दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जन सेवा कनेक्ट’ अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेले ‘भविष्यासाठी सज्ज सेवा केंद्र’ म्हणून अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे केले उद्घाटन
17 राज्यांमधील 40 टपाल कार्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट’ उपक्रमांतर्गत अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाची निवड करण्यात आली आहे; ‘जन सेवा कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत उद्घाटन केले जात असलेले हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरे टपाल कार्यालय
Posted On:
09 MAY 2026 12:09PM by PIB Mumbai
केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 मे 2026 रोजी मुंबईतील नूतनीकरण केलेल्या अंधेरी रेल्वे स्थानक (आरएस) टपाल कार्यालयाचे उद्घाटन केले. टपाल विभागाचा प्रमुख उपक्रम ‘जन सेवा कनेक्ट’ अंतर्गत ‘भविष्यासाठी सज्ज सेवा केंद्र’ म्हणून हे स्थापित केले आहे.

(केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत 'जन सेवा कनेक्ट' अंतर्गत नूतनीकरण केलेल्या अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे उद्घाटन करताना)
1932-33 मध्ये स्थापन झालेल्या अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे नूतनीकरण, पारंपरिक टपाल कार्यालयांना आधुनिक, ग्राहक-केंद्रित आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवा केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या भारतीय टपाल विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. हा प्रकल्प नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या सहकार्याने हाती घेण्यात आला आहे.

(मुंबईत 'जन सेवा कनेक्ट' उपक्रमांतर्गत नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालय)
'जन सेवा कनेक्ट' अंतर्गत 17 राज्यांमधील 40 टपाल कार्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट’ उपक्रमांतर्गत अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उद्घाटन केले जात असलेले हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरे टपाल कार्यालय ठरले आहे.
या अद्ययावत सुविधेत आधुनिक पायाभूत सुविधा आणि अंतर्गत सजावट, उत्तम ग्राहक सुविधा, डिजिटल एकीकरण, कार्यक्षम सेवा वितरण प्रणाली आणि अधिक मजबूत ब्रँडिंग व दृश्यमान ओळख यांचा समावेश आहे.
भारतीय टपाल विभाग 1.65 लाखांहून अधिक टपाल कार्यालयांच्या जाळ्याद्वारे, देशभरात आर्थिक समावेशन आणि सार्वजनिक सेवा वितरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. विभागाने 2025-26 दरम्यान एकूण टपाल महसुलात 16% वाढ नोंदवली, जी त्यांच्या विद्यमान परिवर्तन उपक्रमांचा प्रभाव दर्शवते.

(जन सेवा कनेक्ट अंतर्गत नूतनीकरण केलेल्या अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष कव्हरचे प्रकाशन)
जन सेवा कनेक्ट उपक्रमांतर्गत नूतनीकरण केलेल्या अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते विशेष कव्हरचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार हारून खान, रुपेश सावरकर आणि आचार्य पवन त्रिपाठी हे देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले की हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक आधुनिक, भविष्यवेधी आणि नागरिक-केंद्रित टपाल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना जोडण्यात आणि शेवटच्या टोकापर्यंत सेवा पोहोचवण्यात भारतीय टपाल विभागाची भूमिका अधोरेखित केली.
जन सेवा कनेक्ट हा भारतीय टपाल विभागाचा पायाभूत सुविधा आधुनिकीकरणाचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश टपाल कार्यालयांना सुलभ, कार्यक्षम आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम सामुदायिक सेवा केंद्रांच्या रूपात पुनर्भाषित करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रातील सुमारे 2,000 टपाल कार्यालयांच्या उन्नतीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259407)
अभ्यागत कक्ष : 8