पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या लोकार्पणाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


सोमनाथ मंदिर अढळ श्रद्धा,दिव्यत्वाची अनुभूती आणि भारताच्या चैतन्याचे पवित्र प्रतीक म्हणून उभे आहे : पंतप्रधान

याच दिवशी, सोमनाथ मंदिराची झालेली पुनर्बांधणी, साधी घटना नव्हती, भारताला स्वातंत्र्य 75 वर्षांपूर्वी मिळाले असले, तरी, 1951 साली सोमनाथ मंदिराची झालेली प्राणप्रतिष्ठा, भारताच्या स्वतंत्र झालेल्या आत्म्याचा हुंकार होता- पंतप्रधान

सोमनाथ अमृत महोत्सव पुढची हजार वर्षे, भारतासाठी एक मार्गदर्शक प्रेरणा ठरेल- पंतप्रधान मोदी

हे मंदिर केवळ एक मूर्त वस्तू असल्याचे समजून, त्यावर वारंवार आघात करत, आक्रमकांनी या भव्य सोमनाथ मंदिराला नष्ट करण्याचे प्रयत्न केले, मंदिर पुनःपुन्हा पाडले गेले, मात्र तितक्याच वेळा ते बांधलेही गेले, प्रत्येकवेळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा नव्या भव्यतेने उंच उभे राहिले: पंतप्रधान

केवळ सोमनाथ मंदिराचीच पुनर्बांधणी झाली नाही, तर देशाने शतकानुशतके लागलेला कलंकही पुसून काढला : पंतप्रधान

राष्ट्र आपल्या मुळांना घट्ट धरुन राहिले, तरच ते आपले सामर्थ्य टिकवून ठेवू शकते, याचे स्मरण आपल्याला सोमनाथचे मंदिर करून देते: पंतप्रधान

Posted On: 11 MAY 2026 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या लोकार्पणाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले होते.

सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्षानिमित्त, या मंदिर परिसरात आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले.  हा केवळ, एक समारंभ नाही,  त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, भारताचे अविनाशी चैतन्य आणि सांस्कृतिक चिवटपणा, याची ही एक घोषणा आहे. या क्षणांचे साक्षीदार ठरलेल्या सगळ्या भाविकांनी, राष्ट्राच्या स्वाभिमानाशी गुंफलेल्या, आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव इथे घेतला आहे, वैदिक मंत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सागरी लाटांची गर्जना, या पवित्र स्थळाचा पुनर्स्थापनेचा उत्सव साजरा होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या प्राचीन शास्त्रातील आध्यात्मिक ज्ञानाचा दाखला देत, पंतप्रधान म्हणाले, ‘ही संपूर्ण सृष्टी परमेश्वरापासून निर्माण होते आणि अखेरीस त्याच्यामध्ये विलीन होते.

“यतो जायते पाल्यते येन विश्वम्, तमीशं भजे लीयते यत्र विश्वम् —

आज आपण त्याच परमेश्वराच्या धामाच्या पुनर्निर्माणाचा उत्सव साजरा करत आहोत,”

या मंदिराप्रती आपली वैयक्तिक श्रद्धा असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी दादा सोमनाथांचे परमभक्त म्हणून मंदिराला दिलेल्या असंख्य भेटींची आठवण सांगितली. “मी अनेक वेळा त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे, पण आज येथे येताना हा काळाचा प्रवास मला एक विलक्षण आनंददायी अनुभूती देत होता,” असे मोदी म्हणाले.

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्त, काही महिन्यांपूर्वी या मंदिराला दिलेल्या भेटीचे स्मरण करत, पंतप्रधानांनी,  अगदी थोड्या काळात दोन उत्सवांत सहभागी होण्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य सांगितले. “पहिल्या विध्वंसाच्या हजार वर्षांनंतर सोमनाथाचा गौरव अविनाशी राहिला आहे आणि आज या आधुनिक स्वरूपाच्या प्राणप्रतिष्ठेला 75 वर्षे पूर्ण होत असताना, आपल्याला या हजार वर्षांच्या चिरकाल प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी लाभली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

1951 च्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, हा सामान्य प्रसंग नव्हता. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, आणि 1951 मध्ये सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या स्वतंत्र चेतनेची घोषणा केली, असे मोदी यांनी नमूद केले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या चार वर्षांनी, 1951 मध्ये मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतांना पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 500 संस्थानांच्या राजकीय विलीनीकरणाचा आणि त्यांच्या सोमनाथच्या पुनर्बांधणीच्या निर्धाराचा उल्लेख केला. राष्ट्र परकीय बेड्यांमधून मुक्त झाले, तेव्हा सोमनाथच्या जीर्णोद्धाराने जगाला हा संदेश दिला की भारत केवळ स्वतंत्र झालेला नाही, तर तो आपले प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करत आहे, असे मोदींनी सांगितले.

