रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशासाठी खुशखबर! एक साप्ताहिक आणि एक दररोज धावणाऱ्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे स्वस्त आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती विस्तारणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी, बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा

नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या, भारताच्या आध्यात्मिक क्षेत्रांना मध्य भारतामार्गे महाराष्ट्राच्या वित्तीय आणि सांस्कृतिक शहरांशी जोडणार

Posted On: 27 APR 2026 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2026

 

भारतीय रेल्वेने आपल्या प्रादेशिक वाहतूक सेवेचा विस्तार करत, महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे  उत्तरप्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. दररोज धावणारी बनारस-हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस)यांचा यात समावेश आहे.

भारताच्या मुख्य सांस्कृतिक आणि वित्तीय मार्गिकांना परस्परांशी जोडणाऱ्या, या गाड्या, मोठी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांमधील बंध अधिक दृढ करतील, तसेच, भविक आणि कामगार वर्गासाठीही प्रवासाच्या सुखकर सुविधा उपलब्ध करून देतील. सर्वसामान्य व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या अमृत भारत गाड्यांमध्ये, आरामदायी प्रवास, सुविधा आणि परवडणारे दर यांचा संगम आहे, ज्यातून, देशात सर्वमावेशक आणि सहज उपलब्ध अशा रेल्वेसेवेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया, म्हणजेच 28 एप्रिल 2026 रोजी बनारस-हडपसर (पुणे) आणि अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

 

अल्प उत्पन्न आणि मध्यम वर्गाच्या कुटुंबांसाठी, विशेषतः चालवण्यात येणाऱ्या, ह्या अमृत भारत गाड्या पूर्णपणे बिगर- वातानुकुलित, अत्याधुनिक सेवा असलेल्या आणि सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुविधांवर भर देणाऱ्या आहेत. या गाड्यांमध्ये सामान्य, आणि सामान्य शयन श्रेणी डबे असून, त्यात खानपान सेवा आणि दिव्यांग स्नेही सुविधाही आहेत. ह्या गाड्यांमध्ये अनेक अद्ययावत सुविधाही आहेत. नव्या प्रकारच्या आसन आणि शयन व्यवस्था वंदे भारत स्लीपर करून  प्रेरणा घेऊन केल्या  आहेत. तसेच, त्यात धक्के लागू नयेत असे सेमी- स्वयंचलित कपलर्स, आणि अपघाताच्या वेळी सुरक्षा देणारी उच्च सुरक्षा मानके यांचा समावेश असेल.

या गाड्या सीसीटीव्ही देखरेखीखाली असतील, तसेच त्या आपत्कालीन टॉक-बॅक प्रणाली, एरोसोल-आधारित अग्निशमन व्यवस्था आणि पूर्णतः सीलबंद गँगवे यांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत.

बनारस-हडपसर(पुणे) गाडी मुळे, काशी विश्वनाथ धाम ला जाण्याची सोय होऊ शकेल.  तर अयोध्या-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी, श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. या गाड्यांमुळे महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणे शक्य होईल.  विशेषतः दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित मंजूर आणि महाराष्ट्र व उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना या गाड्यांचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. थेट संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.

बनारस -हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेस

जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक, कालातीत आध्यात्मनगरी, संस्कृती आणि परंपरांचे शहर असलेल्या बनारस पासून ही गाडी  सुरू होईल. काशी म्हणून पूजनीय असलेल्या या शहरात, पवित्र काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा घाट अनेक भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शहरात, अध्यात्माची अनुभूती गंगेच्या प्रवाहाइतकीच खोल असते, असे म्हणतात.

रेल्वे वाहतूक सेवा वाढवत,  विविध राज्यातल्या लोकांना, त्यांच्या श्रद्धा आणि समृद्धी यांना परस्परांच्या जवळ आणण्यात भारतीय रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे . पुण्याशी थेट आणि परवडणारी संपर्क सेवा उपलब्ध झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या होतील, तसेच स्थलांतरित कामगारांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

हडपसर, हे या मार्गाचे शेवटचे स्थानक आहे. पुणे शहराचे हे एक उपनगर  आहे. महाराष्‍ट्रातील एक मोठे शैक्षणिक केंद्र असून, सांस्कृतिक  आणि कला राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे.

