विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष धोरण आणि मुत्सद्देगिरीच्या बळकटीकरणासाठी एनआयएससीपीआर व आरआयएस यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
07 MAY 2026 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2026
संयुक्त संशोधन, धोरण विश्लेषण, क्षमता बांधणी आणि ज्ञानाच्या आदान-प्रदानाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष धोरण आणि मुत्सद्देगिरी या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (एनआयएससीपीआर) आणि रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज (आरआयएस) यांच्यामध्ये 6 मे 2026 रोजी सामंजस्य करार झाला. या भागीदारीद्वारे समावेशक आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान धोरण, संवाद, मुत्सद्देगिरी आणि पारंपरिक ज्ञान या क्षेत्रांतील कार्याला, तसेच संयुक्त प्रकल्प, प्रकाशने, धोरण संवाद, कार्यशाळा आणि जनजागृतीला प्रोत्साहन दिले जाईल.

आरआयएसचे महासंचालक प्रा. सचिन कुमार शर्मा यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात, वैज्ञानिक प्रशासनाला आकार देण्यात 'ग्लोबल साउथ' ची भूमिका या मुद्यावर भर देत हवामान बदल, आरोग्य व तंत्रज्ञानातील असमानता यांसारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी विज्ञान मुत्सद्देगिरी हे एक महत्त्वाचे साधन असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी आयटीईसी अभ्यासक्रम, आयगॉट कर्मयोगी प्रशिक्षण, फोरम फॉर इंडियन सायन्स डिप्लोमसी पब्लिकेशन्स आणि दक्षिण व आयबीएसए फेलोशिपच्या माध्यमातून जागतिक भागीदारी यांसारख्या आरआयएसच्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या च्या संचालक डॉ. गीता वाणी रायसम यांनी ही भागीदारी म्हणजे कार्यगट आणि संयुक्त प्रकाशने यांना केंद्रस्थानी ठेवून हाती घेण्यात आलेला सहकार्यात्मक तसेच 'ग्लोबल साउथ'मधील सर्व देशांसाठी सारखाच फायदेशीर प्रयत्न असल्याचे म्हटले. त्यांनी विज्ञान संवाद आणि धोरण संशोधनातील एनआयएससीपीआर ची भूमिका स्पष्ट करत सीएसआयआर ची संशोधन आणि विकास (आर अँड डी) परिसंस्था, एचआयव्हीवर उपचारांसाठी परवडणाऱ्या औषधांसंदर्भातील नवोन्मेष, पारंपरिक ज्ञानाची पडताळणी, ग्रामीण नवोन्मेष आणि 15 ओपन ॲक्सेस नियतकालिके या विषयांचा ऊहापोह केला.

आरआयएसचे विज्ञान सल्लागार डॉ. एस.के. वार्ष्णेय यांनी संदर्भ-विशिष्ट उपाययोजना, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि लवचिक आरोग्य प्रणालींसाठी समानता, सार्वभौमत्व आणि मागणी-आधारित भागीदारीवर आधारलेल्या साऊथ-साऊथ यांच्यातील वैज्ञानिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आरआयएसचे सहायक प्राध्यापक डॉ. अमित कुमार यांनी हे सहकार्य म्हणजे आरआयएस च्या धोरणात्मक कौशल्याची सीएसआयआर च्या वैज्ञानिक सामर्थ्याशी सांगड घालणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत व्यक्त करत विज्ञान मुत्सद्देगिरीवरील गोलमेज परिषदेमुळे तो अधिक मजबूत झाला असल्याचे म्हटले.
डॉ. राजन सुधेश रत्ना यांनी वैज्ञानिक मुत्सद्देगिरी ग्लोबल साउथच्या विकासाची चालक असल्याचे अधोरेखित करत 'दक्षिण'च्या माध्यमातून सहकार्य अधिक दृढ करण्याची आरआयएस ची भूमिका विशद केली. सीएसआयआर-एनआयएससीपीआर चे प्रधान वैज्ञानिक डॉ. योगेश सुमन यांनी ग्रामीण उपजीविका आणि शाश्वत विकासासाठी सीएसआयआर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात एनआयएससीपीआर ने बजावलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. फोरम फॉर इंडियन ट्रॅडिशनल मेडिसिन (एफआयटीएम) चे समन्वयक डॉ. सारिन एन. एस. यांनी पारंपरिक ज्ञान आणि औषधे हे दक्षिण-दक्षिण सहकार्याचे आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले, तर डॉ. मोनिका जग्गी आणि डॉ. चारू लता यांनी 'स्वस्तिक' सारख्या उपक्रमांद्वारे विज्ञान मुत्सद्देगिरी आणि पारंपरिक ज्ञान या क्षेत्रांमध्ये एनआयएससीपीआर ने दिलेल्या योगदानाची विशेषत्वाने माहिती दिली.

याप्रसंगी, सर्व मान्यवरांच्या हस्ते : "भारत-कोरिया प्रजासत्ताक विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य: भविष्याची सह-निर्मिती" (संजीव के. वार्ष्णेय, अमित कुमार आणि स्नेहा सिन्हा); "भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकटी: धोरणे, आव्हाने आणि संधी यावरील कार्यशाळेची कार्यवाही" (डॉ. शिव नारायण निषाद, डॉ. विपिन कुमार, डॉ. नरेश कुमार, डॉ. संध्या लक्ष्मणन) आणि धोरण बुलेटिन: "भारतीय राज्यांमध्ये रस्ते वाहतुकीमुळे होणाऱ्या कण प्रदूषणाचे प्रमुख घटक" (डॉ. संध्या लक्ष्मणन) या तीन मोलाच्या दस्तऐवजांचे प्रकाशन करण्यात आले.
आरआयएस च्या सल्लागार डॉ. स्नेहा सिन्हा यांनी, विज्ञान मुत्सद्देगिरीमधील कार्यशाळा आणि संशोधनासह पूर्वीच्या सहकार्याने भविष्यातील सहभागासाठी मजबूत पाया घातला गेला असल्याचे नमूद केले. त्यांनी भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदेपूर्वी भारत-आफ्रिका सहकार्याला केंद्रस्थानी ठेवून आयोजित ग्लोबल साउथमधील विज्ञान मुत्सद्देगिरी या विषयावर आधारित गोलमेज परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच तंत्रज्ञान सामायिकरण व विज्ञान मुत्सद्देगिरीचे दृष्टिकोन संयुक्त अहवालामध्ये एकत्रित केले जाण्याची गरज स्पष्ट केली.
* * *
नितीन फुल्लुके/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258697)
अभ्यागत कक्ष : 10