कंपनी व्यवहार मंत्रालय
कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ईएसजी आणि भांडवली बाजारांना चालना देण्यासाठी सेबी, एनआयएसएम आणि आयआयसीए यांनी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
वित्तीय आणि कॉर्पोरेट नियमनाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधन, धोरणात्मक सहाय्य आणि सहकार्याला चालना देणे, हा या भागीदारीचा उद्देश
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2026 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2026
भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे स्थापित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (एनआयएसएम) आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) यांनी देशात कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ईएसजी आणि भांडवली बाजारांना चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या दोन संस्था संयुक्तपणे क्षमता-विकास कार्यक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कार्यकारी शिक्षण मॉड्यूल आणि प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून ते राबवणार आहेत. यात सेबीचे अधिकारी तसेच इतर नियामक आणि वित्तीय क्षेत्रातील संस्थांच्या अधिकाऱ्यांसाठी देखील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे.
या सामंजस्य करारावर 19 मे 2026 रोजी मुंबईत स्वाक्षरी करण्यात आली आणि या स्वाक्षरी समारंभाला सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे उपस्थित होते.

सेबीच्या अध्यक्षांनी कामगिरी-आधारित कॉर्पोरेट गव्हर्नन्स व्यवस्था उभारण्याच्या महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना भांडवली बाजारात प्रवेश मिळवून देणे, शाश्वतता अहवाल प्रणाली मजबूत करणे आणि उदयोन्मुख नियामक क्षेत्रांमध्ये पुरावा-आधारित संशोधनाला चालना देण्यावर भर दिला.
ही भागीदारी आयआयसीएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर कुमार सिंह यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ईएसजी, जबाबदार व्यावसायिक आचरण यांसारख्या आयआयसीएच्या धोरणात्मक उपक्रमांना राष्ट्रीय विकास अजेंड्याशी संरेखित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या सोहळ्यात एनआयएसएमचे संचालक शशी कृष्णन हे देखील उपस्थित होते. या करारावर एनआयएसएमच्या वतीने एनआयएसएमच्या कुलसचिव योगिता जाधव आणि आयआयसीएच्या वतीने स्कूल ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंटच्या प्रमुख डॉ. गरिमा दधिच यांनी स्वाक्षरी केली.
हा सामंजस्य करार सिक्युरिटीज मार्केट, शाश्वतता आणि ईएसजी अहवाल प्रणाली, व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (बीआरएसआर) यांसारख्या क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाण-घेवाण, क्षमता विकास, संशोधन, धोरणात्मक सहाय्य आणि संस्थात्मक सहकार्य मजबूत करण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक सहयोग स्थापित करतो.
याव्यतिरिक्त, दिवाळखोरी, गुंतवणूकदार शिक्षण, मूल्यांकन, जबाबदार गुंतवणूक, शाश्वत वित्त, संचालक मंडळाचे प्रशासन, बाजारपेठेची पारदर्शकता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच उदयोन्मुख नियामक चौकट यांसारख्या क्षेत्रांवरही दोन्ही संस्थांद्वारे लक्ष दिले जाईल.
दोन्ही संस्था संशोधन, धोरण अभ्यास, अभ्यासक्रम रचना आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार यातही सहकार्य करतील. या भागीदारीमध्ये प्रमुख परिषदांचे संयुक्त आयोजन, प्राध्यापकांची देवाणघेवाण, प्रकाशने अशा उपक्रमांचाही समावेश आहे.
हे सहकार्य भारताच्या सिक्युरिटीज मार्केट आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक सुशासित, सर्वसमावेशक आणि ज्ञान-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2263804)
आगंतुक पटल : 41