संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून भोपाळ येथे 'नेव्हल सेलिंग नोड'चे उद्घाटन
Posted On:
17 MAY 2026 6:15PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाने 17 मे 2026 रोजी भोपाळमधील 'अप्पर लेक' म्हणजेच 'भोजताल' येथे आपल्या मुख्य 'नेव्हल सेलिंग नोड'चे (नौदल नौकानयन केंद्र) उद्घाटन केले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात, संरक्षण दलातील आणि नागरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष दिनाचे औचित्य साधत, विशाखापट्टणम येथील 'आयएनडब्ल्यूटीसी' येथून आलेल्या, 30 हून अधिक नौदल जवान, तसेच नौदलाच्या रोइंग, कायकिंग आणि कॅनोइंग संघांनी विहंगम संचलन सादर केले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या कायकिंग, कॅनोइंग आणि रोइंगच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना थक्क केले. नौदल जवानांच्या प्रशिक्षण आणि विकास प्रक्रियेत 'वॉटरमनशिप' (जलकौशल्य) प्रशिक्षणाला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. या प्रशिक्षणामुळे जवानांच्या मुख्य कार्यक्षेत्रात त्यांच्यात परस्पर बंधुभाव आणि निकोप स्पर्धा वाढीस लागते.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे 'सेलिंग नोड' भारतीय नौदल नौकानयन संघ (Sailing Team), नौदलाचे रोइंग, कॅनोइंग आणि कायकिंग संघ, तसेच एनसीसी कॅडेट्सच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाईल. विशेष म्हणजे, सध्या नौदल नौकानयन संघातील एकूण 34 जवानांपैकी 17 जवान हे एकट्या मध्य प्रदेश राज्यातील आहेत. मध्य प्रदेशातील अधिकाधिक तरुणांना व्यावसायिक जलक्रीडा प्रकारांकडे आकर्षित करणे आणि त्यांना संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरित करणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांसाठी जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने हे एक महत्चाचे पाऊल आहे. स्पर्धात्मक खेळांमध्ये नैपुण्याला प्रोत्साहन देणे आणि गुणवान खेळाडुंची संख्या वाढवणे, या 'राष्ट्रीय क्रीडा धोरणा'च्या उद्दिष्टांशी हा उपक्रम पूर्णपणे सुसंगत आहे.
(8)75H9.jpeg)
(9)QTEL.jpeg)
(7)9EPY.jpeg)
(6)708L.jpeg)
(5)WKTX.jpeg)
(2)UESB.jpeg)
(1)JKLH.jpeg)
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2262089)
अभ्यागत कक्ष : 9