अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने धोरणात्मक मनुष्यबळ विस्ताराद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केले बळकट


आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आयबीपीएसद्वारे 50,000 हून अधिक उमेदवारांची निवड, मागील वर्षाच्या तुलनेत 33% वाढ

Posted On: 30 APR 2026 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2026

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने,  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील मनुष्यबळ क्षमता बळकट करण्यासाठी सुनियोजित मनुष्यबळ विस्तार, सुधारित कार्यान्वयन कार्यक्षमता आणि प्रशासन-केंद्रित सुधारणांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण व लक्ष्यित उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सुनियोजित प्रमाणावर होणारी भरती ही उत्तम मनुष्यबळ व्यवस्थापनाचा आधारस्तंभ आहे. यामुळे इष्टतम मनुष्यबळ संख्या आणि शाश्वत कार्यान्वयन कार्यक्षमता सुनिश्चित होते. एक लवचिक, ग्राहक-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज बँकिंग प्रणाली उभारण्याच्या सरकारच्या व्यापक उद्दिष्टाशी हे प्रयत्न सुसंगत आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील  भरती ही सहभागी बँकांच्या विशिष्ट मनुष्यबळाच्या गरजेनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत केली जाते. ही केंद्रीकृत आणि मानकीकृत चौकट निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या बँकांमध्ये एकूण 50,552 उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. हे बँकिंग क्षेत्राच्या वाढत्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळात झालेली लक्षणीय वाढ दर्शवते.  आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा आकडा 30,827 होता आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तो वाढून 37,860 झाला होता. यातून  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मनुष्यबळात स्पष्ट आणि सातत्यपूर्ण वार्षिक वाढ तसेच त्यांच्या कार्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ सुनिश्चित करण्याच्या दिशेने असलेला नियोजित दृष्टिकोन दिसून येतो.

वाढीव भरतीमुळे खालील गोष्टी साध्य होण्याची अपेक्षा आहे:

  • कार्यवाहीची क्षमता बळकट करणे आणि कामाचा ताण कमी करणे
  • ग्राहक सेवा वितरण आणि प्रतिसाद सुधारणे
  • ज्या भागात बँकिंग सेवांची कमी उपलब्धता आहे तेथे त्यांच्या विस्तारास पाठिंबा देणे
  • आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि पतपुरवठ्याची व्याप्ती अधिक वाढवणे 
  • देशाच्या विकासाला प्रभावीपणे पाठबळ पुरवता यावे, यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सक्षम करणे

सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुरेशा, कुशल आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळाने सुसज्ज असतील, जेणेकरून त्या आर्थिक समावेशनाला चालना देण्यात, आर्थिक घडामोडींना चालना देण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

 

* * *

सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256991) अभ्यागत कक्ष : 21