युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मेघालय सरकारमधील मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसह राज्यातील क्रीडा आणि युवा विकासविषयक उपक्रमांचा घेतला आढावा


क्रीडाविषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, मुलभूत पातळीवरील प्रतिभांचा विकास करणे, तरुणांचा सहभाग तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सुधारित सहकार्य यावर चर्चा

Posted On: 29 MAY 2026 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

मेघालयात सध्या सुरु असलेल्या क्रीडा आणि युवा विकासविषयक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहयोग आणखी बळकट करण्याचे मार्ग शोधण्यासाठी आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मेघालय राज्य सरकारमधील क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री वैलाद्मिकी शायला आणि आयुक्त आणि सचिव डॉ.विजय कुमार डी. यांच्यासोबत व्यापक आढावा बैठक झाली.

मेघालय राज्य सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेघालय राज्य ऑलिम्पिक संघटना या संस्थांचे ज्येष्ठ अधिकारी तसेच राज्यातील क्रीडा आणि युवा विकास विषयाशी संबंधित इतर भागधारक या बैठकीला उपस्थित होते.  

सदर बैठकीमध्ये मेघालयमधील क्रीडा परिसंस्था, तरुणांचा सहभाग असलेले उपक्रम, पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच मुलभूत पातळीवरील सहभाग बळकट करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेले खेळाडू विकास कार्यक्रम या विषयांबाबत तपशीलवार चर्चा झाली.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी तरुण तसेच क्रीडासंबंधित कार्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाधारित सहाय्य योजना, लक्ष्यित युवा विकास योजना तसेच खेळाडूंसाठी देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांसह क्रीडा क्लब्स, संघटना आणि खेळाडूंना मदत करण्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्य क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सध्या सुमारे 900 खेळाडूंना सहाय्य करण्यात येत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.

दक्षिण अमेरिकेतील यशस्वी फुटबॉल विकास नमुन्यांकडून प्रेरणा घेत मुख्यमंत्री फुटबॉल अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेल्या मेघालयाच्या मुलभूत पातळीवरील महत्त्वपूर्ण उपक्रमांबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या उपक्रमात सध्या मुलभूत पातळीवरील 125 केंद्रे कार्यान्वित असून त्याद्वारे सुमारे 10,000 खेळाडूंना मदत करण्यात येत आहे आणि सदर उपक्रमाने मेघालय राज्यातून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटूंच्या उदयामध्ये योगदान दिले आहे.

आज घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये मावखानू फुटबॉल स्टेडीयमच्या उभारणी कार्यात होत असलेल्या प्रगतीसह राज्यातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या योजनांचा देखील समावेश होता. मावखानू फुटबॉल स्टेडीयम हे उभारणीनंतर त्या प्रदेशातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडीयमपैकी एक असेल आणि राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या उद्घाटन समारंभासाठी संभाव्य कार्यक्रमस्थळ म्हणून या स्टेडीयमचा विचार करण्यात येत आहे. उमथाम येथील उमसावली क्रीडा संकुल आणि स्लालम कोर्स यांचा देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला.

उमथाम येथील स्लालम कोर्स हा जलक्रीडा स्पर्धांसाठी आणि स्लालम प्रशिक्षणासाठी देशातील प्रमुख सुविधा म्हणून उदयाला येत आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी बैठकीत बोलताना क्रीडाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याचे महत्त्व, तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन तसेच कमाल प्रमाणात प्रभाव साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यादरम्यान एकत्रीकरण सुनिश्चित करणे यावर अधिक भर दिला.

या बैठकीत मेघालयाच्या युवा-केंद्रीत उपक्रमांचा देखील आढावा घेण्यात आला. युवावर्गाशी संबंधित कार्यक्रम हाती घेणारे क्लब्स आणि संघटना यांना ज्या योजनेंतर्गत मदत दिली जाते त्या, विद्यार्थ्यांसाठीच्या युवा सहभाग आणि सक्षमीकरण योजनेचा (वायईएसएस, मेघालय) देखील या आढाव्यात समावेश होता.

तरुणांचा सहभाग आणि स्वयंसेवी प्रतिबद्धता विस्तारण्यात माय भारत मंचाच्या भूमिकेची देखील चर्चा झाली, विशेषतः माय भारत पोर्टलच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसह  आगामी क्रीडा कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवाविषयक संधी निर्माण करण्याच्या संदर्भात उहापोह झाला.

एमएसओए चे कार्याध्यक्ष आणि मेघालय शुटींग संघटनेचे अध्यक्ष जॉन एफ. खारशिंग; मेघालय ॲथलेटिक्स संघटनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि एमएसओएचे सदस्य ईएमएच पसाह; मेघालय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आणि एमएसओएचे संयुक्त सचिव प्यानबियांग लालू; अखिल मेघालय कराटे संघटनेचे महासचिव आणि एमएसओएचे खजिनदार सान कुपर वर्जरी यांनी या चर्चांमध्ये भाग घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी होतकरु खेळाडूंसाठी सशक्त मार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया-मान्यताप्राप्त अकादमी अधिक मजबूत करण्याच्या आणि  राज्यातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांना खेळाडू विकास प्रणालींशी जुळवून घेण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला.  

मेघालयातील क्रीडा प्रकार आणि दीर्घकालीन विकास नियोजनाशी संबंधित मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्या.

मेघालय राज्यात आणि विस्तृत ईशान्य प्रदेशात क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, खेळाडू पाठबळ यंत्रणा तसेच युवा विकास उपक्रमांना बळकटी देण्यासाठी मंत्रालय मेघालय राज्य सरकारसह एकत्र येऊन काम करत आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला.

मेघालयामध्ये अमर्याद क्रीडाविषयक क्षमता आणि चैतन्यमय युवा परिसंस्था आहे असे सांगून केंद्र सरकार, राज्य सरकार, क्रीडा संस्था आणि सामाजिक संघटना यांच्यातील समन्वयित प्रयत्न प्रतिभेची जोपासना करण्यात आणि देशातील सशक्त क्रीडा संस्कृतीची संकल्पना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावतील यावर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे अधिक भर दिला.


नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266641) अभ्यागत कक्ष : 19