सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
भरत खेरा यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 MAY 2026 1:38PM by PIB Mumbai
भरत खेरा यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

भरत खेरा हिमाचल प्रदेश कॅडरचे 1995 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, त्यांना तीन दशकांपेक्षा जास्त काळाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते ग्राहक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते.
केंद्र सरकारसोबतच्या आपल्या कार्यकाळात, खेरा यांनी नोव्हेंबर 2014 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत संरक्षण मंत्रालयात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ संयुक्त सचिव म्हणून काम केले. हवाई दलाचे संयुक्त सचिव म्हणून त्यांनी भारतीय हवाई दलाशी संबंधित बाबीही हाताळल्या, यासोबतच 2017 ते 2020 या कालावधीत सलग चार वर्षे प्रजासत्ताक दिन सोहळ्यांसह विविध राष्ट्रीय समारंभ कार्यक्रमांच्या समन्वयाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. याव्यतिरीक्त संरक्षण मंत्रालयातील सीमा रस्ते संस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित बाबींची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
संरक्षण उत्पादन विभागात कार्यरत असताना, खेरा हे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड तसेच हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडच्या संचालक मंडळाचे सदस्यही होते. त्यांनी संरक्षण विषयक पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यामध्ये महत्त्वाचे योगदानाही दिले आहे.
याशिवाय खेरा यांनी सुमारे दोन वर्षे मंत्रिमंडळ सचिवालयात संयुक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे. याकाळात त्यांनी वाणिज्य आणि उद्योग तसेच तंत्रज्ञान विभागाची कामे हाताळली आहेत, याशिवाय कोविड 19 महामारीच्या काळात धोरणात्मक पातळीवर धोरण आखणीमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.

खेरा यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर म्हणून आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी सिरॅक्युज युनिव्हर्सिटीच्या मॅक्सवेल स्कूल इथून, मास्टर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सार्वजनिक प्रशासनासंबंधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मधून त्यांनी सार्वजनिक धोरणांशी संबंधित प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये ते चेव्हनिंग गुरुकुल फेलो (पाठ्यवृत्तीधारक) देखील होते.
खेरा यांनी हिमाचल प्रदेश राज्य सरकारमध्ये गृह सचिव आणि सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, राज्य कर आणि उत्पादन शुल्क, माहिती आणि जनसंपर्क तसेच ऊर्जा यांसारख्या विभागांचे प्रधान सचिव या पदांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी राज्य रस्ते परिवहन महामंडळ, राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि हिमाचल प्रदेश फलोत्पादन उत्पन्न विपणन आणि प्रक्रिया महामंडळाचे (HPMC - Himachal Pradesh Horticultural Produce Marketing and Processing Corporation) व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
आजमितीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातला वाटा 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, यासोबतच हे क्षेत्र रोजगार निर्मिती, उत्पादन आणि निर्यातीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. या विभागाचे सचिव म्हणून भरत खेरा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तसेच विकसित भारत 2047 चा संकल्प साकारण्यासाठी आपली प्रामाणिक भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहेत.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257342)
अभ्यागत कक्ष : 16