इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल इंडिया भाषिणी आणि  काठमांडू विद्यापीठ यांच्यात ‘व्हॉइस फर्स्ट’ या नेपाळसाठीच्या भाषांतर मंचासाठी सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 06 JUN 2026 9:46PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या  डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने  नेपाळमधील काठमांडू विद्यापीठाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रासोबत भाषा कृत्रिम बुद्धिमत्ता, बहुभाषिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक डिजिटल परिसंस्था विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारावर डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग आणि काठमांडू विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. बालकृष्ण बाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या कराराची देवाणघेवाण भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खानाल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान करण्यात आली. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या भारत आणि नेपाळच्या सामाईक वचनबद्धतेचे या प्रसंगी दर्शन घडले.

या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही संस्था उच्च दर्जाचे नेपाळी भाषेचे माहितीसंच, ध्वनी माहितीसंच आणि बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधने विकसित करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. यामध्ये भाषण ते मजकूर (स्पीच-टू-टेक्स्ट), मजकूर ते भाषण (टेक्स्ट-टू-स्पीच), यंत्राधारित भाषांतर (मशीन ट्रान्सलेशन) तसेच बहुभाषिक संवादक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचा समावेश असेल.

ही भागीदारी भारत-नेपाळ क्षेत्रातील अल्पसंसाधित आणि दुर्लक्षित भाषांचा भाषिक व साहित्यिक वारसा जतन आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीही सहाय्य करेल. डिजिटल युगात अस्तित्वाच्या धोक्याला सामोरे जाणाऱ्या भाषिक समुदायांना त्यांच्या मातृभाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने आणि सेवा उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात विशेष भर दिला जाणार आहे.

या भागीदारीमुळे नेपाळमधील नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी नवीन आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, कौशल्यविकास, डिजिटल व्यापार आणि सार्वजनिक सेवांमध्ये बहुभाषिक प्रवेश सुलभ होऊन नेपाळ तसेच प्रादेशिक आणि जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक संधी उपलब्ध होतील.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2269938) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English