समृद्ध वारसा असलेले पुणे शहर भरभराटीचे आर्थिक केंद्र बनले आहे. शहरामध्‍ये  मोठे आयटी पार्क आणि विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) पुण्‍यात आहेत.  त्यामुळे  उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाकांक्षी तरुण आणि नोकरीच्या शोधात आलेल्या स्थलांतरितांसाठी एक नैसर्गिक आकर्षणाचे शहर बनले आहे. परंपरा आणि संधी यांच्यामध्‍ये सहजतेने दुवा साधणारे पुणे शहर आहे.

ज्यावेळी रेलगाडी  बनारस सोडून पश्चिमेकडील प्रवासाला सुरुवात करते, त्यावेळी प्रवासाच्या सुरुवातीच्या थांब्यांपैकी एक प्रयागराज आहे. हे शहर त्रिवेणी संगम आणि कुंभमेळ्याचे स्थान  आहे.  तसेच अलाहाबाद विद्यापीठासारख्या संस्था असलेले एक प्रमुख शैक्षणिक  केंद्र आहे. पुण्‍याप्रमाणेच  अलाहाबादही  आयटी आणि उत्पादन केंद्र आहे, त्यामुळे या  जोडणीचा थेट फायदा महाराष्ट्रात संधी शोधणाऱ्या अलाहाबाद  शहरातील विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गाला होतो.

बुंदेलखंडच्या मध्यवर्ती भागातून पुढे जात, ट्रेन झाशीला पोहोचते. ओरछा आणि खजुराहो यांचा समावेश असलेल्या भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन मार्गांपैकी एकाचे झाशी हे प्रवेशद्वार आहे.

मध्य प्रदेशात प्रवेश केल्यावर, प्रवास भोपाळ (राणी कमलापती स्थानक) पर्यंत सुरू राहतो. त्यानंतर ही रेलगाडी  इटारसी आणि नर्मदापुरममधून जाते.   हा भाग एकत्रितपणे मध्य प्रदेशातील सर्वात उत्पादक कृषी पट्ट्यांपैकी एक आहे. या क्षेत्रामध्‍ये  गहू, सोयाबीन आणि कडधान्ये पिकतात. या मार्गात त्यांचा समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना महाराष्ट्राच्या घाऊक बाजारपेठांमध्ये जलद आणि स्वस्त प्रवेश मिळतो.  यामुळे उत्पादनाच्या  वाहतूक खर्चात लक्षणीय घट होते.

पुढे, जसजसे भौगोलिक स्थिती बदलते आणि गाडी दख्खनच्या पठाराच्या दिशेने उतरते, तसतसे भारताची 'केळीची राजधानी' म्हणून ओळखले जाणारे आणि देशातील केळी आणि कापसाच्या  सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेले जळगाव स्थानक येते. पुण्याला थेट मार्ग मिळाल्यामुळे तेथील कृषी व्यापाऱ्यांना अधिक कार्यक्षम बाजारपेठ उपलब्ध होते, तर भुसावळ, हे एक प्रमुख रेल्वे जंक्शन आणि मोठ्या औष्णिक वीज प्रकल्पाचे ठिकाण आहे, तेथील मोठ्या कामगार वर्गासाठी सुधारित प्रवासी संपर्क मार्ग  मिळतो.

हा प्रवास प्रवाशांना मनमाड आणि कोपरगावला घेऊन येतो. ही स्थानके शिर्डीला जाण्यासाठी प्रमुख रेल्वे मार्गाचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात. शिर्डी हे साईबाबांचे तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी उत्तर भारतातून लाखो भाविक येतात. ही रेल्वे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील यात्रेकरूंना शिर्डीला जाण्यासाठी अधिक थेट आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध करून देते. त्यामुळे  स्थानिक धार्मिक पर्यटन अर्थव्यवस्थेला भरीव चालना मिळते.

