अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारशी वारशाचे जतन आणि लोकसंख्याशास्त्रीय चिंता दूर करण्यासाठी सरकार वचनबद्ध; केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी केला पुनरुच्चार

Posted On: 09 MAY 2026 6:02PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने  आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे “आधुनिक भारतातील पारशी: सांस्कृतिक आणि सामाजिक-आर्थिक मार्गांचा शोध” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. अल्पसंख्याक समुदायांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये आयोगाने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या मालिकेचा हा एक भाग आहे.

या चर्चासत्रात केंद्रीय आणि राज्य मंत्री, धोरणकर्ते, विद्वान, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ आणि पारशी समुदायाचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी समकालीन भारतातील पारशी समुदायाचे सांस्कृतिक जतन, लोकसंख्याशास्त्रीय समस्या आणि सामाजिक-आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली.

आपल्या मुख्य भाषणात संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कार्य केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी भारताच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये पारशी समुदायाच्या चिरंतन योगदानावर भर दिला. सरकार या समुदायाचा वारसा आणि सामाजिक-आर्थिक कल्याण जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्र्यांनी 'अवेस्तान' भाषेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आणि पारशी लोकसंख्येतील घट या समस्यांवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. टाटा कुटुंबाने भारताच्या 1920 च्या ऑलिम्पिक संघांना कशा प्रकारे प्रायोजित केले आणि पारशी लोकांनी 1880 च्या दशकात पहिला भारतीय क्रिकेट संघ कसा तयार केला, या घटनांना उजाळा देत त्यांनी पारशी समुदायाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारताचा औद्योगिक आणि आर्थिक पाया उभारण्यातील या समुदायाच्या अफाट योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.

 

याप्रसंगी पारशी समुदायाचा इतिहास, वारसा आणि भारताच्या सामाजिक, औद्योगिक आणि परोपकारी विकासातील योगदानावर आधारित एक लघुपट दाखवण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते पारशी समुदायाचा वारसा, यश आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती असलेल्या 'कॉफी टेबल बुक'चे प्रकाशन करण्यात आले.

***

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259468) अभ्यागत कक्ष : 13