संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सेऊलमध्ये कोरिया प्रजासत्ताकच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा


दोन्ही मंत्र्यांनी मजबूत संरक्षण संबंध आणि नियमाधारित हिंद प्रशांत क्षेत्राप्रतीच्या निर्धाराचा केला पुनरुच्चार

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण, सायबर, प्रशिक्षण आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसंदर्भातील सहकार्य करारांवर स्वाक्षरी

Posted On: 20 MAY 2026 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2026

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कोरिया प्रजासत्ताकचे संरक्षण मंत्री आन ग्यु-बॅक यांनी 20 मे 2026 रोजी सेऊल येथे सर्वसमावेशक द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण सहकार्यासंदर्भातील प्रत्येक पैलूचा आढावा घेतला आणि उद्योग, उत्पादन, सागरी सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, लष्करी देवाणघेवाण, लॉजिस्टिक्स आणि प्रादेशिक सहकार्य यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

भारताचे अ‍ॅक्ट इस्ट धोरण आणि कोरिया प्रजासत्ताकची  प्रादेशिक धोरणात्मक दूरदृष्टी यांच्यातील वाढत्या समन्वयाची दोन्ही बाजुंनी दखल घेतली आणि मुक्त, खुले,  सर्वसमावेशक आणि नियमाधारित हिंद - प्रशांत क्षेत्र अबाधित ठेवण्याच्या समान उद्दिष्टांच्या अनुषंगाने संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. वाढती द्विपक्षीय भागीदारी आणि सखोलता दर्शविणाऱ्या संरक्षण सहकार्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सायबर क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या करारांची देवाणघेवाण करण्यात आली तसेच भारतीचे राष्ट्रीय  संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यातील प्रशिक्षण आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधील सहकार्य इत्यादी क्षेत्रात देखील करार करण्यात आले आणि ही भागीदारी भक्कम आणि बहुआयामी करण्यावर भर देण्यात आला.  

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील संरक्षण उद्योग गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेला दोन्ही देशातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आघाडीच्या संरक्षण उद्योगातील प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेमुळे संरक्षण उत्पादन, सह विकास, सह उत्पादन आणि पुरवठा साखळी भागीदारी या क्षेत्रांमधील नवनवीन संधीचा शोध घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ लाभले.

उद्योगपतींना संबोधित करताना, संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या वाढती संरक्षण औद्योगिक परिसंस्था आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि  जागतिक भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उपक्रमांअंतर्गत उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. त्यांनी कोरियन संरक्षण कंपन्यांना भारतीय उद्योगासोबत सहभाग अधिक दृढ करण्यासाठी आणि दीर्घकालीन परस्पर लाभदायी सहकार्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

राजनाथ सिंह म्हणाले की, कोरियाचे तांत्रिक कौशल्य आणि भारताची विशालता, गुणवत्ता, उत्पादन परिसंस्था व नवोन्मेष क्षमता एकत्रितपणे  परस्पर सहकार्याचा भक्कम पाया रचणाऱ्या आहेत. दोन्ही देश एकत्र येऊन भविष्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञान आणि संरक्षण प्रणालीचा विकास आणि उत्पादन करु शकतात.

संरक्षण उत्पादन हे आता केवळ पारंपारिक मंच आणि उपकरणांपुरते मर्यादित राहिलेले नाही, यावर संरक्षणमंत्र्यांनी प्रकाश टाकला. आधुनिक संरक्षण व्यवस्था या प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित प्रणाली, सायबर तंत्रज्ञान, सेन्सर्स, सेमीकंडक्टर्स, क्वांटम तंत्रज्ञान, प्रगत साहित्य आणि अंतराळ-आधारित तंत्रज्ञानाद्वारे संचलित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी भारताची एल अँड टी  आणि हानवा कंपनी लिमिटेड यांच्यामध्ये दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे करार संरक्षण क्षेत्रातील भारत-कोरिया यांच्यामधील नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान भागीदारीच्या उज्वल  भविष्याचे द्योतक आहे.

कोरिया प्रजासत्ताकमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना संरक्षणमंत्र्यांनी, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे भारताच्या जागतिक प्रतिष्ठेतील वृद्धी अधोरेखित केली.

संरक्षण उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. 2025-26 या आर्थिक वर्षात 1.54 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले आणि जवळपास 40,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्रीची निर्यात ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी, सातत्यपूर्ण प्रयत्नांचाच परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.

सेऊलयेथील कोरियन सैनिक स्मारकावर  पुष्पचक्र अर्पण करून, कोरियन युद्धादरम्यान हौतात्म्य पत्करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करुन संरक्षणमंत्र्यांनी आपल्या दोन देशांच्या दौऱ्याचा अंतिम टप्पा असलेल्या कोरिया प्रजासत्ताकच्या दौऱ्याची सुरुवात केली.   


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2263396) अभ्यागत कक्ष : 7