संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळेत लार्ज कॅव्हीटेशनल टनेल (LCT) सुविधेची पायाभरणी, नौदलाच्या संशोधन आणि चाचणी क्षमतांचा होणार विस्तार

Posted On: 03 APR 2026 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दि. 03 एप्रिल 2026 रोजी,संरक्षण  संशोधन आणि विकास संस्थेच्या आंध्र प्रदेशातील  विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळेत अत्याधुनिक बृहद बाष्प-पोकळी चाचणी बोगदा अर्थात लार्ज कॅव्हीटेशनल टनेल (LCT) सुविधेची पायाभरणी केली. या  सुविधेमुळे भारताच्या नौदल संशोधन आणि चाचणी क्षमतेची व्याप्ती लक्षणीयरित्या वाढणार असून, हे तंत्रज्ञान विषयक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची अत्यंत महत्वाची प्रयोगशाळा आहे.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ, संशोधक आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या उपक्रमामुळे भारत स्वतःच्या संसाधनांचा वापर करून, आपली उपकरणे, प्रणाली आणि संबंधित सहाय्यक प्रणालींचे करून स्वदेशी बनावटीचे डिझाइन, विकास आणि चाचणी करण्याच्यादृष्टीने सक्षम होईल आणि स्वतःला एक सामर्थ्यशील नौदल शक्ती तसेच संरक्षण तंत्रज्ञानातील आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित करेल असे ते म्हणाले. आतापर्यंत, उपकरणे, प्रणाली आणि संबंधीत सहाय्यक प्रणाल्या यशस्वीपणे विकसित केल्यानंतरही, आपल्याला बहुतांशवेळा महत्त्वाच्या चाचण्यांसाठी परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत होते, मात्र आता ही परिस्थिती बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही सुविधा म्हणजे केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, ही आपल्याला प्रणोदन प्रणाली (Propulsion systems) व्यवस्थेला प्रगत स्वरुप मिळवून देण्याच्यादृष्टीने आपल्या क्षमतांना बळकटी देणारी प्रणाली आहे असे ते म्हणाले. यामुळे आपल्याला आवाजाची तीव्रता कमी करण्यावर भर देण्यात मदत होईल, अभेद्यता विषयक (Stealth) क्षमतांना अधिक बळकटी मिळेल असेही त्यांनी सांगितले. ही व्यवस्था पाणबुड्या आणि जहाजांचे डिझाइन तसेच जहाजे विकसित करण्यासाठी एक पायाभूत आधारस्तंभ म्हणून कामी येईल, यामुळे नौदल अभियांत्रिकी आणि सागरी संरक्षण प्रणालींमधील भविष्यातील प्रगतीला पाठबळ मिळेल असे ते म्हणाले.

हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाअंतर्गत साध्य केलेल्या यशाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. भारताला एक सामर्थ्यशाली नौदल शक्ती  म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दिशेने पुढची वाटचाल करण्याकरता, जलक्षेपणास्त्र प्रणाली, पाण्याखालील सुरुंग, डिकॉय आणि  पाण्याखालील स्वयंचलित वाहने अर्थात ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल (AUV) या आणि अशा अनेक क्षेत्रांत संशोधन करून मापदंड प्रस्थापित केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळेची प्रशंसा केली. नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळेने देशाच्या सुरक्षा विषयक पायाभूत सुविधांना बळकटी देत, राष्ट्र उभारणीसाठी समर्पित भावनेने काम सुरू ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.

हा प्रकल्प एक धोरणात्मक राष्ट्रीय साधनसंपत्ती आहे, हा प्रकल्प म्हणजे जलगतीशास्त्र (हायड्रोडायनामिक) विषयक संशोधनाशी संबंधीत स्वदेशी क्षमतांना बळकटी देण्याच्या दिशेने  मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असे ते म्हणाले. नेक्स्ट जनरेशन जहाजे, पाणबुड्या आणि पाण्याखालील तळसदृश्य  व्यवस्थांचे डिझाइन करून त्या विकसित करण्यासाठी पाठबळ पुरवणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या आणि तंत्रज्ञानासंबंधी लाभलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्यातून, चाचण्यांअंती सिद्ध होऊन प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याच्या अर्थात टर्नकी (Turnkey) पद्धतीअंतर्गत राबवला जात असून, या प्रकल्पातून जागतिक कौशल्य आणि स्वदेशी नवोन्मेषाचा अनोखा मिलाफ दिसून येतो असे ते म्हणाले.

या सुविधेअंतर्गत एकाच स्वरुपातील एकात्मिक संरचनेअंतर्गत, पाणबुड्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या बंदिस्त प्रवाह आभासी चाचणी अर्थात क्लोज्ड लूप सिम्युलेशन आणि पाण्यावरील जहाजांच्या संशोधनासाठी महत्त्वाचे असलेल्या मुक्त पृष्ठभाग आभासी चाचणी अर्थात फ्री सरफेस सिम्युलेशन अशा दोन्ही चाचण्या घेण्याच्या क्षमता आहेत. यामुळे ही सुविधा जागतिक पातळीवरील अशाप्रकारची अपवादा‍त्मक पायाभूत सुविधा म्हणून स्थान निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा बृहद बाष्प-पोकळी चाचणी बोगदा प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर, विनाशिका आणि विमानवाहू युद्धनौकांसह नौदलाच्या अनेक मुख्य विभागांसाठी जलगतीशास्त्रीय डिझाइन आणि प्रणोदन प्रणालींचे अचूक आणि नेमके प्रमाणीकरण करता येऊ शकणार आहे. यामुळे देशाच्या जहाजबांधणी परिसंस्थेची व्याप्तीही  लक्षणीयरीत्या विस्तारणार आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2248918) अभ्यागत कक्ष : 27