विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आयसी मुंबई येथे खरेदीदार-विक्रेता मेळाव्याचे उद्घाटन
Posted On:
09 MAY 2026 6:01PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री तसेच सीएसआयआरचे उपाध्यक्ष, डॉ. जितेंद्र सिंह यांनी शनिवारी सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिनद्वारे मुंबईतील सीएसआयआर इनोव्हेशन कॉम्प्लेक्स येथे आयोजित खरेदीदार-विक्रेता मेळाव्याचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम आगामी लॅव्हेंडर महोत्सव 2026 च्या पूर्वतयारीचा भाग होता.
या एकदिवसीय सुगंध उद्योग-शेतकरी मेळाव्यात सुगंध आणि अत्तर उद्योगातील अग्रगण्य कंपन्या, शास्त्रज्ञ, स्टार्टअप्स, उद्योजक आणि विशेषतः जम्मू आणि काश्मीर मधील भद्रवाह आणि इतर भागांतील लॅव्हेंडर उत्पादक शेतकरी एकत्र आले होते. या उपक्रमाचा उद्देश बाजारपेठेशी संबंध दृढ करणे तसेच लॅव्हेंडर-आधारित उद्योगांची एक शाश्वत परिसंस्था उभारणे हा होता.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी खरेदीदार-विक्रेता मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल सीएसआयआर-आयआयआयएम जम्मूचे संचालक डॉ. झबीर अहमद आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले. हा उपक्रम जम्मू आणि काश्मीरमधील सीएसआयआर अरोमा मिशन आणि ‘पर्पल रिव्होल्यूशन’च्या वाढत्या यशाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
अरोमा मिशनने या प्रदेशातील सुगंधी पिकांच्या शेतीला मोठी बळकटी दिली आहे तसेच शेतकरी आणि तरुणांसाठी रोजगारच्या नवीन संधी निर्माण केल्या आहेत.
मात्र, हे क्षेत्र एका शाश्वत सुगंध-आधारित अर्थव्यवस्थेकडे विकसित होत असताना, उत्पादनाच्या गुणवत्तेतील विसंगती, कमकुवत बाजारपेठ संबंध आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शनाची उणीव यांसारखी आव्हाने अजूनही कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.
खरेदीदार-विक्रेता मेळाव्यातील चर्चेमुळे उत्पादक आणि बाजारपेठ यांच्यातील महत्त्वाची दरी भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात देशभरातील शास्त्रज्ञ, उद्योग तज्ज्ञ, स्टार्टअप्स, सुगंध उत्पादक शेतकरी तसेच अग्रगण्य अत्तर आणि सुगंध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
दोन तांत्रिक सत्रे आणि खुल्या चर्चेत लॅव्हेंडरची लागवड, प्रक्रिया, उत्पादनवाढ आणि विपणन या पैलूंवर लक्ष केंद्रित करून सुगंध उत्पादन क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


***
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2259480)
अभ्यागत कक्ष : 11