या प्रसंगाचे बहुआयामी महत्त्व सांगताना पंतप्रधान म्हणाले की, हा केवळ 75 वर्षांचा मागोवा घेणारा साक्षीदार नाही. "विनाशातही सृजनाचा जो संकल्प सोमनाथने पूर्ण केला आहे, तो मी इथे पाहत आहे," असे मोदी म्हणाले. त्यांनी पवित्र परिसरात असत्यावर सत्याचा शाश्वत विजय अनुभवल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी जागतिक कल्याणाचे धडे देणाऱ्या हजारो वर्षांच्या आध्यात्मिक चेतनेबद्दल सांगितले. सोमनाथच्या लवचिकतेमध्ये त्यांनी भारताच्या अक्षय स्वरूपाचे दर्शन घडवले. "मी इथे भारताचे जे अक्षय रूप पाहत आहे, ते शतकानुशतके केलेल्या क्रूर प्रयत्नांनीही पुसले गेले नाही आणि त्याचा पराभव होऊ शकला नाही," असे मोदींनी ठासून सांगितले.

या उत्सवाच्या भविष्यकालीन पैलूंवर भर देताना ते म्हणाले की, सोमनाथ अमृत महोत्सव केवळ स्मरणरंजनापुरता मर्यादित नाही. "हा केवळ भूतकाळाचा उत्सव नाही, तर पुढील एक हजार वर्षांसाठी भारताची प्रेरणा आहे," असे मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी सर्व देशवासियांचे आणि भगवान सोमनाथाच्या कोट्यवधी भक्तांचे अभिनंदन केले.

या दिवसाचा राष्ट्रीय इतिहासातील दुसऱ्या एका ऐतिहासिक घटनेशी संबंध जोडताना त्यांनी 11 मे हा 1998 मधल्या भारताच्या पोखरण अणुचाचणीचा वर्धापन दिन सुद्धा आहे, याची आठवण करून दिली. देशाने 11 मे रोजी तीन अणुचाचण्या करून भारतीय शास्त्रज्ञांची क्षमता सिद्ध केली, असे त्यांनी सांगितले. त्यांनी 13 मे रोजी झालेल्या आणखी दोन  चाचण्यांचा उल्लेख भारताच्या अढळ राजकीय संकल्पाचा पुरावा म्हणून केला. "त्या वेळी संपूर्ण जगाचा दबाव भारतावर होता, मात्र,अटलजींच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे आणि जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही किंवा दबावाखाली आणू शकत नाही, हे दाखवून दिले" असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

या मोहिमेच्या नावाचे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' हे नाव सखोल सांस्कृतिक कारणांमुळे देण्यात आले होते. "कारण शिवाच्या बरोबरीने शक्तीची पूजा करणे ही आपली परंपरा राहिली आहे," असे मोदी म्हणाले. हिंदू प्रतिमेचा संदर्भ देत अर्धनारीश्वर शिव हे शिव आणि शक्तीच्या अविभाज्यतेचे दर्शन घडवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताची चांद्रयान मोहीम चंद्रावर यशस्वीपणे उतरली, तेव्हा त्या स्थळाचे नाव याच तत्त्वज्ञानानुसार ठेवण्यात आले होते, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. शब्दांच्या व्युत्पत्तीचा संबंध जोडताना त्यांनी प्राचीन ज्ञान आणि आधुनिक कर्तृत्वाच्या संगमाबद्दल आनंद व्यक्त केला. "या ज्योतिर्लिंगाला चंद्राच्या (सोम) नावावरून सोमनाथ म्हटले जाते हे किती सुखद आहे," असे मोदी म्हणाले.