बनारस–हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेसचा प्रवास बनारस येथून सायंकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा हडपसर (पुणे) येथे समाप्त होईल. अशा प्रकारे हा प्रवास पूर्ण करण्यास सुमारे 30 तास लागतील. ही गाडी 18 ठिकाणी थांबेल.

अयोध्या-मुंबई (एलटीटी) अमृत भारत एक्सप्रेस

अयोध्या हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी आणि पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून नावारूपाला आले आहे.  दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांना आकर्षित करणा-या  या  शहरात  सध्या पायाभूत सुविधांच्या प्रचंड विस्ताराचे काम सुरू आहे.  नवीन विमानतळ, द्रुतगती महामार्ग आणि हॉटेल्स यामुळे अयोध्‍येचे  भौगोलिक आणि शहरी स्वरूप अक्षरशः रातोरात पालटून गेले आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लाखो स्थलांतरितांचे घर आहे. या समुदायाचे आपल्या गावांसोबतच भावनिक नात्यासोबतच आर्थिक नातेही आहे. अशा परिस्थितीत, मुंबईतील लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या, आणि उत्तर भारतीयांसाठी उतरण्याचे मुख्य ठिकाण असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत थेट आणि परवडणाऱ्या तिकीट दरातील अमृत भारत एक्स्प्रेस सुरू होणे, मोठा बदल घडवून आणणारी घडामोड ठरली आहे. ही गाडी दोन शहरांना जोडण्यासोबतच लोकांना पुन्हा त्यांच्या मुळांशी जोडणारी, घरी जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चात बचत घडवून आणणारी आणि देशासाठी राबणाऱ्या स्थलांदरीत कष्टकरी समुदायांपैकी एक असलेल्या या समुदायाला, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली त्यांची हक्काची सुविधा मिळवून देणारी ठरली आहे.

 

ही रेल्वे संध्याकाळी अयोध्या कँट येथून सुटेल आणि आपला प्रवास सुरू करेल. सुलतानपूर आणि प्रतापगड हे या प्रवासातील सुरुवातीचे प्रमुख थांबे असतील.ही रेल्वे गाडी प्रयागराज इथे थांबेल.त्यापुढे ही गाडी मध्य प्रदेशात प्रवेश करेल आणि जबलपूरला पोहोचेल. जबलपूरनंतर इटारसी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आणि कृषी केंद्र ओलांडून ही रेल्वे महाराष्ट्रात प्रवेश करेल. महाराष्ट्रातील शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे थांबे असलेले भुसावळ आणि जळगाव पार करेल .

नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत पोहचून ही रेल्वेगाडी रेल्वेच्या महाराष्ट्रातील नाशिक विभागात प्रवेश करेल. हा भाग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रासाठी आणि इथल्या समृद्ध  वाइन उद्योगासाठी ओळखला जातो. त्यानंतर ही रेल्वेगाडी आपल्या अखेरच्या स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरु करेल. आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात ही रेल्वे गाडी मुंबईच्या उपनगरीय पट्ट्यातील महत्त्वाच्या असलेल्या कल्याण आणि ठाणे स्थानकांनंतर ही रेल्वे आपल्या प्रवासाचा अगदी अखरेचा टप्पा सुरु करेल आणि अंतिमतः   लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल,

अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाडीचा उद्घाटनीय प्रवास अयोध्या कँट इथून संध्याकाळी सुरू होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी  उशिरा ही गाडी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस इथे पोहोचेल. साधारणपणे 28 तासांत ही रेल्वे आपला प्रवास पूर्ण करेल, या प्रवासात ही गाडी महत्त्वाचे 12 थांबे घेईल.

या दोन नवीन रेल्वे गाड्यांची सेवा सुरु झाल्याने देशात सध्या कार्यान्वित असलेल्या एकूण अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाड्याची संख्या आता 66 वर पोहोचेल.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256083) अभ्यागत कक्ष : 34