राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारतीय महसूल सेवा (प्राप्तिकर) अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 78 व्या तुकडीचा समारोप समारंभ संपन्न


आयआरएस अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ कायद्याचे पालन सुनिश्चित करणे ही नसून, सर्व नागरिकांना, विशेषत: समाजातील वंचित घटकांना सन्मानाची आणि न्याय्य वागणूक मिळेल, याची खात्री करणे देखील आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 15 APR 2026 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (15 एप्रिल, 2026) महाराष्ट्रातील नागपूर येथील 'राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी'मध्ये, 'भारतीय महसूल सेवा' (आयकर) अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 78 व्या तुकडीच्या समारोप समारंभाला उपस्थित राहिल्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अलिकडच्या वर्षांत भारताचा आर्थिक प्रवास अत्यंत गतिमान आणि प्रेरणादायी राहिला आहे. प्रत्यक्ष कर संकलनातील सातत्यपूर्ण वाढ, सुधारलेले कर-अनुपालन याचे संकेत देते. यामधून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील वाढता विश्वास देखील प्रतिबिंबित होतो. 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेला प्राप्तिकर कायदा, 2025 या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सुधारणा आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक करप्रणालीच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. याचे खरे यश केवळ त्याच्या अचूक, पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारेच सुनिश्चित होईल, आणि ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आयआरएस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका केवळ कर संकलनापुरती मर्यादित नाही. ते सार्वजनिक विश्वासाचे रक्षक आहेत. ते न्याय आणि निष्पक्षतेचे रक्षक आहेत. ते देशाची आर्थिक प्रगती, सामाजिक न्याय आणि सुशासनाचे आधारस्तंभ म्हणून काम करतात.

त्यांनी तरुण अधिकाऱ्यांना आठवण करून दिली की, नम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे त्यांच्या व्यावसायिक वर्तनाचे अविभाज्य घटक असले पाहिजेत. त्या म्हणाल्या की, त्यांची जबाबदारी केवळ नियम लागू करण्यापुरती मर्यादित नाही; त्यात प्रशासकीय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ करण्याचाही समावेश आहे. त्यांनी यावर जोर दिला की न्याय, पारदर्शकता आणि सचोटीवर आधारित निर्णय केवळ सुशासनच बळकट करत नाहीत, तर राष्ट्र आणि त्याच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की देशातील प्रत्येक नागरिकाने दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रामागे कठोर परिश्रम, आकांक्षा आणि उद्यमशीलतेची कहाणी दडलेली असते. आयआरएस अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ कायद्याचे पालन सुनिश्चित करणे एवढीच नाही, तर सर्व नागरिकांना, विशेषतः समाजातील वंचित घटकांना, सन्मानाची आणि निष्पक्ष वागणूक मिळेल याची खात्री करणे ही देखील आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की आज आपला देश 'विकसित भारता'चा संकल्प साकार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अशा टप्प्यावर प्रशासकीय यंत्रणा आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक संस्थेवरची कार्यक्षमता व पारदर्शकतेचे सर्वोच्च मापदंड अंगीकारण्याची तसेच सर्वसमावेशक दृष्टिकोनाने कार्य करण्याची जबाबदारी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2252382) अभ्यागत कक्ष : 59