आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत डिजिटल मिशनने ओलांडला 90 कोटी आभा (ABHA) खात्यांचा महत्त्वपूर्ण टप्पा


आभा खात्यांची निर्मिती 2021 मधील 14.7 कोटींवरून 2026 मध्ये 90 कोटींहून अधिक

15.3 कोटींहून अधिक आभा खात्यांसह उत्तर प्रदेश देशात आघाडीवर; राजस्थान आणि महाराष्ट्रानेही ओलांडला सात कोटींचा टप्पा

Posted On: 30 MAY 2026 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे (एनएचए) राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनने (एबीडीएम) देशभरात 90 कोटी आयुष्मान भारत आरोग्य खात्यांचा (ABHAs) महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. डिजिटलदृष्ट्या बळकट आरोग्यसेवा प्रणाली उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असून हे यश नागरिक-केंद्री डिजिटल आरोग्य प्रणाली उभारण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

आभा ही एक 14-अंकी डिजिटल आरोग्य ओळख आहे. ही ओळख नागरिकांना त्यांच्या संमतीने त्यांच्या आरोग्य नोंदी सुरक्षितपणे जोडण्यास, मिळवण्यास आणि सामायिक करण्यास सक्षम बनवते. एबीडीएम’च्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक असलेल्या आभामुळे विविध आरोग्य सेवा प्रदाते, सुविधा आणि डिजिटल आरोग्य ॲप्लिकेशन्समध्ये दीर्घकालीन आरोग्य नोंदी तयार करता येतात. यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक माहितीवर अधिक नियंत्रण मिळवता येते.

हा टप्पा गाठण्यात देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भक्कम योगदान दिले आहे. 15.3 कोटींहून अधिक आभा खात्यांसह उत्तर प्रदेश देशात आघाडीवर आहे. त्या खालोखाल राजस्थान आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी प्रत्येकी 7.1 कोटी तर बिहाराने 6.3 कोटी आणि पश्चिम बंगालने 5.9 कोटी आभा खाती तयार केली आहेत. 

हे यश भारतातील डिजिटल आरोग्य व्यवस्थेमध्ये महिलांचा वाढता सहभाग देखील दर्शवते. तयार झालेल्या एकूण आभा खात्यांपैकी जवळपास निम्मी महिलांची आहेत, म्हणजेच त्यांचे प्रमाण एकूण आभा धारकांपैकी 49.75% आहे. ग्रामीण भागातील महिलांसह सर्व महिलांना त्यांच्या आरोग्य नोंदींमध्ये सुरक्षित डिजिटल प्रवेश देऊन सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आभा’मुळे आरोग्य व्यवस्थित पहिल्या संपर्कापासूनच उपचारांची सातत्यपूर्ण नोंद ठेवता येते. यात माता आणि बाल आरोग्यसेवा, लसीकरण आणि तसेच इतर आवश्यक आरोग्य सेवांचा समावेश आहे.

 

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267083) अभ्यागत कक्ष : 16