शिव आणि शक्ती यांची एकत्रित उपासना करण्याचे तत्त्वज्ञान कशाप्रकारे  भारताच्या वैज्ञानिक प्रगतीला  प्रेरणा देते हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आपली शिव आणि शक्तीची उपासना ही देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी प्रेरणास्थान बनावी, हा संकल्प आज आपण साकार होताना पाहत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. ऑपरेशन शक्तीच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांचे अभिनंदन केले.

या मंदिराचा विध्वंस आणि पुनर्निर्मितीच्या  हजारो वर्षांच्या गाथेचा मागोवा घेताना पंतप्रधानांनी या इतिहासाला पुनर्जीवित करणाऱ्या अदम्य आत्मशक्तीचा उल्लेख केला. मोहम्मद गझनी आणि अल्लाउद्दीन खिलजी यांसारख्या आक्रमकांच्या वारंवार हल्ल्यांना न जुमानता राजा भोज, भीमदेव प्रथम, कुमारपाल, महिपाल प्रथम आणि राव खंगार यांसारख्या निष्ठावंत शासकांनी, एका अनावर आध्यात्मिक आवाहनाला प्रतिसाद देत, मंदिराची वारंवार पुनर्बांधणी केली. ज्यांनी विनाश केला त्यांना  केवळ दगड आणि चुना दिसला मात्र त्यांना भारतीय संस्कृतीच्या बौद्धिक आणि अध्यात्मिक शक्तीचा अंदाज आला नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या पुनरुज्जीवनावर भर देत पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या पवित्र वारशाचे जतन करणाऱ्या लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या महान व्यक्तींच्या योगदानाचा गौरव केला. या क्षेत्राच्या अध्यात्मिक परंपरांना टिकवून ठेवणारे भव बृहस्पती, पशुपताचार्य अशा विद्वानांच्या विद्वत्तापूर्ण योगदानाचा त्यांनी गौरव केला. या प्रदेशाच्या  बौद्धिक चेतनेचे  रक्षण करणाऱ्या विशालदेव आणि त्रिपुरंतक यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न  व्यक्तिमत्त्वांचेही त्यांनी स्मरण केले. आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक विस्तारत त्यांनी वीर हमीरजी गोहिल, वीर वेगदाजी भिल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, बडोद्याचे गायकवाड, तसेच जाम साहेब महाराजा दिग्विजय सिंह जी यांसारख्या अनेक महान विभूतींचा उल्लेख केला, ज्यांनी स्वतःला सोमनाथ मंदिरच्या सेवेसाठी समर्पित केले.  विशेषतः सोमनाथ मंदिराच्या  जीर्णोद्धाराचे आधुनिक शिल्पकार सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, के. एम. मुन्शीजी आणि अशा सर्व दिव्य विभूतींना त्यांनी वंदन केले.

त्यांच्या या महान वारशातून त्यांनी आजच्या काळातील आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रेरणा घेतली. त्यांच्या कृतज्ञापूर्वक केलेल्या स्मरणातून आपण केवळ आपला सांस्कृतिक वारसा पुढे न नेता त्यासोबतच येणाऱ्या जबाबदाऱ्या देखील पुढील पिढीच्या हाती सुपूर्द केल्या पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या विशाल सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थळे ही हजारो वर्षांपासून भारताच्या अस्मितेची  प्रतीक राहिली आहेत. मात्र स्वातंत्र्योत्तर काळातील एका दुःखद वेदनेकडे त्यांनी लक्ष वेधले. जगात इतरत्र, जिथे आक्रमकांनी हल्ले करुन राष्ट्राच्या वारशाचा विद्ध्वंस केला आहे, तिथे सर्वांनी एकत्र येऊन त्याचे पुनरुज्जीवन केले आहे, असे ते म्हणाले. या ध्येयासाठी देशाच्या संस्थापक नेत्यांनी केलेल्या प्रचंड प्रयत्नांची पंतप्रधानांनी दखल घेतली. मात्र, या कार्यात त्यांना नेतृत्वातील काही घटकांकडून झालेल्या दुर्दैवी विरोधाचाही त्यांनी उल्लेख केला. "तरीही सरदार साहेबांच्या अढळ निश्चयामुळे राष्ट्राने शतकानुशतकांचा कलंक धुऊन काढला ," असे ते म्हणाले.

