संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हित सुरक्षा तसेच जागतिक स्थैर्य आणि लवचिकता यांसाठी विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारतासमवेत सहविकास आणि सहउत्पादन करायला हवे: म्युनिच येथे बोलताना संरक्षणमंत्र्यांनी जर्मन उद्योगांतील धुरिणांना संबोधतांना दिला सल्ला


“वाढत्या जागतिक अनिश्चिततांच्या काळात, विश्वसनीयता तसेच सामायिक हित यांवर आधारित भागीदारी अपरिहार्य आहे”

“भारताचा स्वावलंबनाचा ध्यास आत्मकेंद्री नाही, तर आम्ही त्याकडे विश्वसनीय भागीदारांसह संरचना, विकास आणि उत्पादन करण्याची क्षमता म्हणून पाहतो”

Posted On: 23 APR 2026 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीतील उद्योगांना भारतात सह-विकास आणि सह-उत्पादन करण्यासाठी, विशेषतः विशिष्ट तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात असे उपक्रम हाती घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. विश्वासार्हता आणि सामायिक हित यांच्यावर आधारित भागीदारी संबंधांना चालना देण्याची गरज अधोरेखित करत राजनाथ सिंह म्हणाले की भू-राजकीय क्षेत्रात सध्या होत असलेले बदल, पुरवठा साखळ्यांतील अडथळे, तंत्रज्ञानातील वेगवान परिवर्तने तसेच वाढत्या जागतिक अनिश्चिततांच्या काळात असे भागीदारी संबंध अपरिहार्य आहेत. युरोपीय देशाच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, 23 एप्रिल 2026 रोजी म्युनिच येथे आयोजित संरक्षणसंबंधी गुंतवणूक शिखर परिषदेदरम्यान भारतीय तसेच जर्मनीमधील संरक्षण उद्योगांतील प्रमुख व्यक्तींना संबोधित करताना ते बोलत होते.  

राष्ट्रे आणि उद्योग आता त्यांच्या स्वतःच्या अवलंबित्वाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत, त्यांच्या पुरवठा साखळ्यांचे वैविध्यीकरण करत आहेत तसेच लवचिकता, सातत्य आणि परस्पर विश्वास यांची खात्री देणारे विश्वासार्ह भागीदार शोधत आहेत असे  संरक्षणमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत भारत, स्थैर्य, अंदाज मांडता येण्याजोगी आणि कायद्याच्या राज्याप्रती बांधिलकी यांसह एक विस्तारत जाणारी बाजारपेठ, तरुण आणि कुशल कामगारवर्ग तसेच वेगाने विकसित होत जाणारी औद्योगिक परिसंस्था देऊ करत आहे. अनिश्चित जगात दीर्घकालीन गुंतवणूकसंबंधी निर्णयांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत असे ते म्हणाले.

रिआर्म युरोप आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या अंतर्गत लक्षणीय प्रमाणात वापरल्या न गेलेल्या क्षमतेचा संदर्भ देत, भारतीय कंपन्या आधुनिक रडार आणि संवेदक तंत्रज्ञान, बहु-संवेदक, कृत्रिम बुद्धीमत्तेसह सक्षम मानवविरहित हवाई प्रणाली, सोनोबॉयीस आणि उच्च उर्जा कमी वारंवारता असलेले पाण्याखालील ट्रान्समीटर यांच्यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये सह-विकास आणि सह-उत्पादन यांसाठी जर्मनीतील कंपन्यांसह एकत्र येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्यासाठी सुरु असलेली भारताची परिवर्तनकारी वाटचाल संरक्षणमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

   

भारताचा स्वावलंबनाचा ध्यास आत्मकेंद्री नाही तर भागीदारीच्या नव्या संधी खुल्या करण्याच्या संदर्भातील प्रयत्न आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. “परस्परांशी जोडलेल्या आणि परस्परांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, भागीदारी संबंध वैकल्पिक नाहीत तर ते अत्यावश्यक आहेत.जर्मनीशी असलेले आमचे संबंध परस्पर आदर आणि सामायिक स्वारस्ये यांच्यात रुजलेले आहेत. ही परस्पर लाभ, सामायिक विकास आणि दीर्घकालीन मूल्य निर्मिती करणारी भागीदारी आहे,” ते म्हणाले.

भारताने देशभरातील व्यवसाय सुलभतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच भारताला गुंतवणुकीसाठीचे एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी गेल्या दशकभरात अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीतील आघाडीच्या उद्योजकांना दिली. भारताची धोरणे पारदर्शक, अंदाज मांडता येण्याजोगी आणि गुंतवणूकदार स्नेही असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने आपल्या नियमनात उदारता आणली आहे, आपली नियामक चौकट अधिक बळकट केली आहे तसेच पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे या बाबीही  त्यांनी नमूद केल्या.

   

एक बाजारपेठ म्हणून भारताच्या संरक्षणाविषयक गरजा मोठ्या आहेत आणि आगमी दशकातही त्या वाढत्याच राहणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारत जर्मनीसोबत अधिक दृढ आणि दीर्घकालीन भागीदारीसाठी उत्सुक असल्याचेही ते म्हणाले. 

22 एप्रिल 2026 रोजी राजनाथ सिंह यांनी कील इथल्या टीकेएमएस  या पाणबुडी निर्मिती केंद्राला भेट दिली. त्यांच्या या भेटीतून भारत आणि जर्मनीमधील संरक्षण विषयक दृढ वचनबद्धता अधोरेखित झाली. यासोबतच प्रगत सागरी क्षमतांबाबत विचारांची देवाणघेवाण करण्याची तसेच संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासंदर्भातील भारताच्या प्राधान्यक्रमांनुसार नौदलाशी संबंधित तंत्रज्ञान विषयक सहकार्याच्या संधीचा शोध घेण्याची संधीही या भेटीमुळे निर्माण झाली.

त्याआधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बर्लिन इथे जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. जर्मनीसोबतच्या संरक्षण क्षेत्राअंतर्गतच्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या बैठकीत चर्चा झाली.  या भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रासंबंधीचा औद्योगिक सहकार्य  विषयक मार्गदर्शक आराखडा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेना प्रशिक्षण सहकार्यासाठीच्या  अंमलबजावणी व्यवस्थेबद्दलच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी करून त्यांची देवाणघेवाण करण्यात आली.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254917) अभ्यागत कक्ष : 13