अर्थ मंत्रालय
भारत आणि भूतान यांच्या सीमाशुल्क संयुक्त समूहाच्या सातव्या बैठकीचे 20 आणि 21 एप्रिल रोजी केरळमच्या मुन्नार इथे आयोजन
Posted On:
21 APR 2026 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026
भारत आणि भूतान यांच्यातल्या सीमाशुल्क संयुक्त समूहाची सातवी बैठक 20 आणि 21 एप्रिल, 2026 रोजी केरळमच्या मुन्नार इथे झाली. या बैठकीचे सह अध्यक्षपद केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे विशेष सचिव आणि सदस्य (सीमाशुल्क विभाग) योगेंद्र गर्ग आणि भूतान सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील,महसूल आणि सीमाशुल्क विभागाचे महसंचालक सोनम जामत्सशो यांनी भूषवले.

भारत आणि भूतान यांच्यात अत्यंत जवळचे आणि दीर्घकालीन व्यापारी संबंध आहेत, भारत भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून, भूतानच्या एकूण व्यापारात, भारताचा वाटा, सुमारे 80 टक्के इतका आहे. दोन्ही देशांतील द्वीपक्षीय व्यापारात, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, 1.9 अब्ज डॉलर्सपर्यन्त वाढ झाली, ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, 46% पेक्षा अधिक वाढ होती.
या बैठकीत, दोन्ही बाजूंनी, प्राधान्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. यात, सहकार्यात्मक सीमा व्यवस्थापन, सीमाशुल्क डेटाचे,माल येण्यापूर्वी आदानप्रदान करण्याविषयक सामंजस्य करार, गुप्तचर माहितीचे आदानप्रदान तसेच, अंमलबजावणी सहकार्यातून, तस्करीविरोधी यंत्रणा अधिक मजबूत करणे, सीमाशुल्क प्रक्रियांचे डिजिटलीकरण, आणि इलेक्ट्रॉनिक कार्गो ट्रॅकिंग प्रणाली अंतर्गत, मालाची वाहतूक करण्याची सुविधा देणे, अशा विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच, या बैठकीत, सीमा भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, व्यापार सुविधा वाढवणे आणि सीमाशुल्क प्रक्रिया अधिक सोहार्दपूर्ण तसेच सुरळीत करण्यावरही भर देण्यात आला.

भूतानच्या प्रतिनिधीमंडळाने कोची बंदरालाही भेट दिली. त्यांनी, जहाजांच्या बर्थिंगपासून ते गॅन्ट्री क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हाताळणीपर्यंत आयात-निर्यात प्रक्रियेची माहिती घेतली.
त्याशिवाय, भूतानी प्रतिनिधींना सागराशी संबंधित विविध कार्यान्वयन आणि इतर बाबींविषयी माहिती देण्यात आली, यात, समुद्री गस्त, संशयास्पद जहाजे ओळखणे, त्यांची तपासणी, गस्तीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या संवाद प्रणाली—जसे, सॅटेलाइट फोन आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS)—तसेच संशयास्पद मालाची ओळख आणि त्याच्या तपासणीच्या पद्धती, यांचा समावेश होता.
अतिशय सकारात्मक वातावरणात झालेल्या या बैठकीत, दोन्ही बाजूंनी सीमाशुल्क सहकार्य अधिक बळकट करण्यासह, निर्वेध सीमापार व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि व्यापार, वाणिज्य व वाहतूक कराराच्या चौकटीत सुरक्षित तसेच कार्यक्षम सीमा व्यवस्थापन करण्यासाठी आपली संयुक्त बांधिलकी अधोरेखित केली.
सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254235)
अभ्यागत कक्ष : 12