सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांगत्व सक्षमीकरण विभागाचे संयुक्त सचिव गिरीश सी. होसूर यांनी दिली 'अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटीज (दिव्यांगजन)' मुंबईला भेट; महत्त्वाच्या सुविधा आणि सेवांचा आढावा घेत दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे पुनर्वसन (टेलि-रिहॅबिलिटेशन) आणि ध्वनीमुद्रण कक्षाचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 9:58PM by PIB Mumbai
मुंबई, 12 जून 2026
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत असलेल्या दिव्यांगत्व सक्षमीकरण विभागाचे संयुक्त सचिव गिरीश सी. होसूर यांनी आज मुंबईत, 'अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटीज (दिव्यांगजन)' [एवायजेएनआयएसएचडी(डी)], या राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगत्व संस्थेला भेट दिली.
संस्थेला भेट दिल्याबद्दल गिरीश सी. होसूर यांचे, ‘एवायजेएनआयएसएचडी(डी)’ चे संचालक सुमन कुमार यांनी मनापासून स्वागत केले आणि त्यांचा सत्कार केला. संचालकांनी संयुक्त सचिवांची विविध विभागांच्या प्रमुखांशी ओळख करून दिली. त्यामुळे त्यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली. यानंतर संस्थेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी संयुक्त सचिवांना संस्थेचे विद्यमान कार्यक्रम, सेवा आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. वाचा, भाषा आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी तसेच या सेवा समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक विभागाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान होसूर यांनी 'क्रॉस डिसेबिलिटी अर्ली आयडेंटिफिकेशन अँड इंटरव्हेन्शन सेंटर' (सीडीईआयसी) हे बहुविध दिव्यांगत्व प्रारंभिक ओळख आणि उपचार केंद्र , श्रवणशास्त्र(ऑडिओलॉजी) विभाग, वाचा आणि भाषा विकार शास्त्र (स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी) विभाग, माहिती आणि दस्तऐवजीकरण केंद्र, संस्थेचे ग्रंथालय आणि मानसशास्त्र विभाग यांसह अनेक महत्त्वाच्या विभागांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आणि सेवांचा आढावा घेतला. त्यांनी सध्या बांधकामाधीन असलेल्या नवीन वसतिगृह इमारतीलाही भेट दिली.

संयुक्त सचिवांच्या हस्ते दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे पुनर्वसन (टेलि-रिहॅबिलिटेशन) आणि ध्वनीमुद्रण कक्षाचे (व्हॉईस रेकॉर्डिंग रूम') उद्घाटन करण्यात आले. सेवा वितरण आणि जनसंपर्क विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नव्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

सीडीईआयसी येथे डॉ.सुनि मॅथ्यू यांनी 0 ते 6 वर्षे वयोगटातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या बालकांना दिल्या जाणाऱ्या विविध उपचार पद्धती आणि सेवांची माहिती दिली. मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी दिव्यांगत्वाची प्रारंभिक ओळख, वेळेवर हस्तक्षेप आणि सर्वांगीण पुनर्वसन किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

गिरीश सी. होसूर यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय, शैक्षणिक आणि समुदाय-आधारित सेवा प्रदान करण्यातील ‘एवायजेएनआयएसएचडी(डी)'च्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले. सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीस हातभार लावण्यासाठी संस्थेने आपले जनजागृती आणि विस्तार कार्यक्रम, संशोधन उपक्रम आणि क्षमता-विकास कार्यक्रम अधिक बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272368)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English