समकालीन आव्हानांबद्दल चिंता व्यक्त करत, समाजाला विभागणाऱ्या शक्ती आजही प्रभावशाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्रीय महत्त्वाच्या सांस्कृतिक प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाची अलीकडील उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. अशा फुटीरतावादी विचारसरणीविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्राच्या विकासाच्या दोन्ही पैलूंचा सन्मान करणाऱ्या संतुलित प्रगतीचा दृष्टिकोन मांडून, आपल्याला विकास आणि वारसा या दोघांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याचे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

आर्थिक परिवर्तनातील 'मंदिर ट्रस्ट'च्या भूमिकेचा पंतप्रधानांनी गौरव करत, सोमनाथ हे एकात्मिक विकासाचे दीपस्तंभ बनले असल्याचे अधोरेखित केले. हे केवळ एक आध्यात्मिक केंद्र नसून शेकडो कुटुंबांना आणि हजारो लोकांच्या उपजीविकेला आधार देणारे एक आर्थिक इंजिनही ठरले असल्याचे ते म्हणाले. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात, त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण प्रदेशात समृद्धी येते, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. या तीर्थक्षेत्रांचे जाळे विस्तारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामध्ये केदारनाथचे पुनर्निर्माण, काशीच्या विश्वनाथ धामचे सौंदर्यीकरण, उज्जैनचा महाकाल महालोक, चारधाम महामार्ग प्रकल्प, गोविंदघाट ते हेमकुंड साहिब दरम्यानचा रोपवे प्रकल्प, करतारपूर कॉरिडॉर आणि बुद्धिस्ट सर्किटचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला.

हे सर्व गेल्या 10-12 वर्षांत घडले आहे. ही सांस्कृतिक स्थळे प्रगतीच्या मार्गातील अडथळे नसून, ती भारताच्या आध्यात्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. तसेच, ही स्थळे देशाच्या आर्थिक प्रगतीचे स्रोत आणि खऱ्या अर्थाने विकासाची प्रवेशद्वारे ठरली असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

या प्रयत्नांचा दार्शनिक आधार स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी उपनिषदांमधील 'सर्वं खल्विदं ब्रह्म' (अर्थात सर्व काही ब्रह्म आहे) या वचनाचा दाखला दिला. नद्या, वने, पर्वत आणि संपूर्ण निसर्ग ही ईश्वराचीच पवित्र रूपे आहेत, अशी या विधानामागची व्यापक दृष्टी असल्याचे त्यांनी सांगितले.

जेव्हा जग नैसर्गिक जीवनशैलीकडे वळत आहे, तेव्हा आपण आपल्या या प्राचीन ज्ञानाची ओळख जगाला करून दिली पाहिजे. आपण आपल्या पवित्र तीर्थक्षेत्रांना अशा प्रकारे विकसित करूया की, ती संपूर्ण जगासाठी 'समतोल आणि सुसंवादी विकासाचे' एक उत्तम उदाहरण ठरतील, असे आवाहन मोदी यांनी केले.

राष्ट्राच्या सामर्थ्यामध्ये सांस्कृतिक वारशाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून पंतप्रधानांनी, जेव्हा नवी पिढी आपल्या इतिहासाशी, श्रद्धेशी आणि मूल्यांशी पुन्हा जोडली जाते, तेव्हा देशाची आंतरिक शक्ती वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. आज भारत ज्या आत्मविश्वासाने प्रगती करत आहे, त्यामागे या सांस्कृतिक अखंडतेचा फार मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

75 वर्षांपूर्वी सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेपासून एका परिवर्तनीय प्रवासाला सुरुवात झाली होती, आज तो प्रवास आपल्यासमोर अधिक व्यापक स्वरूपात उभा असल्याचेही मोदी यांनी सांगितले. परंपरांशी घट्ट जोडलेले राहून आपल्याला हा प्रवास अधिक उंचीवर नेऊन ठेवायचा असून, हीच काळाची गरज असल्याचेही पंतप्रधांनानी यावेळी स्पष्ट केले.

सुषमा काणे/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/भक्ती सोनटक्के/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2259882) अभ्यागत कक्ष : 12