आयुष मंत्रालय
संतुलन आणि सामूहिक आरोग्यासाठी योग प्रभावी - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
लोणावळा इथल्या कैवल्यधाम इथे 'भारतीय योग संघटने'द्वारे आयोजित 'योगोत्सव 2026' चे आयुष मंत्रालयाकडून स्वागत
प्रविष्टि तिथि:
29 MAY 2026 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2026
आयुष मंत्रालयाने 29 आणि 30 मे 2026 रोजी महाराष्ट्रात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या 'भारतीय योग संघटनेची 6 वी राष्ट्रीय परिषद 'योगोत्सव 2026' चे स्वागत केले आहे.
"योगातील विविधतेचा उत्सव" या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा उद्देश देशभरातील योगाचार्य, धोरणकर्ते, संशोधक, शिक्षक, आरोग्य क्षेत्रातले नामांकित , संस्था आणि युवा प्रतिनिधींना एकत्र आणून भारत आणि जागतिक स्तरावर योगाच्या भविष्यातील वाटचालीवर विचारमंथन करणे हा आहे.
विविध योग परंपरांमधल्या एकतेच्या महत्त्वावर बोलताना, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले: "योग हे मानवतेला दिलेले भारताचे सर्वांत मोठे योगदान आहे. परंपरा परस्पर आदर, खुलेपणा आणि एका सामायिक उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा योग केवळ एक सराव न राहता, सुसंवाद, सामूहिक कल्याण आणि मानवी एकतेसाठी एक सामर्थ्यशाली शक्ती बनतो. योगाचार्य, संस्था, संशोधक, युवा नेते आणि योग अभ्यासक संवाद आणि सहकार्याच्या भावनेने 'योगोत्सव 2026' मध्ये एकत्र येताना पाहणे अत्यंत आनंददायी आहे."
आयुष मंत्रालय 'योगोत्सव' सारख्या मंचांकडे भारतीय योग परंपरेची तात्विक खोली जपत, विविध योग परंपरा, संस्था, शिक्षक, उपचारक आणि संशोधक यांच्यात सहकार्य मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पाहते.
जगातल्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित योग संस्थांपैकी एक असलेल्या आणि जागतिक स्तरावर नावाजलेल्या 'कैवल्यधाम योग संस्थे'त आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचा उद्देश, पारंपरिक योग परंपरा आणि योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या समकालीन संस्था यांच्यात अर्थपूर्ण संवादाला चालना देणे हा आहे.
"योगातील विविधतेचा उत्सव" ही संकल्पना भारताच्या सर्वसमावेशक योग परंपरेचे दर्शन घडवते, त्यात अनेक संप्रदाय, विचारप्रवाह आणि पद्धती एकाच वेळी अस्तित्वात आहेत, आणि तरीही ते सुसंवाद, आत्म-जागरूकता आणि सर्वांगीण कल्याणाच्या सामायिक ध्येयासाठी एकत्र जोडलेले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून, 'भारतीय योग संघटना' भारत आणि परदेशात विस्तारत असलेल्या योगाच्या अनेक प्रवाहांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि सामूहिक वाढीला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे.
"ट्रॅडिशन्स इन प्रॅक्टिस – डेमॉन्स्ट्रेशन बाय लिव्हिंग लिनेजेस ऑफ योग” हा अनुभवजन्य प्रात्यक्षिक विभाग हे योगोत्सव 2026 चे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामध्ये देशभरातील प्रमुख योग संस्था आणि योगगुरूंद्वारे आसन, प्राणायाम, ध्यान, मंत्रोच्चार, चक्रीय ध्यान, योग निद्रा, उपचारात्मक योग, भारत योग गती आणि जागरुकता आदि पद्धतींचे सादरीकरण केले जाईल.
भारत आणि परदेशातील योग शिक्षक, उपचारक, संशोधक, संस्था, धोरणकर्ते आणि योग अभ्यासकांच्या सहभागामुळे, 'योगोत्सव 2026' हा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा राष्ट्रीय मंच म्हणून उदयाला येईल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे जागतिक आरोग्य आणि कल्याणासाठी योगाचा प्रसार करण्यात भारताचे नेतृत्व अधिक बळकट होईल.




निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2266842)
आगंतुक पटल : 40