युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 75 व्या आवृत्तीनिमित्त विविध उपक्रमांमध्ये देशवासियांचा मोठा सहभाग; भारताच्या भव्य राष्ट्रकुल दिन सोहळ्याचे अहमदाबादने केले नेतृत्व

Posted On: 24 MAY 2026 1:41PM by PIB Mumbai



 फिट इंडिया सायकल ऑन संडेज 75व्या आवृत्तीनिमित्त  देशभरात 8,000हून अधिक ठिकाणी आयोजित उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभाग दिसून आला. या उपक्रमाद्वारे, राष्ट्रकुल क्रीडा दिन साजरा करण्यात आला तसेच अहमदाबाद इथे 2029-30 मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीला एक नवी गती मिळाली.
अहमदाबादच्या लोकप्रिय साबरमती नदीकिनाऱ्यावरून राष्ट्रीय सोहळ्याचे नेतृत्व करताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि सिनेअभिनेता आयुषमान खुराना हे इतर 5000 सायकलस्वार, धावपटू, आणि युवा स्वयंसेवक आणि फिटनेस  प्रेमींसह सहभागी झाले. यावेळी सामुदायिक सहभाग आणि क्रीडा भावनेचे उत्साही दर्शन घडले.

अहमदाबादमधील  अ न्यू आयकॉन फॉर फिटर इंडिया- पेडलिंग टू 2030 (निरोगी भारतासाठी एक नवे प्रतीक - सायकलवारी 2030च्या दिशेने ) या विषयसूत्रासह आयोजित करण्यात आलेल्या आवृत्तीमध्ये पाच किलोमीटर सायकल फेरीसह योग आणि झुम्बाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यामुळे साबरमती नदीकिनाऱ्यावर तंदुरूस्ती, संस्कृती आणि देशाच्या क्रीडा विकासाचा उत्सव साजरा झाला.
भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, खेलो इंडिया उपक्रमांतर्गत विकसित झालेल्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे शताब्दी वर्ष  या साऱ्या पार्श्वभूमीवर देशातील विस्तारित क्रीडा परिसंस्थेचे दर्शन घडवणाऱ्या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन  डॉ. मांडवीय यांच्या हस्ते झाले, हे कायक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
अभिनेता आयुषमान खुरानाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजते आणि ऑलिम्पिक मधील खेळाडू गुरजीत कौर, रजनी एटीमारपू, सोनिका तांडी, अंजुम मौडगिल, अंकुर मित्तल आणि तृप्ती मुरगुंडे यांच्यासह कार्यक्रमात सहभाग घेतला. युवा सहभागींना प्रोत्साहन दिले आणि भारतातील युवकांमध्ये रुजणाऱ्या तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कृतीला प्रेरणा देत बळ दिले.
या कार्यक्रमाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय पटेल, ऑलिम्पिक नेमबाज आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता गगन नारंग, खेलो इंडियाचे  उपमहासंचालक मयंक श्रीवास्तव, व 'ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे एक विशेष सांस्कृतिक आकर्षण म्हणजे प्रख्यात कलाकार अनिश रंगरेज यांनी सादर केलेला गरब्याच्या पारंपरिक उत्साहाचा आणि योगशास्त्राचा संगम असलेला अनोखा कार्यक्रम.
याशिवाय, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे डॉ. पवन कुमार यांनी सहभागींसोबत आरोग्यविषयक सल्लामसलत आणि मार्गदर्शन सत्रांद्वारे संवाद साधत सर्वांगीण तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार केला.
2030 मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या शताब्दी वर्षाच्या व्यापक पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, युवक व्यवहार  आणि क्रीडा मंत्रालय  देशभरात भव्य, संवादात्मक आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांचे आयोजन पुढेही करत राहणार आहे. या माध्यमातून जनसहभाग अधिक वाढेल आणि भारताची क्रीडा परिसंस्था अधिक मजबूत होईल.
देशव्यापी उत्सवांद्वारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चळवळीबाबत अधिक जनजागृती निर्माण करण्याचे तसेच 2030 मध्ये भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याच्या तयारीत असताना युवकांना तंदुरुस्ती, क्रीडा आणि सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मांडविया म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण आपण `फिट इंडिया संडेज ऑन सायकल`च्या 75व्या आवृत्तीबरोबरच राष्ट्रकुल क्रीडा दिनही साजरा करत आहोत. 2030 मध्ये गुजरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचा मला अभिमान वाटतो आणि पहाटेपासून हजारो लोक तंदुरुस्ती आणि राष्ट्रनिर्मितीसाठी एकत्र आल्याचे पाहून अधिक आनंद होत आहे.
सुदृढ समाजच समृद्ध राष्ट्र घडवू शकतो. सायकल चालवल्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो, प्रदूषण कमी होते आणि इंधन बचतही होते. तसेच,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वापर कमी करण्यासाठी केलेल्या आवाहनाशीही हे सुसंगत आहे. अगदी कमी अंतरासाठीसुद्धा दैनंदिन जीवनात सायकलचा वापर स्वीकारल्यास आपण अधिक निरोगी आणि शाश्वत भारत घडविण्यात योगदान देऊ शकतो."
गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले, “आज अहमदाबाद शहर `फिट इंडिया संडेज ऑन सायकल`मुळे उत्साहाने उजळून निघाले होते आणि गुजरातमधील जनतेकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून मला अत्यंत आनंद झाला. हजारो नागरिकांनी पहाटेपासून तंदुरुस्ती आणि खेळांसाठी  बाहेर पडणे हे निरोगी जीवनशैलीबाबत वाढती जागरूकता आणि उत्साह दर्शवते.”

