संरक्षण मंत्रालय
16 व्या संरक्षण धोरण संवादादरम्यान भारत आणि सिंगापूर यांनी धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेतला
संरक्षण सचिव आणि स्थायी सचिव (संरक्षण) यांनी संरक्षण उद्योग आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर केली चर्चा
नियमावर आधारित खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार
Posted On:
28 MAY 2026 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि स्थायी सचिव (संरक्षण) जोसेफ लिओंग यांनी 28 मे 2026 रोजी सिंगापूर येथे 16 व्या भारत-सिंगापूर संरक्षण धोरण संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवले. दोन्ही सचिवांनी संरक्षण उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण सहकार्य, लष्करी उपक्रम, संरक्षण उद्योग सहयोग, क्षमता बांधणी आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर व्यापक चर्चा केली. त्यांनी धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि उद्योगांमधील सहकार्यासह परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नवीन मार्गांचाही शोध घेतला.

सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी सुरक्षा, मानवरहित प्रणाली आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या विशिष्ट आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही उभय देशांनी चर्चा केली. बदलत्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाधारित भागीदारी आणि अधिक सखोल सहकार्याच्या महत्त्वावर या चर्चेत भर देण्यात आला.
आसियानच्या नेतृत्वाखालील यंत्रणा आणि आसियान संरक्षण मंत्री बैठकीच्या (ADMM-Plus) चौकटीसह, प्रादेशिक आणि बहुपक्षीय मंचांवर भारत आणि सिंगापूर यांच्यातील निरंतर सहकार्याचे दोन्ही देशांनी कौतुक केले. हिंद-प्रशांत क्षेत्रात व्यावहारिक आणि रचनात्मक संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देताना खुल्या, सर्वसमावेशी आणि नियमांवर आधारित प्रादेशिक सुरक्षा रचनेला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा उभयतांनी पुनरुच्चार केला.

भारत-सिंगापूर धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी सातत्यपूर्ण उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि अधिक सखोल संस्थात्मक सहकार्याच्या महत्त्वावर या संवादात भर देण्यात आला. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि अधिक घनिष्ठ सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

सिंगापूर सशस्त्र दलाच्या डिजिटल आणि गुप्तचर सेवेच्या डिजिटल ऑपरेशन्स टेक्नॉलॉजी सेंटरलाही संरक्षण सचिवांनी भेट दिली. या भेटीमुळे सिंगापूर सशस्त्र दलाच्या डिजिटल आणि तांत्रिक क्षमतांविषयी मौल्यवान माहिती मिळाली. यामुळे युद्धाच्या विशिष्ट आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भारतीय संरक्षण दलांसोबत सहयोगाची शक्यता पडताळण्यात मदत होईल.
* * *
सोनाली काकडे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266418)
अभ्यागत कक्ष : 17