राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सभागृहात केलेल्या समारोपीय भाषणाचा मजकूर

Posted On: 18 APR 2026 11:33AM by PIB Mumbai

 

सभापती : माननीय सदस्यगण, राज्यसभेच्या 270 व्या अधिवेशनाच्या समारोपाबरोबरच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत आहे.  आपण दिलेल्या बहुमोल वैचारिक योगदानामुळे या सभागृहात झालेल्या समृद्ध चर्चेबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.

संसदेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विशेष महत्त्व असते. हे अधिवेशन सर्व तीन अधिवेशनांमधील दीर्घ काळ चालणारे असते, एवढेच नव्हे तर राष्ट्राच्या विकासगाथेला आकार देण्यात त्याचा मोठा वाटा असतो. मंजूर झालेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी, नवीन धोरणे आणि अधिवेशनात निश्चित केलेली प्राधान्यक्षेत्रे यांचा भारतातील प्रत्येक नागरिकावर थेट परिणाम होत असतो. 

माननीय सदस्यगण, या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेने झाली. ही चर्चा चार दिवस चालली, ज्यामध्ये या सभागृहातील 79 सदस्यांनी अत्यंत उत्साहाने आणि गांभीर्याने सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार प्रस्तावावरील चर्चेला दिलेल्या उत्तराने, सभागृहातील अनेक सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे  स्पष्ट आणि स-संदर्भ निराकरण केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 वरील चर्चा तितकीच भेदक आणि सर्वसमावेशक होती.  चार दिवस सुरु असलेल्या या चर्चेत तब्बल 97 सदस्यांनी सहभाग घेतला. याशिवाय सभागृहाने केंद्र सरकारच्या दोन प्रमुख मंत्रालयांच्या कामकाजाविषयी देखील सविस्तर चर्चा केली.

याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पश्चिम आशियामधील परिस्थितीची, तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय कराराविषयी स्वतःहून केलेल्या निवेदनाची दखल सभागृहाने घेतली.

पश्चिम आशियामधील संघर्ष आणि त्यामुळे निर्माण होणारी आव्हाने, विशेषतः ऊर्जाविषयक गरजांची आपूर्ति करण्यासाठी राष्ट्रासमोर असलेल्या आव्हानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निवेदनाने बदलणाऱ्या परिस्थितीविषयी एक यथायोग्य दृष्टिकोन मांडण्यात आला आणि राष्ट्राला या आव्हानांवर मात करण्यासाठी एक सामूहिक निर्धार करण्याची गरज अधोरेखित झाली.   

मला हे नमूद करण्यास आनंद होत आहे की या अधिवेशनादरम्यान तब्बल 50 खासगी सदस्यांची विधेयके सादर करण्यात आली.

मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की 94 वेळा माननीय सदस्यांनी संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 12 प्रादेशिक भाषांमध्ये भाषण केले.

एकंदरीत सभागृहाचे कामकाज 157 तास आणि 40 मिनिटे चालले. या अधिवेशनाची उत्पादकता 109.87 टक्के होती.  यामध्ये 117 प्रश्न, 446 शून्य प्रहर आणि 207 विशेष उल्लेख करण्यात आले.

***

माधुरी पांगे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253292) अभ्यागत कक्ष : 14