रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
प्रवास भीतीकडून भयमुक्ततेकडे : नवा खंबाटकी घाट बोगदा, घाटातून जाणारा अधिक सुरक्षित मार्ग
Posted On:
27 APR 2026 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2026
पुणे-सातारा महामार्गावरचा खंबाटकी घाट पट्टा अनेक वर्षांपासून संयम आणि धैर्याची परीक्षा घेणारा म्हणून ओळखला जातो. अरूंद मार्गिका, एस आकाराची तीव्र वळणे, प्रदीर्घ काळ वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात यामुळे या प्रवासाचा ताण येत असे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हा प्रवास त्रासदायकच. जो प्रवास कमी वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असे तो बोगद्यातील वाहनांच्या कोंडीमुळे दमछाक करणारा ठरत असे.
पण आता ही स्थिती बदलत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, एनएच -4 वर (नवा एनएच -48) नवा खंबाटकी घाट सहा पदरी दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला असून हा प्रकल्प, महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक क्षेत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वाहतूक पट्ट्याचे रूपांतर आधुनिक आणि लोककेंद्रित पायाभूत सुविधांच्या एका प्रतीकात करत आहे.
चाचणी परिचालन आणि सुरक्षा मूल्यमापनाचा एक भाग म्हणून दुहेरी बोगद्याची एक बाजू प्रायोगिक उद्देशाने प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुधारित पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य होईल.
प्रकल्पाची प्रत्यक्ष प्रगती 86 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून बोगद्याचे उद्घाटन 2026 च्या पहिल्या सहामाहीत होण्याच्या दृष्टीने नियोजनानुसार काम प्रगतीपथावर आहे.
घाटातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशाला नवीन बोगद्यात प्रवेश करताच तेथील फरक लगेचच जाणवतो.
"येथे अधिक रिफ्लेक्टर्स म्हणजे प्रकाश परावर्तक, उत्तम प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, स्पष्टपणे दिसणारे सुरक्षा कठडे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ठिकाणी अग्निशामक यंत्रे उपलब्ध आहेत. जुन्या बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा खूपच अधिक रुंद आहे आणि सुरक्षेचा पूर्ण विचार करूनच याची रचना करण्यात आली आहे."
सातारा ते पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या आणखी एका प्रवाशाने जुन्या मार्गावरील रोजच्या त्रासाच्या आठवणींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले.
''पूर्वी, जुन्या बोगद्यात फक्त दोनच मार्गिका होत्या. त्यामुळे त्यात मोठी वाहतूक कोंडी होत असे. जर एखादी कार किंवा ट्रक बिघडले आणि मध्येच थांबले , तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत आणि गंभीर अपघाताचा धोका निर्माण होत असे. जुन्या बोगदा मार्गे प्रवासाचा कालावधी साधारणपणे 15-20 मिनिटे होता. आता, नवीन बोगद्यामुळे हेच अंतर 5–10 मिनिटांवर आले आहे.”
जिथे एकेकाळी वाहतूक कोंडी होत असे, तो भाग आता महामार्गावरील सर्वात जलद आणि सुगम पट्ट्ट्यांपैकी एक ठरला आहे.
खंडाळा ते सातारा असा रोज प्रवास करणाऱ्या जवळच्या गावातल्या दोन स्थानिक महिलांसाठी तर या बोगद्याने त्यांचे दैनंदिन आयुष्यच बदलवून टाकले आहे.
''हा नवा बोगदा प्रवासासाठी अतिशय चांगला आणि अतिशय सुरक्षित आहे . जुन्या बोगद्यामध्ये प्रवासाला अधिक वेळ लागायचा आणि अपघातांचा धोकाही खूप जास्त होता. आम्ही रोज प्रवास करतो, आता आमच्या वेळेची मोठी बचत होत आहे. बोगद्याच्या आतली प्रकाशयोजना उत्तम असून यामुळे तिथे सुरक्षित वाटते. पूर्वी अंधार ही एक मोठी समस्या होती, पण आता तसे राहिलेले नाही."
हा बोगदा का महत्त्वाचा आहे ..
सध्याचा खंबाटकी घाट पट्टा मुंबई-पुणे–बंगळुरू महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. हा पट्टा पुणे, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव यांसारख्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच पाचगणी, महाबळेश्वर आणि कास पठाराकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांना आणि सज्जनगडाला जाणाऱ्या भाविकांनाही सेवा पुरवतो.
मात्र या जुन्या सुविधेची क्षमता आता संपुष्टात आली होती:
- एका दिशेने जाणारा 0.85 किमी लांबीचा दुपदरी बोगदा
- विरुद्ध दिशेने जाणारा 8 किमी लांबीचा घाटातील रस्ता
- तीव्र वळणे, तीव्र चढ आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी
- अपघातांचा मोठा धोका, तसेच इंधन व वेळेचा प्रचंड अपव्यय
नवा बोगदा या सर्व अडचणींचे निराकरण करणारा आहे.
अभियांत्रिकी सुरक्षा, वेग आणि व्याप्ती
नव्या सहा पदरी दुहेरी बोगद्यामुळे पुणे आणि साताऱ्यामधील प्रवासात क्रांती घडत आहे:
- प्रवासाचा वेळ कमी झाला आहे.
- अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
- इंधन आणि वाहनाच्या देखभालीच्या खर्चात घट.
- वाहनांची क्षती कमी होईल.
- स्थानिक प्रवासी, व्यापार आणि पर्यटनासाठी अधिक चांगले दळणवळण.
घाटांमधून सुरक्षित प्रवास
जेव्हा पायाभूत सुविधांची रचना मानवी अनुभव केंद्रस्थानी ठेवून केली जाते तेव्हा ते निव्वळ वाहनांची ये-जा करण्याचा एक मार्ग म्हणून मर्यादित राहत नाहीत, याचा पुरावा नवा खंबाटकी घाट दुहेरी बोगदा प्रकल्प आहे. अशा रचना भीती दूर करतात, जीवनरक्षक ठरतात, वेळेचे मोल जपतात आणि आपोआपच प्रवासाचा विश्वास जागवतात.


* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256362)
अभ्यागत कक्ष : 18