सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतीय अर्थव्यवस्थेत ज्ञान आणि ज्ञानाधारित उत्पादनांच्या योगदानाचे मोजमाप करण्यासाठीचा आराखडा” या विषयावरील मूळ अहवालावर अभिप्राय आणि सूचना मागविण्यात येत आहेत

Posted On: 16 MAY 2026 9:46AM by PIB Mumbai

 

आजच्या स्पर्धात्मक वातावरणात वेगाने होणारे तांत्रिक बदल, कौशल्याच्या वाढत्या गरजा आणि संघटनात्मक नवोन्मेष अर्थव्यवस्थेतील ज्ञानाचे वाढते महत्त्व अधिकाधिक प्रतिबिंबित करत आहेत. या पार्श्वभूमीवर, अर्थव्यवस्थेत ज्ञानाच्या योगदानाचे मूल्यांकन करणे आणि त्याच्या बदलत्या स्वरुपाला अनुसरून धोरणात्मक उपाययोजनांची शिफारस करणे आवश्यक झाले आहे.

ही गरज पूर्ण करण्यासाठी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) भारतीय अर्थव्यवस्थेतील ज्ञान आणि ज्ञानाधारित उत्पादनांच्या योगदानाचे मोजमाप करण्यासाठी एक आराखडा विकसित करण्याची प्रक्रिया हाती घेत आहे. यापूर्वी असे कोणतेही उदाहरण उपलब्ध नसल्यामुळे, ही प्रक्रिया म्हणजे एक अभिनव उपक्रम असून यासाठी तज्ञ आणि इतर संबंधित घटकांचा सहभाग आवश्यक आहे.

फेब्रुवारी 2025 मध्ये भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील शिफारशींच्या आधारे, या उद्देशासाठी तत्कालीन क्षमता विकास आयोगाचे सदस्य डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक सल्लागार गट (TAG) स्थापन करण्यात आला. या गटामध्ये थिंक टँक्स, उद्योग संस्था, शिक्षण क्षेत्रातील सदस्य आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. सप्टेंबर 2025 मध्ये एक विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ज्ञानाधारित उत्पादनांचे वर्गीकरण विकसित करण्यावर, आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधील (जीडीपी) त्यांचे योगदान मोजण्यासाठी संभाव्य संख्यात्मक निर्देशक आणि डेटा स्रोत ओळखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तांत्रिक सल्लागार गटाच्या सूचना, विचारमंथन सत्रातील सूचना आणि त्यानंतर विविध तज्ञांसोबत झालेल्या चर्चेच्या आधारे, मंत्रालयात 'भारतीय अर्थव्यवस्थेतील ज्ञान आणि ज्ञानाधारित उत्पादनांच्या योगदानाचे मोजमाप करण्यासाठीचा आराखडा' (Base Paper on a Framework for Measuring the Contribution of Knowledge and Knowledge Products to the Indian Economy) नावाचा एक मूळ मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मूळ मसुदा https://mospi.gov.in/announcements या संकेतस्थळावर पाहता येईल.

या मसुद्यामध्ये चार प्रकरणे आहेत, ती म्हणजे;

प्रकरण 1: ज्ञान आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था—संकल्पनात्मक विचार

प्रकरण 2: उपलब्ध कार्यपद्धती आणि परिमाणे

प्रकरण 3: भारताचे पारंपरिक ज्ञान—आयाम आणि आव्हाने, आणि,

प्रकरण 4: अर्थव्यवस्थेतील ज्ञान योगदानाचे मूल्यांकन; एका आराखड्याची प्राथमिक ओळख

पहिल्या प्रकरणात ज्ञानाचे आयाम, त्याची निर्मिती आणि गतिशीलता, तसेच अर्थव्यवस्थेवरील त्याच्या परिणामाविषयीच्या अलीकडील चर्चा यांवरील संकल्पनात्मक विचारांचा समावेश आहे. दुसऱ्या प्रकरणात संशोधन आणि विकास, बौद्धिक संपदा हक्क, डिजिटल अर्थव्यवस्था आणि शैक्षणिक उत्पादन यांच्या मूल्यांकनासाठी उपलब्ध कार्यपद्धती मांडल्या आहेत आणि ज्ञानाच्या या घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी काही मापदंड सादर केले आहेत. तिसऱ्या प्रकरणात भारतीय अर्थव्यवस्थेतील पारंपरिक ज्ञानाचा प्रसार आणि विविध कार्यांमधील त्याची भूमिका तपासली आहे. त्यात त्याच्या जतन, दस्तऐवजीकरण आणि वर्गीकरणावरील साहित्य आणि उपक्रमांचा आढावा घेतला आहे, तसेच संबंधित मापदंड सादर केले आहेत. चौथ्या प्रकरणात अर्थव्यवस्थेवरील ज्ञानाचा प्रभाव जाणून घेण्यासाठी पुराव्यांना एका व्यापक आराखड्यात एकत्रित करण्याचा प्राथमिक प्रयत्न सादर केला आहे आणि त्याचे आवश्यक घटक परिभाषित केले आहेत.

या कार्यवाहीच्या अनुषंगाने सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्य सचिव रतन पी. वाटल यांच्या अध्यक्षतेखाली 'ज्ञान प्रणाली समिती' गठीत केली आहे. अर्थव्यवस्थेतील ज्ञान आणि ज्ञानाधारित उत्पादनांच्या योगदानाचे मोजमाप करण्याच्या आराखड्यावर एक कृतीयोग्य धोरणपत्र तयार करणे, हा या समितीचा आदेश आहे. उपरोक्त मूळ मसुदा हे या कृतीयोग्य धोरणपत्राचा आधार असेल.

सल्लामसलत प्रक्रियेचा भाग म्हणून, मूळ मसुद्यावर सर्व हितधारक आणि सर्वसामान्य जनतेकडून अभिप्राय आणि सूचना मागविण्यात येत आहेत. आपला अभिप्राय या मंत्रालयाला maneesh.jindal@mospi.gov.in आणि neeraj.kumar007[at]nic[dot]in या ईमेल आयडींवर 15 ‌जून 2026 पर्यंत कळवता येईल, ज्यामुळे आराखड्याला लवकर अंतिम स्वरूप देणे शक्य होईल.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261758) अभ्यागत कक्ष : 18