कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या (एससीईआरटी) पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ची अंमलबजावणी तसेच शैक्षणिक सुधारणांचा घेतला आढावा


भविष्यासाठी सज्ज अध्ययनासाठी शिक्षकांच्या शिक्षणाला बळकटी देण्यावर तसेच स्किल्स ऑन व्हील्स उपक्रमाचा आवाका वाढवण्यावर दिला भर

Posted On: 23 APR 2026 8:19PM by PIB Mumbai

पुणे, 23 एप्रिल 2026

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाला (एससीईआरटी) भेट दिली आणि महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांचा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री चौधरी यांनी या भेटीत महाराष्ट्र एससीईआरटीमध्ये कार्यरत शिक्षकवर्ग आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी तपशीलवार चर्चा केली आणि निपुण महाराष्ट्र मोहीम, राज्य अभ्यासक्रम आराखडा, पीएमश्री विद्यालये, व्यावसायिक शिक्षणाचे पर्याय, डिजिटल शिक्षण विषयक उपक्रम तसेच शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि हमी आराखडा (एसक्यूएएएफ) इत्यादी उपक्रमांसह राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या शैक्षणिक कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) सक्षम साधने, डिजिटल आशय मंच आणि रियल टाईम माहिती उपलब्ध करून देणारी यंत्रणा यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीची केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी नोंद घेतली. शिक्षकांना धड्यांचे नियोजन, मूल्यांकन आणि आशय निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांचा वापर करण्यासाठी सक्षम करणाऱ्या ‘एआय साथी’ या शिक्षकांसाठी सुरु केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

विविध क्षेत्रांतील संरचनात्मक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शालेय शिक्षणातच, कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्याच्या दिशेने राज्य करत असलेल्या प्रयत्नांचा केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला.  शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर कौशल्याधारित अध्ययनाला बळकटी देण्याच्या गरजेवर त्यांनी अधिक भर दिला.

अगदी तळागाळातील स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण थेट उपलब्ध करून देणाऱ्या “स्किल्स ऑन व्हील्स”या उपक्रमासारख्या कौशल्य शिक्षणाला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रमाण वाढवण्याचे निर्णायक महत्त्व, चौधरी यांनी अधोरेखित केले. कौशल्याधारित शिक्षणाच्या उपलब्धतेचा विस्तार होण्यासाठी आणि विकसित भारत 2047 ची संकल्पना पुढे नेण्यासाठी, असे उपक्रम अत्यावश्यक ठरतात यावर त्यांनी अधिक भर दिला.

महाराष्ट्रात विकसित करण्यात आलेल्या सर्वोत्तम पद्धती, विशेषतः डिजिटल अध्यापनशास्त्र, कौशल्याचा समावेश आणि वर्ग स्तरावरील अंमलबजावणी या क्षेत्रांमधील पद्धतींचे दस्तावेजीकरण करून त्या इतर राज्यांशी सामाईक करण्याची सूचना त्यांनी दिली.

या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारचे शिक्षण आयुक्त  सचिन प्रताप सिंह, महाराष्ट्र एससीईआरटीचे प्रभारी संचालक डॉ.नंदकुमार बेडसे यांच्यासह राष्ट्र शिक्षण विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255001) अभ्यागत कक्ष : 39