रेल्वे मंत्रालय
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतीय रेल्वे मार्गावर अहमदाबाद येथे सर्व पाच अवजड पोर्टल बीम्स अवघ्या 22 दिवसात कार्यान्वित करण्यात आले
Posted On:
04 MAY 2026 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2026
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अमदावाद वडोदरा रेल्वे मार्गावर मणिनगर येथे सर्व पाच (05) प्री कास्ट, प्री स्ट्रेस्ड अवजड पोर्टल बीम्स (गर्डर्स) अवघ्या 22 दिवसात यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी प्रगतीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
काटेकोर नियोजनांतर्गत क्रमाक्रमाने 8, 13, 24 व 29 एप्रिल रोजी या टप्प्याची कार्यवाही करण्यात आली. सक्रिय असलेल्या रेल्वे मार्गावर अशा प्रकारचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांचे उत्तम समायोजन व वेगवान कृतीची तयारी दिसून येते. यातील सर्वात जड बीम 1360 मेट्रिक टन वजनाचा आहे आणि त्याचे कार्यान्वयन 8 एप्रिल 2026 रोजी पूर्ण झाले. सक्रिय रेल्वेमार्गावर बसवण्यात आलेल्या काही सर्वात वजनदार बीम्समध्ये त्याची गणना होते. या सर्व बीम्स ची वजने 1170 मेट्रिक टन पासून 1360 मेट्रिक टन पर्यंत असून भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकासातल्या सर्वात जास्त गुंतागुंतीच्या कार्यान्वयन प्रकल्पांपैकी हा एक आहे.

बुलेट ट्रेन चा रेल्वेमार्ग मणिनगर जवळ सध्याच्या रेल्वेमार्गाला ओलांडून पुढे जात असल्याने तो उन्नत पातळीवर असून अतिशय अरुंद व अडचणीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यासाठी काटेकोर संरचनात्मक नियोजन आवश्यक होते. दोन पीअर्स अर्थात खांबांमधील अंतर तुलनेने जास्त ( 30 ते 34 मीटर्स) असल्याने अवजड वाहने वाहून नेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना बळकट व मजबूत आधार देणे आवश्यक होते.
या ठिकाणी असलेले पोर्टल बीम हे अहमदाबाद-वडोदरा अप, डाउन आणि थर्ड लाईनसह अनेक सक्रिय भारतीय रेल्वे मार्गांवर वापरण्यात येणारी अवजड संरचना म्हणून तयार केले आहेत. त्यांचा मोठा आकार आणि वजन यामुळे उत्तम स्थिरता आणि कमीत कमी विचलन शक्य होते. सतत वाहतूक सुरू असलेल्या रेल्वे मार्गाची पातळी अचूक राखण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी या संरचना आवश्यक आहेत .

या बीम्स कार्यान्वित करण्यासाठी मुख्य उपकरण म्हणून 2200 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेनचा वापर करण्यात आला. ही यंत्रणा भारतीय रेल्वेमार्गांवर प्रथमच वापरली गेली. प्रत्येक पोर्टल बीमचे कार्यान्वयन भारतीय रेल्वेच्या समन्वयाने केवळ साडेतीन तासांत करण्यात आले. पूर्वी याच कामासाठी 9 तास लागले असते . मर्यादित जागा, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) आणि सक्रिय रेल्वेमार्ग यांसारखी आव्हाने असूनही, ही मोहीम अत्यंत अचूकतेने, कडक सुरक्षा तपासणी आणि सातत्यपूर्ण देखरेखीखाली पार पाडण्यात आली.

अतिरिक्त माहिती:
पोर्टल बीम ही 34 मीटर लांबीची, तसेच 5.5 मीटर × 4.5 मीटर इतका छेद (cross-section) असलेली, पूर्व-निर्मित (precast) काँक्रीट संरचना आहे. या बीम्सचे पूर्व-निर्माण कामाच्या ठिकाणीच केले जात असून, त्यांची उभारणी अवजड एकात्मिक घटकांच्या स्वरूपात केली जात आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257984)
अभ्यागत कक्ष : 33