नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
भारताने 2025-26 या वर्षात पवन ऊर्जेमध्ये 6.05 गिगावॉट ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ केली साध्य
भारताच्या एकूण स्थापित पवन ऊर्जा क्षमतेने ओलांडला 56 गिगावॉटचा टप्पा
पवन ऊर्जा क्षेत्राने 2024-25 च्या तुलनेत 46% वाढ नोंदवली
Posted On:
06 APR 2026 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2026
भारताने 2025-26 या वर्षात पवन ऊर्जेमध्ये 6.05 गिगावॉट ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक क्षमता वाढ साध्य केली आहे
आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये ती 5.5 गिगावॅट इतकी होती.
ही आकडेवारी भारताच्या पवन ऊर्जा क्षमतेत आर्थिक वर्ष 2024-25 मधील वाढीच्या तुलनेत जवळजवळ 46% वाढ दर्शवत असून, भारताच्या किनारपट्टी भागातील पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीच्या वाटचालीने निर्णायक वेग घेतल्याचे संकेत देते.
या वाढीसह, भारताची एकत्रित स्थापित पवन ऊर्जा क्षमता 56 गिगावॉटच्या पुढे गेली आहे. हा महत्वाचा टप्पा, सुधारलेली धोरण स्पष्टता, पारेषण सज्जता, स्पर्धात्मक दर निश्चिती आणि प्रस्तावित प्रकल्पांची भक्कम मालिका या घटकांमुळे या क्षेत्राने घेतलेली नवी गती दर्शवतो.
शाश्वत धोरण समर्थन, प्रकल्पांच्या अंमलबजावणीत सुधारणा यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले. गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र यासारखी राज्ये या वर्षात क्षमता वाढीमध्ये प्रमुख योगदान देणारी ठरली आहेत. पवन-सौर ऊर्जा संयुक्त प्रकल्पांची वाढती मालिका आणि हरित ऊर्जेसाठी 'मुक्त प्रवेश' या सुविधेची होत असलेली अंमलबजावणी, हे घटक या कामगिरीला आधार देणारे ठरले.
भारताच्या पवन ऊर्जा क्षेत्राची सातत्याने वाढ होत असून, यामुळे भारत जागतिक स्तरावरील आघाडीच्या पवन ऊर्जा बाजारपेठांपैकी एक बनला आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पवन टर्बाइन्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांवर आणि कच्च्या मालावरील सवलतीचे सीमा शुल्क, जून 2028 पर्यंत आंतर-राज्य पारेषण प्रणाली (आयएसटीएस) शुल्कात सवलत, स्पर्धात्मक बोली यंत्रणा, पवन-आधारित नवीकरणीय ऊर्जेच्या वापरासाठी स्वतंत्र आरसीओ चौकट, आणि राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्थेकडून तांत्रिक सहाय्य, या उपक्रमांचा यात समावेश आहे.
या विक्रमी वाढीने भारताच्या नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओला लक्षणीय बळकटी दिली आहे आणि 2030 पर्यंत 500 गिगावॉट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये योगदान दिले आहे.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला, सरकारच्या व्यापक नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक भाग म्हणून, भारताचा पवन ऊर्जा कार्यक्रम सुरू करण्यात आला. गेल्या तीन दशकांमध्ये, भारताने ग्रीड-जोडणी असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक भक्कम पवन ऊर्जा परिसंस्था निर्माण केली आहे, तसेच मजबूत धोरणात्मक आराखडा विकसित केला आहे.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249466)
अभ्यागत कक्ष : 30