गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबई परिसरातील कोकेनच्या तस्करीचे मोठे जाळे केले उघड, ₹1,745 कोटी किमतीचे 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन केले जप्त


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) चमूचे केले अभिनंदन

Posted On: 01 MAY 2026 6:19PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक अंतर्गत अमली पदार्थांच्या संघटित तस्करीविरुद्ध केलेल्या एका मोठ्या कारवाईत, कोकेन तस्करी करणारे एक मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीला आणले.  या कारवाईत मुंबई आणि लगतच्या परिसरातून अंदाजे 349 किलोग्रॅम उच्च प्रतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. याचे अवैध बाजारपेठेतील मूल्य सुमारे ₹1,745 कोटी इतके आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून गुप्त माहिती मिळवण्याची व्यवस्था उभारली होती, तसेच सातत्याने पाळतही ठेवली होती. त्यामुळेच विभागाला इतकी मोठी कारवाई करता आली आहे.

आपल्या खबरींकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे विभागाच्या  अनेक पथकांनी कळंबोली - भिवंडी कॉरिडॉर (नवी मुंबई-ठाणे परिसर) क्षेत्रात समन्वित छापे टाकले. या छाप्यांमधून गोदामांसारखी पायाभूत सुविधा वापरून तसेच छुप्या वाहतूक यंत्रणेचा वापर करून चालवले जात असलेले अत्यंत संघटित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ पुरवठा जाळे उघडकीला आले.

यासंदर्भात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनीही X या समाजमाध्यमावरून माहिती दिली. देशाने अंमली पदार्थांचे जाळे संपुष्टात आणण्याचा संकल्प केला आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबईत ₹1745 कोटी किमतीचे 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त करत, एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीविरोधात कारवाई केल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ही कारवाई म्हणजे प्रारंभीच्या टप्प्यापासून ते अखेरच्या टप्प्यापर्यंत अशा स्वरुपाच्या दृष्टिकोनाचे उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दृष्टीकोनाच्या आधारे अमली पदार्थ विरोधी यंत्रणेने एका छोट्या स्वरुपातील तस्करीचा माग काढत मोठ्या जाळे उघडकीला आणले अशा शब्दांत त्यांनी या विभागाच्या कारवाईचे कौतुक केले आहे, आणि याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या चमूचे अभिनंदनही केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही यशस्वी कारवाई केली गेली. ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील सरकारच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे.

दोन टप्प्यातील कारवाईत मोठी जप्ती

या कारवाईअंतर्गत पहिल्या टप्प्यात, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील कळंबोली, सेक्टर केडब्ल्यूसी (KWC), केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळच्या MH-03-DV-3803 या नोंदणी क्रमांकाचे मारुती सुझुकी सुपर कॅरी (सीएनजी) हे वाहन अडवून, वाहनाची तपासणी केली. या तपासणीत कोकेनची 136 पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे 1 किलोग्रॅम इतके होते. ही पाकिटे एका मोठ्या खोक्यात ठेवलेली होती. त्यात क्रिकेट पॅड्स आणि ग्लोव्हजचा वापर करून कोकेन लपवण्यात आले होते. या कारवाईत एका आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

या आरोपीची सखोल चौकशी करून, आणि त्या माहितीच्या आधारे जलद पाठपुरावा आणि कारवाई केली. चौकशीत आरोपीने भिवंडीतल्या एका मोठ्या गोदाम केंद्रात साठवून ठेवलेल्या एका दुसऱ्या पुरवठ्यासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांना दिली. या माहितीच्या आधारे तातडीने विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. त्याअंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने भिवंडी (ठाणे जिल्हा) इथल्या, रेहनाळ गावावतील, रेहनाळ बसस्थानकाजवळच्या लक्ष्मण कंपाऊंड परिसरातल्या गोदामात दुसरी कारवाई केली. या कारवाईत कोकेनची आणखी 213 पाकिटे (प्रत्येकी 1 किलो) जप्त करण्यात आली.

अमली पदार्थ लपवण्याच्या आधुनिक पद्धतीचा उलगडा

हे अंमली पदार्थ भारतात आयात केलेल्या यंत्रांच्या  पोकळीत लपवून आणले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रत्येक पाकीट वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथीनच्या 9 थरांमध्ये पॅक करण्यात आले होते, आणि त्यावर काळ्या तेलकट पदार्थाचा एक थर देखील लावला गेला होता.

भिवंडीतील गोदाम परिसंस्थेचा अगदी सुनियोजित पद्धतीने लपवलेल्या कोकेनसह, यंत्रसामग्रीची आयात, गोदामांमध्ये कोकेनच्या पाकिटांची साठवणूक आणि कोकेन बाहेर काढणे आणि अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी वापर केला जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

या पुरवठ्याच्या खेपेचा मुख्य सूत्रधार, तस्करांचे व्यवस्थापन करणारे, आर्थिक रसद पुरवणारे आणि हे अंमली पदार्थ विकत घेणाऱ्या व्यक्तींना पकडण्यासाठी विभाग सखोल तपास करत आहे. देशात साधारणपणे दरवर्षी सरासरी सुमारे 200-300 किलो कोकेन जप्त केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी जप्ती महत्वाची मानली जात आहे.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2257416) अभ्यागत कक्ष : 13