राष्ट्रपती कार्यालय
मध्य प्रदेशात ओंकारेश्वर येथे आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनाच्या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपतींची उपस्थिती
अनुवंशिक आजारांच्या तपासणीसाठी 'राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम' हा जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2026 1:24PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशात ओंकारेश्वर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनाच्या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (19 जून 2026) उपस्थित राहिल्या.

आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिन साजरा करणे हा आरोग्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या आव्हानाचा सामना करण्याच्या दिशेने केलेला एक अर्थपूर्ण प्रयत्न आहे असे यावेळी बोलताना राष्ट्रपती यांनी सांगितले. 'राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमे'अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट नियोजित वेळेआधीच पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नवजात बालकांपासून ते वय वर्ष 40 या वयोगटातील सात कोटी लोकांची तपासणी करणे ही सामान्य कामगिरी नाही; अनुवांशिक आजारांच्या तपासणीसाठी जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी हा एक आहे, असे त्या म्हणाल्या.

आतापर्यंत सुमारे 2.5 लाख लोकांमध्ये सिकल सेल आजार असल्याचे आढळून येणे तसेच 20 लाखांहून अधिक रुग्ण या आजाराचे वाहक असल्याचे निश्चित होणे हा 'मिशन मोड' अर्थात मोहिम स्वरूपात राबवलेल्या तपासणीचाच परिणाम आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या वाहकांमुळे निर्माण होणारी आव्हाने समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सिकल सेल आजाराचे रुग्ण आणि वाहक यांची केवळ ओळखच पटवली नाही, तर त्यांना योग्य आरोग्यसेवा पुरवण्याबाबत खात्री केल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे कौतुक केले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" अंतर्गत चार लाखांहून अधिक महिलांची तपासणी करण्याचा विक्रम प्रस्थापित करून मध्य प्रदेश राज्याने सिकल सेल आजाराच्या समस्येचे निराकरण करण्यात अमूल्य योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेश सरकारने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त "सिकल मित्र" हा उपक्रम सुरू केला होता असे राष्ट्रपतींनी नमूद केले. या उपक्रमांतर्गत, जनजागृती करण्यासाठी आणि रुग्णांना मदत पुरवण्यासाठी शासकीय तसेच बिगर-शासकीय संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि एनसीसी कॅडेट्स यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सर्व राज्यांच्या एकत्रित बळावर आणि सक्रिय सहभागातून, 2047 सालापूर्वीच देशातून सिकलसेल-संबंधित आजार पूर्णपणे नष्ट करण्याचे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
***
नाना मेश्राम/संदेश नाईक/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2275151)
आगंतुक पटल : 11