उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात दिले डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यान

Posted On: 14 APR 2026 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीच्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ‘राष्ट्रनिर्माते डॉ. आंबेडकर: विकसित भारताच्या दिशेचा राजमार्ग’ या विषयावर दूसरे डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यान दिले. त्या आधी त्यांनी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याबद्दल सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची त्यांनी प्रशंसा केली. उपराष्ट्रपती म्हणाले की अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक कर्तव्ये जपण्याची प्रेरणा मिळते. या व्याख्यानाच्या माध्यमातून राष्ट्राच्या नैतिक आणि बौद्धिक पायाशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या जीवन प्रवासावर अधिक प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की अत्यंत कठीण परिस्थिती असूनही त्यांनी आपली चिकाटी, विद्वत्ता आणि न्यायावर असलेल्या निष्ठेच्या जोरावर आलेल्या प्रत्येक संकटाचे संधीत रुपांतर केले. डॉ. आंबेडकरांचा शिक्षणावरील गाढ विश्वास अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी म्हटले की शिक्षण हीच सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

राज्यसभेचे सभापती ही भूमिका पार पाडत असल्याचे सांगत त्यांनी, संवैधानिक नैतिकता जपली पाहिजे याची जाणीव करुन दिली. ते म्हणाले की लोकशाही संस्थांचे कामकाज संवाद, चर्चा आणि विधायक वादविवादातून चालले पाहिजे. संसदीय कामकाजात अडथळे निर्माण करण्यापेक्षा निर्णय घेण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगत, या चर्चा माहितीपूर्ण आणि सन्मानपूर्वक व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्त्री-पुरुष समानतेबाबत डॉ. आंबेडकरांच्या पुरोगामी दृष्टिकोनाचा उल्लेख यावेळी उपराष्ट्रपतींनी केला. ते म्हणाले की डॉ. आंबेडकरांच्या मते महिलांचे सक्षमीकरण हेच समाजाच्या प्रगतीचे मोजमाप आहे. आज विविध क्षेत्रांतील महिलांचा वाढता सहभाग आणि महिलांच्या नेतृत्वाला सरकारकडून मिळत असलेला पाठिंबा याची त्यांनी प्रशंसा केली.

डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थांच्या विकासाविषयी ते म्हणाले की येणाऱ्या पिढ्यांसाठी ही स्थळे प्रेरणास्रोत ठरणारी आहेत. न्यायाधिष्ठीत आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले काम हीच डॉ. आंबेडकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

* * *

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251989) अभ्यागत कक्ष : 12