संरक्षण मंत्रालय
प्रोजेक्ट 17ए अंतर्गत स्वदेशी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ नौदलाकडे सुपूर्द
पहिल्या जहाजाच्या सुपूर्दगीनंतर 17 महिन्यांच्या आत प्रोजेक्ट 17ए चे 6वे जहाज नौदलाकडे सुपुर्द
Posted On:
01 MAY 2026 2:34PM by PIB Mumbai
महेंद्रगिरी (यार्ड 12654) हे निलगिरी-श्रेणीचे (प्रोजेक्ट 17ए) सहावे जहाज आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेले या श्रेणीतील चौथे जहाज 30 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील एमडीएसएल येथे भारतीय नौदलाकडे सुपुर्द करण्यात आले. युद्धनौकांच्या रचना आणि बांधकामात आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
प्रोजेक्ट 17ए अंतर्गत विकसित फ्रिगेट्स (रडारवर दिसणार नाहीत अशी जहाजे) या बहुपयोगी आणि बहु-उद्देशीय युद्धनौका असून सागरी क्षेत्रातील सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या विकसित करण्यात आल्या आहेत. ही अत्याधुनिक फ्रिगेट नौदल रचना, स्टेल्थ क्षमता, प्रबळ मारक क्षमता, स्वचालन आणि उच्च टिकाऊपणा यांमध्ये ही युद्धनौका एक मोठी झेप दर्शवते, तसेच युद्धनौका बांधणीतील भारताच्या आत्मनिर्भरतेचे एक प्रशंसनीय प्रतीक आहेत.
ही युद्धनौका वॉरशिप डिझाइन ब्युरो (डब्ल्यूडीबी) यांनी डिझाइन केली आहे तर वॉरशिप ओव्हरसीइंग टीम (मुंबई) यांच्या देखरेखीखाली तिची निर्मिती झाली आहे. P17A फ्रिगेट्स अंतर्गत तयार झालेल्या युद्धनौका स्वदेशी जहाज रचना, स्टेल्थ तंत्रज्ञान, टिकाऊपणा आणि लढाऊ क्षमतेमध्ये नव्या पिढीची झेप दर्शवतात. एकात्मिक बांधणीच्या संकल्पनेनुसार या युद्धनौकेची बांधणी आणि तिचा ताबा देण्याची प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाली आहे.
P17 (शिवालिक-श्रेणी) च्या तुलनेत P17A युद्धनौका प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये संयुक्त डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रणोदन प्रणाली असून त्यात प्रत्येक शाफ्टवरील कंट्रोलेबल पिच प्रोपेलर (CPP) चालवण्यासाठी एक डिझेल इंजिन आणि एक गॅस टर्बाइन आहे, तसेच एक अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली (IPMS) देखील आहे. या युद्धनौकेत पृष्ठभागावरील, हवाई आणि पाणबुडी विरोधी युद्धासाठी सक्षम अशी आधुनिक शस्त्र आणि सेंसर प्रणाली आहे.
मेसर्स एमडीएसएल (MDSL) कंपनीने 20 डिसेंबर 2024 रोजी पहिली पी17ए (नीलगिरी) सुपूर्द केल्यानंतर 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेले महेंद्रगिरी ही सहावे पी17ए युद्धनौका आहे. महेंद्रगिरीचा नौदलाकडे दिलेला ताबा ही देशाची रचना, जहाजबांधणी आणि अभियांत्रिकीमधील प्रवीणता दर्शवते तसेच जहाज रचना व जहाजबांधणी या दोन्हीमध्ये आत्मनिर्भरतेवर नौदलाचे असलेले अविरत लक्ष प्रतिबिंबित करते. 75% स्वदेशी सामग्री असलेल्या या प्रकल्पात एमडीएसएलमधील 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSMEs) सहभाग होता. या प्रकल्पामुळे सुमारे 4,000 लोकांना थेट तर 10,000 हून अधिक जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे.




***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257356)
अभ्यागत कक्ष : 17