वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताचे औषधनिर्माण क्षेत्र हे परवडणारी आरोग्यसेवा आणि जागतिक कल्याणाप्रती असलेली कटिबद्धता दर्शवते: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 10:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताचे औषधनिर्माण क्षेत्र हे जगभरात दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेची व्यापक उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
नवी दिल्ली येथे औषधनिर्माण क्षेत्रावरील जागतिक राजदूत बैठकीला संबोधित करताना गोयल यांनी नमूद केले की, भारताचे 'वसुधैव कुटुंबकम' हे सांस्कृतिक तत्त्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'एक पृथ्वी, एक आरोग्य' हा दृष्टिकोन, देशाची आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रातील वाटचालीला सातत्याने मार्गदर्शन करत आहे.
एक विश्वासार्ह जागतिक औषधनिर्माण भागीदार म्हणून असलेली भारताची भूमिका अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की या क्षेत्राने गुणवत्ता, विश्वसनीयता आणि परवडणारी किंमत यांचा मेळ घालण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. कोविड-19 महामारीचा संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की, भारताने केवळ देशांतर्गत गरजाच पूर्ण केल्या नाहीत तर अनेक देशांना विशेषतः 'ग्लोबल साउथ' आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना औषधे आणि लसींचा पुरवठाही केला.
गोयल म्हणाले की, विश्वास, नावीन्य आणि भागीदारी हा भारताच्या औषधनिर्माण क्षेत्राच्या सामर्थ्याचा पाया आहे. त्यांनी नमूद केले की या उद्योगाची प्रस्थापित गुणवत्ता मानके आणि उत्पादन क्षमतांमुळे भारतीय औषधे जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जातात. त्यांनी संशोधन, नावीन्य, प्रगत तंत्रज्ञान तसेच उच्च-मूल्याच्या उत्पादनांवर या क्षेत्राचे वाढते लक्ष असल्याचेही अधोरेखित केले आणि जागतिक कंपन्यांना भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले.
मंत्र्यांनी सांगितले की, भारत एक नवप्रवर्तक, उत्पादक, परवडणाऱ्या औषधांचा विश्वसनीय पुरवठादार, प्रगत आरोग्यसेवा तंत्रज्ञानातील भागीदार आणि कंत्राटी उत्पादनासाठीचे केंद्र म्हणून जगाची सेवा करण्यास सुसज्ज आहे.
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी लवचिक आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील जागतिक सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, वाढीव नियामक सहकार्य आणि अधिक मजबूत आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे औषधांची उपलब्धता सुधारण्यास तसेच जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याच्या परिणामांना पाठिंबा मिळण्यास मदत होईल.
आयफेक्स 2026 (iPHEX 2026) 7 ते 9 सप्टेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात 700 हून अधिक प्रदर्शक, 600 हून अधिक परदेशी व्यावसायिक प्रतिनिधी आणि सुमारे 25,000 देशांतर्गत अभ्यागत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक राजदूत बैठकीमध्ये 98 देशांतील राजदूत, उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी तसेच औषधनिर्माण उद्योग, नियामक, आरोग्यसेवा क्षेत्रातील भागधारक आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271321)
आगंतुक पटल : 6