अहमदाबादमध्ये दिसून आलेला लोकांचा मोठा सहभाग हा संपूर्ण गुजरातमध्ये क्रीडा आणि तंदुरुस्तीसाठी  वाढत असलेल्या उत्साहाचे प्रतीक होता, त्याचप्रमाणे  याद्वारे भविष्यात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी राज्य सज्ज असल्याचेही अधोरेखित झाले.
यावेळी सामान्य नागरिक, खेळाडू, तरुण स्वयंसेवक आणि फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्याद्वारे या प्रदेशातील क्रीडा संस्कृतीचा जलद विकास दिसून आला आणि 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबाद एक प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे सिद्ध झाले.
अभिनेता आणि फिट इंडियाचा आयकॉन, आयुष्मान खुराना म्हणाला, आज येथे सर्व वयोगटातील लोकांना आनंद मिळवताना आणि मोठ्या उत्साहाने सहभागी होताना पाहून मला खरोखरच खूप आनंद होत आहे. फिट इंडिया आणि आगामी 2030 राष्ट्रकुल स्पर्धांमधील सहकार्य खूप चांगले आहे, भारतीय तरुणांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रेरणा देणारे आहे. संडेज ऑन सायकल हा एक अतिशय स्तुत्य, मनोरंजक आणि भविष्याचा वेध घेणारा उपक्रम आहे.

हा कार्यक्रम संपूर्ण देशभरासह, साई प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे, खेलो इंडिया केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी पार पडला, यामध्ये ऑलिंपिकपटू,  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आपापल्या भागातील नागरिकांसोबत सामील झाले. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी गुवाहाटीमध्ये या कार्यक्रमाचे नेतृत्व केले, माजी कुस्तीपटू बबिता फोगट यांनी धरमशाला येथे भाग घेतला, तर चक दे! इंडिया या प्रसिद्ध चित्रपटामागील प्रेरणांपैकी एक असलेल्या, माजी भारतीय हॉकीपटू सबा अंजुम यांनी मुंबईतील कार्यक्रमात भाग होऊन क्रीडा जन भागीदारी कार्यक्रमाच्या देशव्यापी उत्साहात भर घातली.
अहमदाबाद येथे 2030 मध्ये ऐतिहासिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या दिशेने वाटचाल सुरु असताना  संपूर्ण देशाने एकत्र येऊन सायकल चालवण्याचा आजचा सोहळा हा तंदुरुस्त, मजबूत आणि महत्वाकांक्षी क्रीडा भविष्याची आठवण ठरला आहे.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी-साने/नितीन गायकवाड/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264767) अभ्यागत कक्ष : 15