संरक्षण मंत्रालय
कोलकात्याच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सकडून अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण
Posted On:
30 MAR 2026 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2026
कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन आणि बांधणी केलेल्या अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी आठ जहाजांपैकी, चौथ्या जहाजाचे आज नौदलाकडे हस्तांतरण केले. जीआरएसई, कोलकाताने अशा प्रकारच्या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी जहाजांची 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग' (IRS) च्या नियमांनुसार रचना आणि बांधणी केली असून यामधून ज्यामधून स्वदेशी संरक्षण जहाजबांधणीचे यश अधोरेखित होत आहे.
(4)DADW.jpeg)
77 मीटर लांबीच्या या युद्धनौका भारतीय नौदलातील वॉटरजेट तंत्रज्ञानाने संचार करणाऱ्या सर्वात मोठ्या युद्धनौका आहेत. वजनाने हलके असलेले अत्याधुनिक पाणतीर(टॉर्पेडो), स्वदेशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर्स आणि उथळ पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेणारी सोनार यंत्रणा यांनी त्या सुसज्ज आहेत. यामुळे पाण्याखालील पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा वेध घेऊन या धोक्यापासून प्रभावी पद्धतीने संरक्षण करणे शक्य होणार आहे. या युद्धनौकांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी आणि पाणसुरुंग आधारित युद्धक्षमतांमध्ये, तसेच किनारपट्टीवरील टेहळणीच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.
ही युद्धनौका म्हणजे पूर्वीच्या 1241 पीई श्रेणीतील आयएनएस अग्रय गस्ती नौकेची सुधारित आवृत्ती आहे, जी नौका 2017 मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. यामुळे आपल्या उल्लेखनीय युद्धनौकांच्या नावांचा वारसा जपण्याची नौदलाची परंपरा पुढे सुरू राहिली आहे.
(4)0TDE.jpeg)
अग्रयचा मिळालेला ताबा हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेनुसार, यामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज देशांतर्गत संरक्षण उत्पादन व्यवस्थेची वाढती ताकद आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा दाखला आहे.
* * *
राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2247116)
अभ्यागत कक्ष : 13