लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्ष गोव्यात राष्ट्रकुल संसदीय संघाच्या भारत क्षेत्रामधल्या विभाग सातच्या पहिल्या परिषदेचे करणार उद्घाटन


राज्यसभेचे उपसभापती; गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी; गोव्यातील केंद्रीय मंत्री, गोव्यातील संसद सदस्य आणि तीन सदस्य राज्यांचे विधिमंडळ सदस्य परिषदेला राहणार उपस्थित

"2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या कार्यात तरुण विधिमंडळ सदस्यांची भूमिका" आणि "व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि किनारपट्टी संपर्कसुलभतेमध्ये विभाग सात चे प्राधान्यक्रम "या विषयांवर परिषदेत होणार चर्चा

Posted On: 07 APR 2026 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला  9 एप्रिल 2026 रोजी गोव्यात पणजी इथे राष्ट्रकुल संसदीय संघाच्या भारत क्षेत्राच्या विभाग सात च्या पहिल्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे; महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर; आणि गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी हे सुद्धा या प्रसंगी मान्यवरांना संबोधित करतील.

गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांचे स्वागतपर भाषण होणार असून; गोव्याचे संसदीय कार्य मंत्री माविन गुदिन्हो आभार प्रदर्शन करतील.

आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधिमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गोव्यातील केंद्रीय मंत्री, गोव्यातील संसद सदस्य आणि तीन सदस्य राज्यांचे विधिमंडळ सदस्य या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत मान्यवर खालील विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

1. "2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या कार्यामध्‍ये  तरुण लोकप्रतिनिधींची भूमिका."

2. "व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि सागरी  संपर्क यंत्रणा  क्षेत्रातील विभाग सात ची प्राधान्ये."

भारत विभाग सात मध्ये गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या विधानसभांचा समावेश होतो. 2024 मध्ये राष्ट्रकुल संसदीय संघ (सीपीए) भारत क्षेत्राची  नऊ विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली; त्यानंतर विभाग -सात  ची ही पहिलीच परिषद असणार आहे. सध्या गुजरात विधानसभेचे  अध्यक्ष हे  सीपीए भारत क्षेत्र विभाग -सात चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

या परिषदेचा समारोप 10 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या  समारोप सत्राला गोव्याचे राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती असेल.

संसदीय सहकार्य अधिक दृढ करणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणे आणि या क्षेत्राच्या विकासाशी संबंधित विषयांच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करणे, हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249777) अभ्यागत कक्ष : 43