विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय क्वांटम मिशनने सुरुवातीच्या 2 वर्षांच्या आतच 1,000 किमी सुरक्षित दळणवळणाचा महत्वपूर्ण टप्पा गाठला: डॉ.जितेंद्र सिंह
क्वांटम मिशनने स्टार्टअप मदतीची व्याप्ती 17 पर्यंत वाढवली, 9 नवीन डीप-टेक उपक्रमांना दिला पाठिंबा
Posted On:
08 APR 2026 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026
राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत जगातील सर्वात लांब क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्कपैकी एक असलेले 1,000 किलोमीटरचे नेटवर्क, मोहिमेच्या प्रारंभापासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत यशस्वीरित्या साध्य करून दाखवले आहे. यामुळे आठ वर्षांच्या कालावधीत 2,000 किलोमीटरचे उद्दिष्ट गाठण्याच्या लक्ष्याच्या दिशेने जलद प्रगती झाली आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना आज येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) आढाव्यादरम्यान देण्यात आली.
या विकासामुळे संरक्षण, वित्तीय व्यवस्था आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमधील सुरक्षित संवाद क्षमता मजबूत होण्याची अपेक्षा आहे, तसेच भारताच्या सुरक्षित डिजिटल परिसंस्थेच्या दिशेने होणाऱ्या व्यापक प्रयत्नांनाही चालना मिळेल. अधिकाऱ्यांनी नमूद केले की, हे तंत्रज्ञान पाण्याखालील आणि भूमिगत नेटवर्कसह आव्हानात्मक भूभागांवर काम करण्यासाठी तयार केले आहे, ज्यामुळे त्याची नागरी आणि सामरिक उपयोगांची शक्यता वाढते.
या आढाव्यात संशोधन, विकास आणि नवोन्मेष (आरडीआय) निधी चौकटीअंतर्गत झालेल्या प्रगतीवरही प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये तंत्रज्ञान विकास मंडळ (टीडीबी) आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषद (बीआय आर ए सी) दुसऱ्या स्तरावरील निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आवाहन केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत टीडीबीला 100 हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, जे संशोधन आणि विकास निधीमधील उद्योगाची वाढती रुची दर्शवते. गुंतवणूक समितीने शिफारस केलेल्या सहा कंपन्यांवर पुढील कार्यवाही केली जात आहे, तर अतिरिक्त प्रस्ताव विचाराधीन आहेत, जे सरकारी-समर्थित नवोन्मेष उपक्रमांमधील वाढता सहभाग दर्शवते.
बीआय आर ए सीच्या पाठिंब्याने चालणाऱ्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही वाढीव हालचाल दिसून येत असून, अलीकडील आवाहनांअंतर्गत कर्करोग संशोधन, जनुकीय उपचार आणि जैव-उत्पादन यांमधील प्रकल्पांसाठी जवळपास 200 अर्ज प्राप्त झाले आहेत.
बैठकीदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी शासकीय अनुदानित संशोधन आणि विकास निधीमधील सहभाग आणि जागरूकता सुधारण्यासाठी पारदर्शकता, संरचित मूल्यांकन आणि व्यापक पोहोच यांच्या गरजेवर भर दिला.
डीएसटी सचिव डॉ. अभय करंदीकर, टीडीबी सचिव राजेश कुमार पाठक आणि बीआयआरएसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या आढाव्यासाठी उपस्थित होते.
मिशन-मोड प्रोग्रामर्स, मिश्रित वित्तपुरवठा मॉडेल आणि स्टार्टअप समर्थन चौकटींच्या माध्यमातून भारताची डीप-टेक क्षमता बळकट करण्याच्या व्यापक धोरणात्मक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत, ज्यामध्ये जैवतंत्रज्ञान आणि प्रगत दळणवळणासोबतच क्वांटम तंत्रज्ञान एक प्रमुख धोरणात्मक आघाडी म्हणून उदयास येत आहे.




सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250254)
अभ्यागत कक्ष : 14