गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
मंत्रिमंडळाची आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानी शहरात केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या उभारणीस मंजुरी
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2026 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील नव्या राजधानी शहर अमरावती येथे केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या (सीजीजीपीओए) उभारणीला मंजुरी देण्यात आली.
जागतिक दर्जाचे शहरी केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या अमरावती या नव्या ग्रीनफिल्ड शहरातील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध केंद्रीय शासकीय कार्यालयांच्या वाढत्या जागेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना एकाच छताखाली आणणे, हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल आणि आंध्र प्रदेश राज्याला केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होईल.
अमरावती येथील केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलासाठी 5.53 एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या संकुलामध्ये दोन इमारती असतील. सी-9 भूखंडावरील पहिल्या इमारतीत तळमजल्यासह 13 मजले असतील. यामध्ये तळमजला सेवांसाठी, तीन मजले पोडियम पार्किंगसाठी आणि दहा मजले कार्यालयीन वापरासाठी असतील. सी-8 भूखंडावरील दुसऱ्या इमारतीत तळमजल्यासह 10 मजले असतील. यामध्ये तळमजला सेवांसाठी, तीन मजले पोडियम पार्किंगसाठी आणि सात मजले कार्यालयीन वापरासाठी असतील.
या संकुलामध्ये सुमारे 8,000 अधिकारी आणि कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे 1,800 समतुल्य चारचाकी वाहनांसाठी (ईसीएस) पोडियम पार्किंगची सुविधा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 23,25,000 चौरस फूट (2,16,032 चौरस मीटर) इतके असेल.
अमरावती येथील या केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलात कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी आवश्यक नागरी व सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये एटीएमसह बँक, टपाल कार्यालय, पाळणाघर, मनोरंजन कक्ष, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, 100 आसनक्षमतेचे परिषद सभागृह, 500 आसनक्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह तसेच चार उपहारगृहांचा समावेश आहे.
पूर्व-प्रकल्प उपक्रम
हा प्रकल्प केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) राबविणार आहे. निविदा प्रक्रियेपूर्वीची तयारी सुरू झाली असून सध्या निविदा कागदपत्रे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
PROPOSED CENTRAL GOVERNMENT GENERAL POOL OFFICE ACCOMMODATION (CGGPOA) AT NEW CAPITAL CITY, AMARAVATI, ANDHRA PRADESH


* * *
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271259)
आगंतुक पटल : 9