संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत तिरंगा माउंटेन रेस्क्यू या संस्थेच्या छायाचित्र प्रदर्शनाला दिली भेट, प्रदर्शनाच्या माध्यमातून 10 वर्षांच्या समर्पित राष्ट्रसेवेचा गौरव
Posted On:
08 MAY 2026 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दि. 08 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर इथे तिरंगा माउंटेन रेस्क्यू (TMR) या अति उंचीच्या ठिकाणी बचाव मोहीमा राबवणाऱ्या संस्थेद्वारे आयोजित अ डिकेड ऑफ सायलेंट सर्व्हिस टू द नेशन या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. या संस्थेने गेल्या 10 वर्षांपासून समर्पणाच्या भावनेने केलेल्या सेवाकार्याचा गौरव करण्याच्या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात देशातील अति उंचीच्या ठिकाणांवरील प्रदेशांमध्ये तिरंगा माउंटेन रेस्क्यूने (TMR) राबवलेल्या बचाव मोहिमांची चित्तवेधक छायाचित्रे मा़डली आहेत. या छायाचित्रांमधून संस्थेच्या स्वयंसेवकांची जिद्द आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे वाचलेल्या जीवांचे मोल यांची जाणीव आपल्याला होते.

यावेळी राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधितही केले. अत्यंत आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये तिरंगा माउंटेन रेस्क्यूने (TMR) दाखवलेले धैर्य, शिस्त आणि निःस्वार्थ सेवेचे त्यांनी कौतुक केले. सीमांचे रक्षण करताना आपले सैनिकही आव्हानात्मक संकटांचा सामना करतात. काही वेळा स्वतः निसर्ग त्यांच्या विरोधात उभा ठाकलेला असतो. अशा परिस्थितीत, डोंगराळ प्रदेशात बचाव मोहीमा राबवणारे हे कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन येतात अशा शब्दांत त्यांनी या मोहिमा राबवणाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. हे बचाव मोहिमा राबवणारे हे कार्यकर्ते सैनिकांचे मनोधैर्य वाढवतात आणि त्यासोबतच ते डोंगराळ भागात वसलेल्या रहिवाशांनाही ते एकटे नसल्याची हमीही देत असतात असे ते म्हणाले. त्यांचे शांत परंतु प्रभावी कार्य भारताच्या खऱ्या भावनेचे दर्शन घडवते," असे ते म्हणाले.
अशा कामांमधे यंत्रांची मदत होत असली, अशा कामांना व्यवस्थेचे सहकार्य मिळत असले, तरी देखील संकटाच्या वेळी ज्या व्यक्तीच्या मनात कर्तव्याची दृढ जाणीव असते, तीच व्यक्ती जीव वाचवण्यासाठी पुढे येते ही बाब त्यांनी नमूद केली. तिरंगा माउंटेन रेस्क्यू या संस्थेने हीच भावना प्रत्यक्ष कृतीतून वारंवार सिद्ध केली असल्याचे त्यांनी नमूद केले. ही संस्था केवळ बचाव कार्यापुरती मर्यादित नसून, ती अप्रत्यक्षपणे सीमा भागांमधले स्थैर्य, समाजाचा आत्मविश्वास आणि राष्ट्रीय लवचिकतेलाही बळकटी देत असल्याचे त्यांनी सांगितले .
तिरंगा माउंटेन रेस्क्यूचे संस्थापक हेमंत सचदेव यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. हे प्रदर्शन म्हणजे केवळ संस्थेच्या वाटचालीचे प्रतिबिंब नाही, तर हे प्रदर्शन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचा केलेला गौरव आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थेची ही अव्यक्त सेवा सदैव देशाची सेवाच होती, आणि बचाव मोहीम म्हणजे वेळेविरुद्धची शर्यत असते अशा आव्हानात्मक डोंगराळ प्रदेशांमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संस्था कायम वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.

तिरंगा माउंटेन रेस्क्यूने मणिपूर टुपुल भूस्खलन (2022), सिक्कीम ग्लेशियर लेक आउटबर्स्ट पूर (2023), वायनाड पूर (2024) तसेच धराली इथले भूस्खलन आणि पूर (2025) अशा मोठ्या आपत्तींच्या वेळी बचाव मोहिमांचे नेतृत्व कैले आहे, तसेच अशा मोहिमांना सहकार्य पुरवले आहे. रोहतांग जवळ 1968 मध्ये झालेल्या AN-12 विमान अपघातातील अवशेष शोधणे आणि उत्तराखंडमधील माणा इथे सीमा रस्ते संघटनेच्या कामगारांसाठी राबवलेली शोध मोहीम या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय मोहिमांपैकी काही मोहिमा आहेत.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259187)
अभ्यागत कक्ष : 4