राष्ट्रपती कार्यालय
गांधीनगर येथील लोक भवनात आयोजित सामाजिक समरसता महोत्सवात राष्ट्रपतींचा सहभाग
Posted On:
14 APR 2026 8:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज 14 एप्रिल 2026 रोजी गुजरातमध्ये गांधीनगर येथील लोक भवनात आयोजित ‘सामाजिक समरसता महोत्सवा’त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी कृतज्ञ देशातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. त्या म्हणाल्या की बाबासाहेबांनी देशाच्या प्रगतीत तसेच आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासह सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात बहुआयामी योगदान दिले आहे. एक कायदेतज्ञ, अर्थतज्ञ आणि समाज सुधारक म्हणून बाबासाहेबांच्या योगदानाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र बँकिंग प्रणाली, सिंचन विषयक पायाभूत सुविधा, वीज ग्रीड, कामगार व्यवस्थापनाचा आराखडा तसेच केंद्र सरकार आणि राज्ये यांच्या दरम्यान महसूल विभागणी यंत्रणा यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्यासंदर्भातील तपशीलवार माहितीचा सर्वदूर प्रसार केल्यामुळे नागरिकांना राष्ट्रनिर्माता म्हणून त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची सर्वसमावेशक माहिती मिळू शकेल.

राष्ट्रपती म्हणाल्या की सर्व जीवांप्रती करुणा आणि सामाजिक सलोखा ही मूल्ये एकमेकांना पूरक आहेत. सर्वांचे कल्याण आणि समाजातील ऐक्य हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जेव्हा समाजातील व्यक्ती जात, वर्ग, भाषा आणि प्रदेश यामुळे होणाऱ्या विभाजनाच्या पलीकडे पोहोचून कोणत्याही भेदभावाविना समानतेच्या तत्वाचे पालन करतात तेव्हाच खऱ्या सुसंवादाचे दर्शन घडते. भारतमातेची सर्व मुले एकसमान आहेत आणि आत्म्याने एकरूप तसेच सलोख्याच्या सामायिक भावनेने बांधलेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या समारोपाच्या भाषणातील संदेश, सामाजिक सलोख्याच्या संदर्भात कायमच समर्पक राहील. बाबासाहेबांनी म्हटल्यानुसार, सामाजिक लोकशाही ही स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यांचा मुलभूत तत्वांच्या रुपात स्वीकार करणारी जीवन पद्धती आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
माधुरी पांगे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251974)
अभ्यागत कक्ष : 17