सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत टॅक्सीचा मुंबईत विस्तार; पीयूष गोयल यांनी मुंबईत ‘भारत टॅक्सी ड्रायव्हर ऑनबोर्डिंग’ उपक्रमाचे केले उद्घाटन


हा उपक्रम चालकांचे कल्याण, डिजिटल सक्षमीकरण आणि संघटित शहरी वाहतूक प्रणालींच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करतो

Posted On: 24 APR 2026 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 एप्रिल 2026

 

शहरी वाहतूक मजबूत करण्याच्या आणि चालकांची उपजीविका सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि मुंबई उत्तरचे खासदार पीयूष गोयल यांनी 23 एप्रिल, 2026 रोजी मुंबईत 'भारत टॅक्सी ड्रायव्हर ऑनबोर्डिंग' उपक्रमाचे उद्घाटन केले. कांदिवली पश्चिम येथील कमला विहार स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमात शेकडो ऑटो-रिक्षा आणि कॅब चालक, परिवहन संघटनांचे प्रतिनिधी आणि सहकारी संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. चालकांचा सहभाग वाढवणारा, पारदर्शकता सुधारणारा आणि कमाईच्या चांगल्या संधी निर्माण करणारा असा सुसंघटित डिजिटल मंच सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पीयूष गोयल यांनी भारताच्या विकसित होत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी आणि तंत्रज्ञान-आधारित प्रारूपांच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, भारत टॅक्सीमुळे चालकांना भागीदार म्हणून सहभागी होता येते आणि त्याचबरोबर त्यांना अशा डिजिटल साधनांचा लाभ मिळतो, ज्यामुळे पारदर्शकता, कमाई आणि श्रमाची प्रतिष्ठा सुधारू शकते. त्यांनी नमूद केले की, असे उपक्रम भारताच्या शहरी वाहतूक व्यवस्थेची भविष्यातील दिशा दर्शवतात.

प्रमुख शहरांमधील चालक-केंद्रित गतिशीलता प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही ऑनबोर्डिंग मोहीम राबवली जात आहे. ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करून, कार्यान्वयन कार्यक्षमता सुधारून आणि फेरीच्या मागणीची अधिक सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करून हा उपक्रम चालक आणि प्रवासी या दोघांसाठी एक शाश्वत आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करू इच्छितो. दिल्ली एनसीआर, गुजरात, चंदीगड आणि लखनौ यांसारख्या शहरांच्या वाढत्या जाळ्यात मुंबईचा समावेश झाला आहे, जिथे संघटित गतिशीलता नेटवर्कचा सातत्याने विस्तार होत आहे.

अलीकडील परिचालन निर्देशांक या मंचाची वाढ दर्शवतात, ज्यामध्ये 5.17 लाखांहून अधिक चालक कार्यरत आहेत, 50 लाखांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत आणि शहरांमधून दरमहा जवळपास 10 लाख फेऱ्यांची सुविधा दिली जाते. या प्रसंगी बोलताना भारत टॅक्सीचे सीओओ विवेक पांडे म्हणाले की, मुंबई ही एक उच्च क्षमतेची बाजारपेठ आहे आणि स्थानिक चालक संघटनांकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे मंचाच्या विस्तार योजनांवर आणि शहरात एक मजबूत चालक परिसंस्था उभारण्याच्या वचनबद्धतेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

हा विस्तार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीशी सुसंगत आहे, ज्यानुसार पुढील तीन वर्षांत भारत टॅक्सी भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कार्यरत होईल. या राष्ट्रीय विकास आराखड्यात मुंबई एक महत्त्वाचा टप्पा म्हणून उदयास येत आहे. महानगरांमधील चालक आणि प्रवाशांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देऊन तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक आणि सहकारी गतिशीलता प्रणालींना सक्षम करण्याचे सरकारचे सततचे प्रयत्न हा कार्यक्रम अधोरेखित करतो.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255377) अभ्यागत कक्ष : 11