श्रम आणि रोजगार मंत्रालय
'राष्ट्रीय करिअर सेवा' (एनसीएस) पोर्टल द्वारे रोजगाराच्या संधी बळकट करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि 'पोर्टर' अँड 'गिगिन टेक्नॉलॉजीज' यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
13 APR 2026 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2026
रोजगार संधींचा विस्तार करण्यासाठी आणि 'राष्ट्रीय करिअर सेवा' (एनसीएस) पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल रोजगार जुळवणी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज पोर्टर अँड गिगिन टेक्नॉलॉजीजबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव वंदना गुरनानी यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, आपल्या कौशल्य-संचानुसार नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी, एनसीएस हे व्यासपीठ, एक प्रभावी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून विकसित झाले आहे. सध्या या पोर्टलवर 7 लाखांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत आणि जवळजवळ 59 लाख आस्थापनांनी एनसीएसवर नोंदणी केली आहे, त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात संधी खुल्या झाल्या आहेत, असे ते म्हणाले. एनसीएसची गिगिन अँड पोर्टर या प्लॅटफॉर्म्स बरोबरची भागीदारी सर्व संबंधित घटकांसाठी परस्पर फायदेशीर ठरेल आणि एनसीएस पोर्टलला अधिक बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. मांडवीय यांनी एनसीएस पोर्टलचे ‘ई-मायग्रेट, एसआयडीएच आणि माय भारत’ या प्लॅटफॉर्म्सशी, तसेच विविध राज्यांच्या पोर्टलशी झालेले एकत्रीकरण अधोरेखित केले. ते म्हणाले की, यामुळे हे पोर्टल, व्याप्ती आणि पोहोच या दोन्ही दृष्टीने खऱ्या अर्थाने विस्तृत आणि परिवर्तनकारी ठरले आहे. कौशल्य-तफावतीची समस्या दूर करण्याची गरज अधोरेखित करून, त्यांनी गिगिन अँड पोर्टर, तसेच एनसीएस, यांना नोंदणीकृत नोकरी शोधणाऱ्या युवकांना 'सॉफ्ट स्किल्स'चे प्रशिक्षण देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन केले.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव वंदना गुरनानी यांनी एनसीएस पोर्टलची प्रचंड व्याप्ती आणि प्रभाव अधोरेखित केला. त्यांनी नमूद केले की, हे पोर्टल सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्यावर 6 कोटींहून अधिक नोकरी शोधणाऱ्या लोकांची नोंदणी झाली असून, 9 कोटींहून अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, यावरून भारताच्या रोजगार परिसंस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून या पोर्टलची वाढती भूमिका प्रतिबिंबित होते.
पोर्टर अँड गिगिन टेक्नॉलॉजीजबरोबरची भागीदारी, वाढता सहभाग आणि सहकार्याद्वारे हा मंच अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251658)
अभ्यागत कक्ष : 6