संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा

प्रविष्टि तिथि: 06 MAY 2026 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 6 मे 2026 रोजी नवी दिल्लीत व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान व्हान जियांग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ही बैठक सौहार्दपूर्ण आणि वाढत्या सामरिक विश्वासाच्या वातावरणात पार पडली, जे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सखोल, दृढ, व्यापक सामरिक भागीदारीचे प्रतिबिंब आहे.

दोन्ही नेत्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि उच्चस्तरीय देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम व क्षमता-बांधणी उपक्रमांसह द्विपक्षीय संबंधांमधील सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः हिंद-प्रशांत प्रदेशातील सामरिक हितसंबंधांमधील वाढत्या एकरूपतेची त्यांनी दखल घेतली.

वाढते सागरी सहकार्य, संरक्षण उद्योग सहकार्याचा विस्तार आणि संयुक्त संशोधन, सह-विकास व सह-उत्पादन उपक्रमांना प्रोत्साहन देऊन संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याविषयी या चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही बाजूंनी बंदरांना भेटी, संयुक्त सराव आणि संस्थात्मक संवाद यंत्रणा यांसारख्या संरक्षण दलांमधील नियमित परस्परसंवादाच्या महत्त्वावरही भर दिला.

संरक्षण मंत्र्यांनी 'प्रदेशातील सर्वांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती' (महासागर) या भारताच्या संकल्पनेनुसार व्हिएतनामसोबत सहकार्य करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी परस्परांना चिंता वाटणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि शांतता, स्थिरता व नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याच्या महत्त्वावर भर दिला.

'एक्स'वरील एका पोस्टमध्ये राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी देण्यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. अलीकडील घडामोडी आमच्या संबंधांमधील सकारात्मक गती दर्शवतात, असेही ते म्हणाले.

या बैठकीत भारत आणि व्हिएतनाम यांनी येत्या काळात आपली संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याच्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी केली.

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2258546) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Telugu