू झाले  नाही, तर या उपक्रमांना अविचल गतीने सिद्धीपर्यंत पोहोचवण्यासाठीही सातत्यपूर्ण प्रयत्न केले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या बांधकामाला सुरुवात करून, महाराष्ट्रातील धर्म आणि सांस्कृतिक जागृतीच्या राज्याला पुन्हा एकदा नवी उंची देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

WhatsApp Image 2026-06-20 at 16.22.08.jpeg

नुकताच नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा नवा विक्रम स्थापित केला आहे. जेव्हा स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही 12 वर्षे भारताचा विकास, सांस्कृतिक पुनर्जागरण, सुरक्षित भारताची निर्मिती तसेच जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा आणि सन्मान यांची वर्षे म्हणून नोंद घेतली जाईल असे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील या 12 वर्षांत, आपल्या सरकारने सोमनाथपासून गंगासागरपर्यंत देशभरातील जनतेचा पाठिंबा, विश्वास आणि आत्मविश्वास संपादन केला आहे, असे त्यांनी नमूद केले. केवळ बंगालच्या सीमेवरून होणारी घुसखोरी पूर्णपणे रोखली जाणार नाही, तर देशभरातील प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांना हद्दपार केले जाईल, हे त्यांनी अधोरेखित केले. “हा देश धर्मशाळा नाही”, असे त्यांनी निक्षून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच, प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व काम केले गेले आहे, असेही ते म्हणाले. ग्रामीण विकास असो, शहरी विकास असो, कृषी समृद्ध करण्यासाठी सहकार मंत्रालयाची निर्मिती असो, शहरी नियोजनासाठी नवीन मानके स्थापित करणे असो, किंवा प्रोत्साहन  आधारित योजनेद्वारे भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे असो, या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

WhatsApp Image 2026-06-20 at 16.21.22.jpeg

ते म्हणाले की, सेमीकंडक्टर, क्वांटम इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर, डेटा सेंटर्स आणि नव्या युगातील तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रांमध्ये भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी ठोस  सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण चांद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आणि ‘शिवशक्ती पॉइंट’ची स्थापना करून सर्व भारतीयांच्या मनात अभिमान आणि आनंद निर्माण केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेकडो वर्षांपासून देवीचे वास्तव्य असलेल्या पवित्र करवीर क्षेत्रातील कोल्हापूरच्या माता अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण काम सुरू केले आहे. राज्य सरकार करवीर नगरीतील श्री अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिर कॉरिडॉरचे बांधकाम करत आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹1,500 कोटी असून तो 28,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रात विकसित केला जाणार आहे. त्यांनी सांगितले की, 7 व्या शतकात स्थापन झालेल्या या प्राचीन मंदिराच्या पुनर्विकासादरम्यान पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने परिसरातील सुमारे 41 लहान-मोठ्या मंदिरांच्या संवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. मंदिर संकुलात एआय-आधारित सुरक्षा कॅमेरे, एलईडी प्रकाश सजावट, खुली गॅलरी, हेरिटेज वॉकवे, लाईट अँड साउंड शो, बहुउद्देशीय सभागृह, अन्नछत्र, पोलीस ठाणे आणि हेरिटेज प्रांगण यांसह भाविकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.  शाह यांनी पुढे सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोल्हापूरचे हे पवित्र तीर्थक्षेत्र पूर्ण विकसित आध्यात्मिक स्थळामध्ये रूपांतरित होईल. यामुळे अंबाबाई मातेच्या लाखो भक्तांमध्ये भक्तिभाव अधिक दृढ होईलच, शिवाय कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची संधी मिळेल आणि विशेषतः तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. त्यांनी पुढे सांगितले की, ₹1,500 कोटी ही मोठी रक्कम नाही, कारण ज्या पवित्र स्थळांमध्ये आपला इतिहास, श्रद्धा आणि संस्कृती नांदते, अशा स्थळांचा विकास आणि गौरव करणे हे सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.

WhatsApp Image 2026-06-20 at 16.24.28.jpeg

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2275753) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati