संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण खरेदी, आयडेक्स, टीपीसीआर आणि चाचणी प्रक्रियांविषयी एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी कार्यशाळेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 10:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

संरक्षण खरेदी, ‘इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स’ (आयडेक्स), ‘टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह कॅपॅबिलिटी रोडमॅप’ (टीपीसीआर) आणि एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी चाचणी प्रक्रियांविषयी कार्यशाळेचे आयोजन 11 आणि 12 जून 2026 रोजी दिल्ली छावणी येथील माणेकशॉ सेंटरमध्ये करण्यात आले आहे. एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाच्या (एचक्यू आयडीएस) स्वदेशीकरण संचालनालय आणि ‘सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज’ (सीईएनजेओडब्ल्यूएस) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रातील परिसंस्थेत एमएसएमई आणि स्टार्टअप्सचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाद्वारे उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संरक्षण खरेदी प्रक्रिया, स्वदेशीकरण उपक्रम, आयडेक्सची रूपरेषा, चाचणी आणि प्रमाणन प्रक्रिया तसेच टीपीसीआर यांविषयी सखोल माहिती मिळण्यासाठी संवादात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. एचक्यू आयडीएस, विविध सेवा मुख्यालये, डीजीक्यूए, आयडेक्स-डीआयओ आणि इतर संबंधित संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ विविध सत्रांमध्ये सहभागींसोबत संवाद साधणार आहेत.

उद्घाटन सत्रात एकात्मिक संरक्षण कर्मचारी दलाचे उपप्रमुख (धोरण नियोजन आणि दल विकास) एअर मार्शल प्रवीण केशव व्होरा आणि सीईएनजेओडब्ल्यूएसचे महासंचालक मेजर जनरल (डॉ.) अशोक कुमार (निवृत्त) यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. पहिल्या दिवसातील सत्रांमध्ये संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया, खरेदीच्या विविध श्रेणी, महसूल खरेदी निकष, स्वदेशीकरण सुधारणा, ‘सृजन’ पोर्टल, आयात पर्याय नकाशीकरण आणि बौद्धिक संपदा हक्क यांसारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे.

दुसऱ्या दिवशी आयडेक्स उपक्रम, नमुना (प्रोटोटाइप) विकास, चाचणी आणि मूल्यमापन प्रक्रिया, प्रमाणन प्रणाली, वापरकर्ता चाचण्या, पर्यावरणीय चाचण्या, संशोधन व विकास क्षेत्रातील डीआरडीओची भूमिका आणि तंत्रज्ञान सज्जता पातळी या विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय टीपीसीआर विषयावरील विशेष सत्र आणि व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांसोबत परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

उद्योग क्षेत्रातील सहभागींसमोरील व्यावहारिक अडचणी संवादात्मक चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तर सत्रांद्वारे सोडविण्यावर या कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ देणे आणि भारतीय उद्योग तसेच संरक्षण दल यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणे, अशी अपेक्षा या उपक्रमाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271837) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil